रामदास स्वामी यांनी शक्ती आणि अध्यात्माची सांगड घालून तत्कालीन समाजमनाची घडी सावरण्याचे कार्य केले. त्यांचा दासबोध ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि त्यांचे मनाचे श्लोक देखील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी करुणाष्टके, आरत्या आणि स्तोत्रे यांसारखे विपुल साहित्य लिहिले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणाऱ्या अनेक संस्था आजही कार्यरत आहेत. समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी आणि शारीरिक व आध्यात्मिक शक्तीची उपासना वाढवण्यासाठी त्यांनी अकरा मारुती मंदिरांची स्थापना केली. अशा प्रकारे समाज उभारणीसाठी प्रबोधन व संघटनेचे कार्य करणाऱ्या रामदास स्वामींचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. पुढे याच जन्मस्थळाच्या जागी श्री समर्थ संस्थान मंदिराची उभारणी झाली. स्वामींच्या कार्याची स्मृती म्हणून येथे दरवर्षी अनेक भाविक भेट देतात.
हे ऐतिहासिक स्थान सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे आहे. याच गावात चैत्र शुद्ध नवमी शके १५३० म्हणजेच २४ मार्च १६०८ रोजी दुपारी बारा वाजता रामदास स्वामींचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर असे होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव राणूबाई आणि पित्याचे नाव सूर्याजीपंत ठोसर होते. त्यांच्या घरात पूर्वीपासूनच राम मंदिर होते.
त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच रामभक्तीची ओढ लागली. या भक्तीतूनच त्यांचा वैराग्यभाव जागा झाला आणि लग्नाच्या बोहल्यावर मंगलाष्टके सुरू असताना ‘सावधान’ शब्द ऐकताच ते तेथून निघाले. पुढे त्यांनी आजन्म संन्यास धर्माचे पालन केले. त्यांनी स्वतःला रामाचा दास मानले आणि रामदास हे नाव धारण करून रामदासी संप्रदायाची स्थापना केली. त्यांनी देशभर भ्रमण करून समाजात चेतना जागवण्याचे काम केले. समाजकारण, राजकारण, धर्म आणि अध्यात्म या चारही क्षेत्रांत त्यांनी कार्य केले आहे. २२ जानेवारी १६८२ रोजी सज्जनगड येथे स्वामी समाधीस्थ झाले. शंकर श्रीकृष्ण तथा नानासाहेब देव यांनी १९४३ मध्ये या श्री समर्थ मंदिराची सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी केली. या संस्थेकडे स्वतःची सुमारे एक हजार एकर जमीन आहे.
समर्थांच्या वडिलोपार्जित वाड्यात त्यांच्या जन्मस्थानी हे श्री समर्थ संस्थान मंदिर उभे आहे. स्वामींचा मूळ राहता वाडा जीर्ण झाल्यानंतर त्या जागी हे नवीन मंदिर उभारण्यात आले. या मंदिराला मोठी तटबंदी आहे आणि या तटबंदीमध्ये एक मुख्य प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात भाविकांसाठी आसनांची व्यवस्था केलेली आहे. या प्रांगणावर लोखंडी स्तंभांच्या आधारावर पत्र्याचे छत टाकलेले आहे.
या मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. प्रांगणापेक्षा सुमारे दोन फूट उंच असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराला तीन अर्धचंद्राकार पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या भिंतींवर रामदास स्वामींच्या आयुष्यातील विविध प्रसंग चित्ररूपात पाहायला मिळते. भिंतींवरील ही सर्व नक्षी सोनेरी रंगात रंगवलेली आहे. सभामंडपापेक्षा काहीशा उंचावर गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला एक पायरी आहे. याच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आणि ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारात जाळीदार पारदर्शक लाकडी झडपा बसवलेल्या आहेत. गर्भगृहाच्या आत चांदीच्या स्तंभांवर छत असलेल्या मखरातील वज्रपीठावर रामदास स्वामींची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपाच्या छतावर चोहोबाजूने सुरक्षेसाठी कठडा बांधला आहे. गर्भगृहाच्या छतावर वरच्या बाजूला निमूळते होत गेलेले एक उंच आणि गोलाकार शिखर आहे. या शिखराचा वरचा भाग गोल घुमटासारखा आहे. या घुमटाच्या भोवती आमलक स्वरूपातील आठ लहान शिखरे आहेत. घुमटाच्या अगदी वरच्या भागावर आमलक व कळस आहे.
या मुख्य मंदिरापासून थोड्याच अंतरावर एक राम मंदिर आहे. या मंदिराला सुद्धा स्वतंत्र तटबंदी आहे आणि या तटबंदीच्या प्रवेशद्वाराला लाकडी झडपा आहेत.
मुख्य रस्त्यापेक्षा सुमारे एक फूट उंच असलेल्या या प्रवेशद्वाराला दोन पायऱ्या बांधल्या आहेत. या मंदिराची रचना देखील सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. येथील सभामंडप प्रांगणापेक्षा सुमारे तीन फूट उंचावर आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना तुळशीवृंदावने आहेत. सभामंडपामध्ये बाहेरील बाजूने एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले चौकोनी स्तंभ आहेत. मूळ मंदिराला जोडून हे सभामंडप अलीकडच्या काळात बांधण्यात आले आहे. यापुढे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील पाषाणी बांधकाम असलेले गर्भगृह लागते. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीमध्ये प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना देवकोष्टके तयार आहेत. हे गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभामंडप पातळीपेक्षा सुमारे दोन फूट उंच आहे. येथील द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आणि ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. गर्भगृहाच्या आत वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता माता, मारुती आणि गरुड यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. या सर्व मूर्तींना एकत्रितपणे पंचायतन देवता म्हटले जाते. येथे सीतामातेची मूर्ती प्रभू श्रीरामाच्या उजव्या बाजूला आहे. त्यामुळे सीतामातेची पूजा आदिमाया शक्ती स्वरूपात केली जाते. या मूळ चांदीच्या मूर्ती रामदास स्वामींच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या पूजल्या जात होत्या, असे सांगितले जाते.
