महाकवी तुलसीदास रचित ‘हनुमान चालिसा’मध्ये हनुमान हा सूक्ष्म तसेच विकट रूप धारण करणारा असल्याचे म्हटले आहे. समर्थ रामदास स्वामींनी ‘हनुमान स्तोत्रा’त ‘भीमरूपी’, ‘महाबळी’ या स्वरूपात त्याचे वर्णन केले आहे. सामान्यतः याच वीर हनुमान स्वरूपात त्याची पूजा केली जाते. परंतु राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी प्रदेशांत हनुमानास बालरूपात पूजले जाते आणि म्हणून त्यास बालाजी हनुमान म्हटले जाते. या बालाजी स्वरूपातील हनुमानाचे एक भव्य मंदिर गंगानगर येथे स्थित आहे.
दोन लाख चौरस फूटांच्या भव्य परिसरात वसलेले हे मंदिर सालासर बालाजी मंदिर म्हणून ओळखले जाते. या नावामागील कथा अशी की येथील बालाजी हनुमान हा राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील सालासर येथील बालाजी हनुमानाचे प्रतिरूप आहे. बालाजी हनुमानाचे मूळ स्थान सालासर असल्याचे मानले जाते. त्याबाबत आख्यायिका अशी की अठराव्या शतकात राजस्थानात मोहनदास महाराज नावाचे सिद्धपुरूष होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन हनुमानाने त्यांना मूर्तीरूपात प्रकट होऊन दर्शन देण्याचे वचन दिले. त्यानंतर इ.स. १७५५ मध्ये नागौर जिल्ह्यातील असोटा या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक हनुमानाची मूर्ती सापडली. त्याच रात्री गावच्या ठाकूरला हनुमानाने स्वप्नदृष्टान्त देऊन ही मूर्ती चुरू जिल्ह्यातील सालासर येथे पाठविण्यास सांगितले.
असे सांगण्यात येते की त्याच रात्री हनुमानाच्या आणखी एका भक्तास या मूर्तीबाबचे स्वप्न पडले. त्याने मोहनदास महाराजांना ते सांगितल्यानंतर, महाराजांनी लगेच असोट्याच्या ठाकूरला ती मूर्ती पाठवण्याचा निरोप दिला. हे पाहून ठाकूर आश्चर्यचकित झाला व त्याने मोहनदास यांच्या सूचनेनुसार बैलगाडीतून ही मूर्ती पाठवली. गाडीचे बैल जेथे थांबतील तेथे मूर्तीची स्थापना करण्याची सूचना मोहनदास यांनी केली होती. काही वेळाने हे बैल एका रेतीच्या टेकाडीवर थांबले. त्याच ठिकाणी इ.स. १७५५ मध्ये श्रावण शुक्ल नवमीच्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यानंतर १७५९मध्ये सालासर येथे नूर मोहम्मद व दाऊ नामक कारागिरांकडून महाराजांनी मंदिर बांधून घेतले व त्यात बालाजी महाराजांची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे हनुमानाच्या बालाजी स्वरूपातील या मूर्तीस दाढी-मिशा आहेत.
अकोल्यातील गंगानगर परिसरात वसलेल्या मंदिरातील सालासर बालाजी स्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना १५ एप्रिल २०१४ रोजी, हनुमान जयंतीच्या दिवशी गोविंदगिरी महाराज (किशोर व्यास) तसेच आचार्य बालाकृष्ण शास्त्री (सुजनगड) यांच्या हस्ते करण्यात आली. या मंदिरात रामदरबार, शिवपरिवार तसेच राधा-कृष्णाचेही दर्शन घडते.
या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील भव्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराला एक मुख्य व त्याबाजूला दोन लहान दरवाजे आहेत. प्रवेशद्वारासह या मंदिराचे सर्व काम हे राजस्थानी सेंड स्टोन या विशिष्ट प्रकारच्या पाषाणात केलेले आहे. प्रांगणात सुंदर उद्यान विकसित केलेले आहे. त्यातील सुंदर फुलझाडे व कारंजांमुळे हा संपूर्ण परिसर रमणिय भासतो. उद्यानातील मार्गिकेमधून प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत येता येते.
या मंदिराची स्थापत्यरचना ही राजस्थानमधील मूळ सालासर बालाजी मंदिराप्रमाणे आहे. मुखमंडप, अर्धमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सुमारे १५ पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिरातील मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपाच्या दर्शनी बाजूस चार स्तंभ व त्यातून सभामंडपात जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. या सर्व स्तंभांवर नक्षीकाम आहे. प्रशस्त सभामंडपातील नक्षीदार स्तंभांवर विविध वाद्य वाजवणाऱ्या वादकांची शिल्पे व वितानावर कोरीव काम आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूला सालासर बालाजी, राधा-कृष्ण आणि शिवपरिवार अशी तीन स्वतंत्र गर्भगृहे आहेत. सालासर बालाजीच्या मुख्य गर्भगृहातील सोनेरी मुलामा दिलेल्या मखरात वरच्या बाजूला रामदरबार म्हणजेच श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.
रामदरबाराच्या खालच्या बाजूला सालासर बालाजी हनुमानाची सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. दाढी-मिशी असलेल्या या मूर्तीवर सुवर्णमुकुट व अलंकार आहेत. मूर्तीच्या वरच्या बाजूला चांदीचे छत्र व उजवीकडे चांदीची गदा आहे. या मूर्तीच्या उजवीकडे अंजनीसह बाल हनुमानाची मूर्ती व डावीकडेही हनुमानाची मूर्ती आहे.
या मुख्य गर्भगृहाच्या बाजूला राधा-कृष्ण व शिवपरिवार ही गर्भगृहे आहेत. राधा-कृष्णाच्या गर्भगृहात वज्रपिठावर बासरी वादन करणारा कृष्ण व राधा यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. तर शिवपरिवार गर्भगृहात काळ्या रंगाची शिवपिंडी व शुभ्र रंगाचा नंदी आहे. या शिवपिंडीच्या मागील बाजूला गणपती, कार्तिकेय व पार्वतीमाता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या तिन्ही गर्भगृहांवर उरुशृंग पद्धतीची शिखरे आहेत. याशिवाय मुखमंडपावर एक व सभामंडपावर तीन घुमटाकार शिखरे आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतीवर संत एकनाथ, स्वामी समर्थ, संत कबीरदास, आदी शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आदींची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.
दररोज सकाळी ८ आणि सायंकाळी ७ वाजता मंदिरात आरती केली जाते. सायंकाळी मंदिर परिसर आकर्षक रंगसंगती असलेल्या विद्युत दिव्यांनी उजळून जातो. येथे विविध सण-उत्सव साजरे केले जातात. हनुमान जयंती हा येथील प्रमुख उत्सव असतो. या दिवशी मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक देखावेही मांडण्यात येतात. महाशिवरात्री, रामनवमी, जन्माष्टमी व देवदिवाळी हे उत्सव येथे मोठ्या उत्साहाने पार पडतात. देवदिवाळीच्या दिवशी या मंदिर परिसरात सात ते आठ हजार काचेचे दिवे लावले जातात. यावेळी हा संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. दर शनिवारी सायंकाळच्या आरतीनंतर येथे सुंदरकांडातील श्लोकांचे गायन होते. यावेळी अनेक भाविक येथे उपस्थित असतात. दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ४ ते रात्री ९.३० या वेळेत भाविकांना येथे देवदर्शन घेता येते.