कऱ्हा व चांबळी (भोगवती) या नद्यांच्या संगमावरचे सासवड येथील संगमेश्वर देवस्थान म्हणजे स्थापत्यकलेचा सुंदर ठेवा आहे. सातव्या ते दहाव्या शतकात ते बांधले असावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. निसर्गसमृद्ध वातावरणात असलेले हे प्राचीन व सुंदर मंदिर केवळ सासवडचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव म्हणावे लागेल.
संगमेश्वर मंदिरासंदर्भात आख्यायिका अशी, पांडव अज्ञातवासात असताना जेजुरीनजीक पांडेश्वर येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी महाराज पंडू यांचे श्राद्ध करण्यासाठी त्यांना पाण्याची गरज होती. भीमाने कृष्णाकडे याबाबत तोडगा विचारला. कृष्णाने सांगितल्यानुसार पश्चिमेकडील चतुर्मुख डोंगरावर ब्रह्मदेव तपश्चर्या करीत होते. त्यांच्या कमंडलूमध्ये १०८ नद्यांचे तीर्थ होते. भीमाने तो कमंडलू उलटवला आणि पांडेश्वरकडे धावत सुटला. त्याच वेळी ब्रह्मदेव भीमाचा पाठलाग करू लागले. भीम पुढे आणि त्याच्या मागे कमंडलूतील पाणी नदीच्या रूपाने वाहत येत होते.
कृष्णाने आधीच सांगितल्यानुसार भीमाने पांडेश्वरकडे परत येताना अनेक ठिकाणी बेल आणि तांदूळ ठेवले. ब्रह्मदेव बेल व तांदूळ असलेल्या जागेवर वाळूच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून पूजा करण्यासाठी थांबत. अशा प्रतिष्ठापित केलेल्या अनेक शिवलिंगांची त्यांनी पूजा केली. तोपर्यंत भीम पांडेश्वरपर्यंत सुखरूप पोचला आणि त्यासोबत नदीही पांडेश्वरला आली. भीमाचा पाठलाग करता करता, ब्रह्मदेव पांडेश्वरला आले आणि ते पांडव करीत असलेल्या धार्मिक विधीत सहभागी झाले. त्यांच्या या कमंडलूला ‘कर’, असे म्हटले जायचे. त्यावरून या नदीला कऱ्हा हे नाव पडले. ब्रह्मदेवाने जिथे जिथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली; त्यात संगमेश्वर, चांगावटेश्वर, नागेश्वर या स्थानांचा समावेश आहे.
सासवड बसस्थानकापासून पायी १० मिनिटांवर हे मंदिर आहे. चांबळी नदीवरील लोखंडी साकव चढून गेल्यानंतर मंदिरात जाता येते. मध्यम आकाराच्या एका दगडी चौथऱ्यावर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रशस्त परिसरात चारही बाजूंनी तटभिंती बांधलेल्या आहेत. बाहेरील बाजूच्या दगडी भिंतीवरील नक्षीकाम खूपच सुंदर आहे.
मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. मंदिराचे नंदीगृह, सभामंडप व गाभारा हे यादव काळात; तर कळसाचे काम पेशवे काळात केले गेले असावे, असे सांगितले जाते. समोरील दोन उंच दगडी दीपमाळांमुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. त्रिपुरारी पौर्णिमेला होणाऱ्या दीपोत्सवात या दीपमाळा उजळून निघतात.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर नंदीमंडपात काळ्या पाषाणातील भव्य नंदी विराजमान झालेला दिसतो. साधारणतः सहा फूट उंची असलेल्या या नंदीच्या गळ्यात घुंगूरमाळ, पाठीवर झूल व अंगावर अनेक अलंकार कोरलेले दिसतात. संगमेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमुख असले तरी समोर असलेल्या या नंदीने मात्र उत्तरेकडे मान फिरविल्याचे दिसते. नंदीचे हे शिल्प दुर्मीळ असल्याचे सांगितले जाते. नंदीमंडपात हनुमान व गणेश यांच्या प्रतिमा आहेत.
मुख्य सभागृह १६ खांबांवर तोलून धरलेले आहे. त्यापैकी चार पूर्णाकृती खांबांची रचना अतिशय आकर्षक आहे. हे खांब चौकोनी व गोलाकृती आकारात आहेत. खांबांवरील कोरीव कामातील फुलांची नक्षीही त्यांची शोभा वाढविते. या खांबांच्या मधोमध जमिनीवर कासव कोरलेले आहे. सभामंडपाच्या छताचा भागही पूर्णतः दगडी आहे. एकमेकांमध्ये दगड गुंफून हे बांधकाम झाल्याचे दिसते. काळ्या दगडातील ही अनोखी ठेवण पाहण्यासारखी आहे. सभामंडपात दक्षिण व उत्तर असे दोन दरवाजे आहेत. येथून काहीसे खाली उतरून गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो.
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आणि चौकटीवर पानाफुलांच्या वेली कोरलेल्या आहेत. गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील भव्य शिवपिंडी आहे. त्यावर सतत अभिषेक सुरू असतो. या पिंडीच्या मागील कोनाड्यात गणेशमूर्ती आहे.
मंदिरावरील कळसांची रचनाही आकर्षक आहे. नंदीमंडप, सभामंडप व गाभारा अशा चढत्या क्रमाने कळस बांधण्यात आले आहेत. कळसावरील गोपुरांवर बारीक नक्षीकाम आणि देव-देवतांची असंख्य शिल्पे कोरलेली दिसतात. या कळसामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुललेले वाटते. मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ आहे. तसेच सर्वत्र रंगीबेरंगी फुलझाडे, मंदिराच्या दोन्ही बाजूंनी खळाळत वाहणारे पाणी यामुळे या परिसरात अनेकदा चित्रपट, मालिका व माहितीपटांचे चित्रीकरण होत असते.
महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा व श्रावणी सोमवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्रिपुरारी पौर्णिमेला येथील घाट दिव्यांनी उजळून निघतो. हे जागृत देवस्थान आहे आणि हा देव नवसाला पावतो, अशी परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांसाठी या मंदिरातील दर्शनाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी आहे.