गर्भगृहाच्या वर पाच थरांचे गोलाकार शिखर बांधलेले आहे. शिखराच्या प्रत्येक थरामध्ये नक्षीदार देवकोष्टके आहेत, त्यांत विविध देवमूर्ती बसवल्या आहेत. शिखराच्या अगदी वरच्या भागावर पद्माकृती आमलक व कळस आहे.
या मंदिरापासून काही अंतरावर गावाच्या वेशीवर एक मारुती मंदिर आहे. कोरीव पाषाणामध्ये बांधलेले हे मंदिर सुमारे चार फूट उंच अधिष्ठानावर आहे. मंदिराच्या समोर अधिष्ठानावरच एका मेघडंबरीमध्ये शिवपिंडीची स्थापना केलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक कासवशिल्प कोरलेले आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अधिष्ठानापेक्षा सुमारे चार फूट उंच असल्यामुळे प्रवेशद्वाराला चार पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आणि ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प, तसेच मंडारकावर कीर्तिमुख कोरलेले आहे. मंदिराच्या आत वज्रपीठावर मारुतीची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती स्थापित आहे. मंदिराच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. शिखराच्या पहिल्या चौकोनी थरावर चारही कोनांवर आमलक स्वरूपातील लहान शिखरे आणि त्यावर कळस आहेत. शिखराचा दुसरा थर गोल घुमटाकार आहे. त्याच्या सर्वोच्च भागावर आमलक आणि कळस आहे.
याच मंदिरात मारुतीने समर्थ रामदास स्वामींना प्रत्यक्ष दर्शन दिले होते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते.
येथील मुख्य वार्षिक उत्सवांमध्ये रामनवमी, हनुमान जयंती आणि दासनवमी यांचा समावेश होतो. या उत्सवांच्या निमित्ताने परिसरातील भाविक समर्थ रामदास स्वामी, मारुती आणि प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जांब गावात येतात. उत्सवांच्या वेळी या तीनही मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, ग्रंथवाचन आणि पारायण यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः रामदासी संप्रदायाचे अनुसरण करणारे भाविक येथे नियमितपणे येतात. दररोज पहाटे ५ वाजता काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होते. सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत श्री समर्थांच्या पवित्र पादुकांना अभिषेक घालण्यात येतो आणि दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांना तीर्थ दिले जाते. दुपारच्या सत्रात मंदिरामध्ये महत्त्वाचे धार्मिक विधी पार पडतात. दुपारी १२.३० वाजता श्री समर्थांची मुख्य नैवेद्य आरती केली जाते. या आरतीनंतर दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत सर्व भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था असते. सायंकाळच्या सत्रात मंदिरामध्ये पुन्हा नियमित विधी सुरू होतात. सायंकाळी ५.०० ते ६.३० या वेळेत श्री समर्थांची सामूहिक उपासना केली जाते. उपासना संपल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्री समर्थांची संध्या आरती होते. संध्या आरती संपताच मंदिरात लगेचच रामनाम आणि समर्थांचा जप केला जातो. या जपानंतर सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्री दासबोध ग्रंथाचे वाचन आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन केले जाते.
रात्रीच्या वेळी भक्तांसाठी दुसऱ्या सत्रातील प्रसादाची वेळ सायंकाळी ८.३० ते ९.३० अशी निश्चित केली आहे. मंदिरातील या संपूर्ण दैनंदिन विधींची सांगता रात्री ठीक १०.०० वाजता श्री समर्थांच्या भावपूर्ण शेजआरतीने होते.
दररोज पहाटे ५ वाजता काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होते. सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत श्री समर्थांच्या पवित्र पादुकांना अभिषेक घालण्यात येतो आणि दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांना तीर्थ दिले जाते. दुपारच्या सत्रात मंदिरामध्ये महत्त्वाचे धार्मिक विधी पार पडतात. दुपारी १२.३० वाजता श्री समर्थांची मुख्य नैवेद्य आरती केली जाते. या आरतीनंतर दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत सर्व भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था असते. सायंकाळच्या सत्रात मंदिरामध्ये पुन्हा नियमित विधी सुरू होतात. सायंकाळी ५.०० ते ६.३० या वेळेत श्री समर्थांची सामूहिक उपासना केली जाते. उपासना संपल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्री समर्थांची संध्या आरती होते. संध्या आरती संपताच मंदिरात लगेचच रामनाम आणि समर्थांचा जप केला जातो. या जपानंतर सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्री दासबोध ग्रंथाचे वाचन आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन केले जाते. रात्रीच्या वेळी भक्तांसाठी दुसऱ्या सत्रातील प्रसादाची वेळ सायंकाळी ८.३० ते ९.३० अशी निश्चित केली आहे. मंदिरातील या संपूर्ण दैनंदिन विधींची सांगता रात्री ठीक १०.०० वाजता श्री समर्थांच्या भावपूर्ण शेजआरतीने होते.