संगमेश्वर महादेव मंदिर

संगमेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव

हिंदू धर्मात प्रयागराज येथील गंगा, यमुना सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावरील (त्रिवेणी संगम) स्नानाला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या त्रिवेणी संगमावर स्नान केल्यावर मोक्षप्राप्ती होते. त्याचप्रमाणे दोन वा अधिक नद्यांचा संगम जेथे होतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष गंगेचा वास असतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अशा संगमाच्या ठिकाणी फार प्राचीन काळापासून अनेक मंदिरे निर्माण झाली आहेत. त्यापैकीच एक प्रसिद्ध मंदिर पाचोरा तालुक्यातील संगमेश्वर या गावात आहे. हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते

अग्नावती नदी ही पाचोरा तालुक्याची भाग्यविधाती समजली जाते. पाचोरा तालुक्यात उगम झालेली ही नदी येथील हजारो एकर जमिन सुपिक करत तापी नदीला जाऊन मिळते. या नदीवरील संगमेश्वर, नगरदेवळा आणि परिसराला संजीवनी देणारा अग्नावती धरण प्रकल्प याच परिसरात आहे. संगमेश्वर गावाजवळून वाहणारी काग नदी नारली नाला यांचा या मंदिराजवळ अग्नावती नदीशी संगम होतो. त्यामुळे हे क्षेत्र अतिशय पवित्र मानले जाते. या संगमामुळे गावाला मंदिरालाही संगमेश्वर हे नाव पडले आहे. राष्ट्रकुटांच्या पाडावानंतर खानदेशाच्या विविध भागांत यादवांच्या मांडलिक राजांची सत्ता स्थापन झाली. यादव सम्राट रामदेवरायाच्या काळात या भागात हेमाडपंती पद्धतीची अनेक मंदिरे उभारण्यात आली. संगमेश्वर मंदिर हे त्या पैकीच एक आहे. ते .. १९१४ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाकडून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पाचोरा तालुक्यात नगरदेवळा या गावापासून काही अंतरावर संगमेश्वर हे गाव आहे. या गावानजीक नदी संगमावर हे प्राचीन मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेशासाठी रस्त्यालगत एक कमान आहे. प्रांगणात एका उंचवट्यावर मंदिर स्थित आहे. या संगमेश्वर गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आजही खोदकामात अनेक प्राचीन मूर्ती शिवपिंडी सापडतात. अशा खोदकामात सापडलेल्या अनेक मूर्ती शिवपिंडी मंदिरासमोर असलेल्या मारूतीच्या मंदिराच्या बाजूस असलेल्या ओट्यावर ठेवलेल्या आहेत.

संगमेश्वर महादेवाचे मंदिर सहा फूट उंच अधिष्ठानावर उभे आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत ते बांधलेले आहे. मुखमंडप, नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. काही पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या स्वरूपाच्या या मुखमंडपात कक्षासने आहेत त्यावर दगडी स्तंभ आहेत. त्यापुढे असलेल्या नंदीमंडपात नंदीची काळ्या पाषाणातील भली मोठी प्राचीन मूर्ती आहे. या नंदीमंडपाच्या पुढे सभामंडप आहे. पूर्वी या सभामंडपावर मोठे शिखर होते. कालौघात ते नामशेष झाले. त्यामुळे हा सभामंडप आता आकाशमंडपात (वरच्या बाजुने मोकळा) परावर्तित झाल्याचे दिसते. अशा प्रकारे आकाशमंडपाची रचना ही कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडल येथील हरिहरेश्वर मंदिरात आहे. या सभामंडपाच्या उजव्या बाजूला एका देवकोष्टकात गणपतीची प्राचीन मूर्ती आहे. येथे गणपती अन्य देवतांच्या काही प्राचीन मूर्तीही ठेवलेल्या आहेत.

सभामंडपापुढे असलेले अंतराळ हे अंडाकृती आकाराचे आहे. ही रचना दुर्मिळ समजली जाते. त्यावर असणारे वितान षटकोनी आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेली सातस्तरीय द्वारशाखा ही या मंदिरातील सर्वात देखणी कलाकृती आहे. या द्वारशाखेच्या वरच्या बाजूला उत्तरांगेवर आडव्याउभ्या रेषांच्या आधारे नक्षी रेखाटण्यात आलेली आहे. त्याखाली ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. द्वारशाखांच्या मध्यभागी दोन्हीकडे स्तंभशाखा खालील बाजूस द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस अर्धचंद्रशिला किर्तीमुख आहे. गर्भगृहात मध्यभागी अखंड पाषाणातील संगमेश्वर महादेवाची पिंडी आहे. त्यावर वेटोळे घातलेल्या नागदेवतेने छत्र धरलेले आहे. या गर्भगृहात एक गंगास्थान आहे. त्याबाबत असे सांगितले जाते की शेजारी असलेल्या त्रिवेणी संगमातील पवित्र तीर्थ एका गोमुखातून पूर्वी या कुंडात पडत असे

मंदिराच्या बाह्यभिंतीवर रांगोळ्यांप्रमाणे बारीक कलाकुसर केलेले नक्षीकाम आहे. मंदिराचे अंतराळ गर्भगृह हे बाहेरून एखाद्या चांदणीच्या आकाराच्या अधिष्ठानावर उभे असल्याचे भासते. मंदिराच्या आवारात एक विहीर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी परिसरातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात

उपयुक्त माहिती

  • पाचोरा येथून २५ किमी, तर जळगाव येथून ८० किमी अंतरावर
  • पाचोरा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home