वेगवेगळ्या प्रदेशांतून वाहणाऱ्या नद्या आपल्या सोबत त्या त्या मातीचे गुण घेऊन पुढे वाहत असतात. संगमाच्या ठिकाणी विविध प्रदेशांतील मातीतील क्षारांचा संगम होऊन या पाण्याचे औषधी गुणधर्म वाढतात. त्यामुळे नद्यांचे संगम हे प्राचीन काळापासून पवित्र स्थान मानले जाते. अशा संगमाच्या ठिकाणी काशी, प्रयागसारखी प्रसिद्ध देवालये उभी आहेत. असेच एक संगमेश्वर देवालय कृष्णा व वारणेच्या संगमावर हजारो वर्षापासून उभे आहे. याचे वैशिष्ट्य असे की येथे एका वर्षात तब्बल ६२ वेळा देवाची पालखी निघते.
या मंदिराची आख्यायिका अशी की दक्षराजाने केलेल्या यज्ञात महादेवाचा अपमान झाल्याने सतीने यज्ञकुंडात उडी टाकून प्राणत्याग केला. यानंतर क्रोधायमान महादेव या ठिकाणी येऊन काही काळ थांबले होते. येथे त्यांचा क्रोध शांत झाला म्हणून सर्व देवांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, मिरजेस राहणाऱ्या मृकुंड ऋषींना मार्कंडेय हा पुत्र होता. तो अत्यंत विद्वान पण अल्पायुषी होईल, असे त्याचे भविष्य होते. हे जेव्हा मार्कंडेयाला समजले तेव्हा तो संगमेश्वरास शरण आला. त्याने येथे कठोर साधना सुरू केली. मृत्यूची वेळ येताच तो येथील शिवलिंगाला मिठी मारून बसला. परिणामी यमास परतावे लागले. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याला चौदा कल्पांचे आयुष्य दिले. म्हणून या मंदिरापुढे मार्कंडेय ऋर्षीची पाषाणप्रतिमा आहे, असे सांगितले जाते.
मंदिराचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील कोरीव दगडांचे बांधकाम पाहता ते प्राचीन असल्याची खात्री पडते. असे सांगितले जाते की हे मंदिर शिलाहार राजा भोज दुसरा याच्या काळातील आहे. तर काही जाणकारांच्या मते ते चालुक्य काळातील आहे. श्रीराम सीतेच्या शोधासाठी लंकेकडे जात असताना त्यांनी या पवित्र ठिकाणी वालुकामय शिवलिंगाची स्थापना केली होती. या शिवलिंगावर रामाच्या हातांचे ठसे दिसतात, असे येथील पुजारी सांगतात. या आख्यायिकेमुळे या मंदिराचा कालखंड थेट रामायण काळाशी जोडला जातो.
मंदिराकडे जाताना गावाच्या वेशीवर रस्त्याच्या दुतर्फा स्तंभ व त्यावर अर्धचंद्र असलेल्या स्वागत कमानी आहेत. पुढे मंदिराचा वाहनतळ व त्यापुढे तटबंदी असलेले प्रांगण आहे. या प्रांगणात प्रवेशद्वाराजवळ दीपमाळ आहे. येथून पुढे असलेल्या मंदिराच्या दुसऱ्या तटबंदीत दगडी बांधणीचे किल्लेवजा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर अर्धचंद्राकार कमान व द्वारशाखांवर उभ्या धारेच्या नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारातून नऊ पायऱ्या उतरून मंदिराच्या दुसऱ्या प्रांगणात यावे लागते. प्रवेशद्वारात पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके व छताला पितळी घंटा टांगलेली आहे.
फरसबंदी असलेल्या या प्रांगणात चौथरा व त्यावर कोरीव पाषाणात बांधलेले तुलसी वृंदावन आहे. बाजूला सुमारे पाच फूट उंच त्रिशूल व त्याला डमरू आहे. तुलसी वृंदावनाच्या बाजूला मार्कंडेश्वराचे मंदिर आहे. यामध्ये मार्कंडेश्वराची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. पुढे मंदिराचा दुमजली लाकडी सभामंडप आहे. सभामंडपाची समोरील बाजू खुली आहे. उजव्या व डाव्या बाजूस प्रत्येकी दोन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात आरतीच्या वेळी वाजवला जाणारा नगारा आहे. बाजूला दीपकोष्टके, त्याबाजूला दिवट्या व काकडे आहेत. येथेच एका बाजूला भस्मपात्र आहे. या सभामंडपात पितळी कासव व नंदी आहे.
अंतराळाच्या दर्शनी भिंतीत दोन्ही बाजूस दोन कक्ष व दोन देवकोष्टके आहेत. अंतराळाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. अंतराळात चार नक्षीदार गोलाकार स्तंभांच्यामध्ये वज्रपिठावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. अंतराळात डाव्या बाजूला भिंतीतील दोन देवकोष्टकांत सप्तमातृकापट व गणेशमूर्ती आहे. उजवीकडील देवकोष्टकात पार्वतीची मूर्ती आहे. या देवकोष्टकांच्या बाजूला संगमेश्वर देवाची उत्सव मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर चार नक्षीदार स्तंभ आहेत. मंडारकास अर्धचंद्रशिला व दोन्ही बाजूला पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहात शिवपिंडी व पिंडीवर छत्र धरलेला चांदीचा नाग आहे. पिंडीवर धार धरलेले अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. या पिंडीवर श्रीरामाच्या हाताचे ठसे आजही दिसतात, असे सांगितले जाते. या शिवलिंगाचे लिंग व शाळुंका वेगळे आहे. त्यात एक इंचाची घळ आहे. या घळीत नदीच्या संगमाचे पाणी प्रवाहित असल्याचे सांगितले जाते.
अंतराळाच्या छतावर चौकोनी उंच शिखर, त्यावर आमलक व कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी घुमटाकार शिखर, त्यावर चौकोनी शिळा, कळस, त्रिशूल व डमरू आहेत. प्रांगणात दत्तात्रेय मंदिर आहे. मंदिरात दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे. याबाबत अशी आख्यायिका आहे की दत्तात्रेय या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. मुख्य मंदिराच्या मागील बाजूस भैरवनाथ मंदिर आहे. मंदिरात देवाची हातात डमरू, त्रिशूल, अमृतपात्र व अभयमुद्रा असलेली चतुर्भुज मूर्ती आहे. याशिवाय या परिसरात विठ्ठल–रखुमाई, मारुती, शनिदेव व श्रीविष्णू यांची मंदिरे आहेत.
मंदिरात महाशिवरात्र हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी पहाटे चार वाजता पंचामृत अभिषेक, पाच वाजता आरती, सकाळी ११ वाजेपर्यंत अखंड अभिषेक घातला जातो. यावेळी देवाला ५० घागरी पाणी घातले जाते. त्यानंतर षोडशोपचार पूजा होते. दुपारी बारा वाजता देवांची विशेष पुजा बांधली जाते. नंतर देवांना उसाच्या रसाने अभिषेक केला जातो. याशिवाय मंदिरात गुढी पाडव्याचा उत्सव साजरा केला जातो. उत्सवांच्या वेळी देवाची पालखी निघते. यावेळी भाविकांसाठी शेकडो किलो खिचडीचा प्रसाद केला जातो. उत्सवकाळात हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.