भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेय तुळापूर गाव आणि तेथेच उभे आहे संगमेश्वर मंदिर. पुणे जिल्ह्यातील या स्थानाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
या गावाचे जुने नाव नगरगाव. त्यावेळी आदिलशाही दरबारातील प्रधानमंत्री मुरारपंत जगदेव पंडित यांना एक त्वचारोग झाला होता. तो काही केल्या बरा होत नव्हता. तेव्हा हितचिंतकांनी त्यांना तुळापूरला अर्थात त्या वेळच्या नगरगावात असलेल्या स्वामी रुद्रनाथ महाराज यांच्याकडे जाण्यास सांगितले. स्वामींच्या उपचाराने मुरारपंतांची व्याधी नाहीशी झाली. त्यावर आपला कसा सन्मान करू, असे मुरारपंतांनी स्वामींना विचारले. स्वामींनी भग्न झालेल्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या विनंतीनुसार मुरारपंतांनी १६३३ च्या सुमारास भव्य मंदिर उभारले. तेच हे आजचे संगमेश्वर महादेव मंदिर.
या त्रिवेणी संगमी असलेल्या तीर्थक्षेत्री काहीतरी दान करावे, अशी मुरारपंतांची इच्छा झाली. तेव्हा हत्तीच्या वजनाएवढे वस्तुदान करण्याचे ठरवण्यात आले. पण, ही तुला करायची कशी, हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा मुरारपंतांचे मित्र शहाजीराजे भोसले अर्थात छत्रपती शिवरायांचे वडील यांनी त्यांना हत्ती बोटीत उभा करून बोट जेवढी बुडेल, तेथे खूण करून तेवढ्याच वस्तू बोटीत ठेवाव्यात, असे सुचवले. त्यानुसार वस्तूंची तुला करून, त्यांनी ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारांनी विधिवत हे तुलादान केले. तेव्हापासून या गावाचे नाव तुळापूर पडल्याचे सांगितले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज बालपणी काही काळ या प्रांतामध्ये वास्तव्यास होते. येथे असताना बालवयातील शिवबा आपले वडील छत्रपती शहाजी महाराज यांच्यासोबत नित्यनेमाने या मंदिरात येत असत आणि संगमेश्वराची पूजा करीत, असा उल्लेख आढळतो. राजमाता जिजाऊही या ठिकाणी पूजा-अर्चा करायला येत असत, असे सांगितले जाते. महाराजांनी अनेक मोहिमा संगमेश्वराचे दर्शन घेऊन फत्ते केल्याचा संदर्भ इतिहासात आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचाही या तीर्थक्षेत्राशी जवळचा संबंध आहे. औरंगजेबाने त्यांना विश्वासघाताने पकडून याच तीर्थक्षेत्री आणले होते. येथेच अनन्वित छळ करून त्यांना जीवे मारण्यात आले. त्यानंतर संताजी, बहिर्जी व मालोजी घोरपडे या शूर मराठा सरदारांनी मुघल सैन्य आणि फितुरांचे अक्षरशः शिरकाण केले. त्यानंतर संगमेश्वर मंदिराच्या बाजूलाच छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी मंदिर उभारण्यात आले. तीर्थक्षेत्र तुळापूरच्या पेशवे काळातील नोंदीही सापडतात. बाजीराव पेशवा आणि मस्तानीमध्ये दुरावा निर्माण व्हावा यासाठी बाजीरावांचे चिरंजीव नारायणराव यांनी मस्तानीला तुळापूर येथे आणले होते. पण, बाजीरावांच्या प्रेमात आकंठ बुडालेली मस्तानी आपल्या प्रेमापासून विलग होऊच शकली नाही.
नानासाहेबांनी कुलदैवत श्री शंकराच्या भक्तीपोटी याच तीर्थक्षेत्री बाणाच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून मंदिराचे बांधकाम केल्याचीही नोंद आहे. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनीही समाधी घेण्यापूर्वी या मंदिरात तीन दिवस अनुष्ठान केल्याचा उल्लेख सापडतो.
तीन नद्यांच्या संगमावर असल्याने या स्थानाचे संगम-ईश्वर अर्थात संगमेश्वर, असे नामकरण झाल्याचे सांगितले जाते. मूळ मंदिर हे यादव काळात एक हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. मूळ हेमाडपंथी वास्तुशैलीतील हे मंदिर चौदाव्या शतकात परकीयांच्या आक्रमणामध्ये उद्ध्वस्त झाले. त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार मुरारपंतांकडून थेट १६३३ मध्ये झाल्याचा उल्लेख आढळतो.
मंदिराभोवती भक्कम संरक्षक भिंत आहे; तर पूर्वाभिमुख भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मंदिराच्या प्रांगणात भलीमोठी दगडी दीपमाळ आहे. जवळच श्री वीर गणपती, श्री भक्त हनुमान यांची छोटी मंदिरे आहेत. मुख्य सभामंडपासमोर सुंदर कलाकुसर असलेला नंदी विराजमान आहे. मंदिरात अखंड पाषाणातील गणपतीची आणि विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे. गाभाऱ्यातील काळ्या पाषाणी खांबांवर कोरीव काम आहे. गाभाऱ्यातील तेजस्वी शिवलिंग आध्यात्मिक प्रसन्नतेची अनुभूती देते.
मंदिराच्या उजव्या बाजूला त्रिवेणी संगम घाटावर जाण्यासाठी दरवाजा आहे; तर डावीकडे श्री रूद्रनाथ महाराजांची संजीवनी समाधी आणि श्री राम मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूस श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर आहे. त्याच्याच बाजूला ओम कोटेश्वराय मंदिर आहे. तसेच आणखी दोन शिव मंदिरेही या परिसरात आहेत. अशी पाच प्राचीन शिव मंदिरे असलेले हे तीर्थक्षेत्र काशी, गया प्रयाग या तीर्थक्षेत्रांच्या बरोबरीचे स्थान म्हणून ओळखले जाते.
कालपरत्वे हे मंदिर जीर्ण झाल्यामुळे १९९३ मध्ये ‘निगुडकर फाऊंडेशन’ने जुना ढाचा न बदलता काम करून, त्यात आखीव-रेखीवपणा आणला. आता हा परिसर रंगरंगोटी, चांगले रस्ते, उद्यान, फूलझाडे, मोठे वृक्ष आदी सुशोभीकरणामुळे प्रसन्न भसतो.
मंदिराच्या बाजूलाच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असल्याने या स्फूर्तिस्थळालाही दरवर्षी हजारो इतिहासप्रेमी भेट देतात. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने परिसराची स्वच्छता आणि सौंदर्याकडे विशेष लक्ष दिले आहे. भक्त निवास, अंतर्गत रस्ते, स्वागत कमान आदी कामांमुळे हे स्थळ आता जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. भाविकांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेता येते.