सखाराम महाराज

विठ्ठल-रूक्मिणी मंदिर

अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव

अमळनेर येथील बोरी नदीकाठी असलेले सद्‌गुरू सखाराम महाराज विठ्ठलरुख्मिणी मंदिराचे स्थान हे खान्देशची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. सद्‌गुरू सखाराम महाराज यांनी खान्देशात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले. त्यामुळेच अमळनेरलाश्री क्षेत्र अमळनेरअशी ओळख मिळाली. सखाराम महाराजांची शिष्य परंपराही मोठी आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की वर्षातून एकदा म्हणजे वैशाख शुद्ध एकादशीला प्रत्यक्ष पांडुरंग सखाराम महाराजांच्या भेटीसाठी अमळनेर येथे येतो. त्यामुळे ही एकादशी येथे मोठ्या प्रमाणावर साजरी होते

सखाराम महाराज चरित्र लीलामृतया ग्रंथानुसार, सखाराम महाराज यांचा जन्म १७५७ साली, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला अमळनेरपासून जवळ असणाऱ्या पिंपळी गावात झाला. त्यांच्या आईचे नाव सीताबाई वडिलांचे नाव रामभट होय. लहानपणीच आईवडीलांचे छत्र हरवल्यामुळे सखाराम चुलतभाऊ रंगनाथ याच्याकडे अमळनेर येथे आश्रयाला आले. लहानपणापासून त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा पगडा होता. त्यामुळे रंगनाथने विद्याभ्‍यासासाठी सखाराम यांना अमळनेरकर तात्‍या पंतोजी यांच्याकडे पाठविले. आठवड्याला पसाभर धान्‍य (फसकी), दोन संन्‍या ( ढबू) मोबदला घरातील सर्व प्रकारची कामे करायची अट होती. विद्याभ्यास सुरू असताना तात्या पंतोजी यांना सखाराम यांच्याबाबतीत पहिला साक्षात्कार झाला त्यांना त्यांचे असामान्यत्व समजले. तात्या पंतोजी यांनी सखाराम यांना निरोप देताना म्हटले की

मुल म्‍हणतां नयेचि तुजसी। भुल पडली असे जगासी।

महायोगी तूं जन्‍मलासी। साक्ष आली मजलागी। . /११७

त्यानंतर पुढील शिक्षणासाठी सखाराम महाराज श्रीधरपंतांकडे आले. श्रीधरपंतांनी त्यांना चार वेद, उपनिषदे, सूत्रे, भाष्य, ऋचा, षोडश संस्‍कार वर्णाश्रम पद्धती यांचे शिक्षण दिले.

चोपड्यातील मुरारीभट यांची कन्‍या गंगादेवी हिच्‍याशी सखारामाचा विवाह करावा असा विचार करून श्रीधरपंतांनी मुरारीभटांकडे सखारामासाठी गंगादेवीसाठी मागणी केली. त्यावेळी सखाराम यांचे वय १६ वर्षाचे होते. विवाहाची तयारी सुरू झाली आणि त्यात सहभागी होण्यासाठी रामभटांचे जुने स्नेही विठ्ठलपंत यांच्या रूपात पांडुरंग रुख्मिणीसह उपस्थित राहिले, अशी आख्यायिका सांगण्यात येते. लीलामृतात याबाबत असे म्हटले आहे की लग्‍नविधी पार पडल्यावर विठ्ठलपंत रुक्मिणीसह परत जाण्‍यासाठी निघाले तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग सखाराम यांना म्हणाले

तरी सखारामा ऐवढे करी। धरावी पंढरीची वारी।

येवूनिया आमुचे मंदिरी। भेटी आम्‍हां देईजे।

तुज होईल सद्गुरुजी भेटी। तुटेल जन्‍माची आटाआटी।

एवढे सांगून पांडुरंगांनी सखारामांच्या डोक्यावर हात ठेऊन निरोप घेतला

पांडुरंगाने केलेल्या उपदेशाचा सखारामाच्‍या मनावर खोलवर परिणाम झाला. संसारात त्यांचे मन रमेनासे झाले. अशीच सहा वर्षे निघून गेली. त्यांना एक मुलगा होता, पण पत्नी आणि मुलगा अल्पायुषी ठरले. त्यानंतर त्यांनी पंढरपुरची वारी सुरू केली. असे सांगितले जाते की वारीला जाताना परत येण्याची ओढ नसावी, म्हणून ते स्वतःचे घर जाळत असत.

सखाराम महाराज यांच्या भेटीस पांडुरंग अमळनेरास येतात, याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की बेलापूरकर महाराज हे विठ्ठलाचे परमभक्त होते. ते दर एकादशीला पंढरपूरला जात असत. एकदा विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की तू माझ्या भेटीसाठी दर एकादशीला येतोस. पण वैशाख शुद्ध एकादशीला आपली भेट होत नाही. कारण मी त्या दिवशी माझा परमशिष्य सखाराम याच्या भेटीसाठी अमळनेरला जात असतो. तू त्या एकादशीला अमळनेरला येत जा. म्हणजे तेथील वारीत आपली भेट होत राहील. त्याप्रमाणे आजही बेलापूरकर महाराजांच्या शिष्यगणांकडून ही प्रथा पाळली जाते. असे सांगितले जाते की पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि अंमळनेरचे सखाराम महाराज मंदिर यांमध्ये साम्य आहे. पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात ज्याप्रमाणे भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे त्याप्रमाणे अंमळनेरच्या बोरी नदीच्या पात्रात सखाराम महाराजांचे समाधीस्थान आहे. वैशाख शुद्ध १४, सन १८१८ या तिथीला सखाराम महाराजांनी समाधी घेतली. या समाधीस्थानाच्या शेजारी सखाराम महाराज यांचे शिष्य गोविंद महाराज प्रल्हाद महाराज यांची समाधीस्थळे आहेत. समाधीच्या पूर्वेला रामपंचायतन, दक्षिणेला शिवपंचायतन, पश्चिमेला दत्तपंचायतन तर उत्तरेला विष्णू पंचायतन आहे

नदीपात्राला लागून सद्‌गु‌रू सखाराम महाराज विठ्ठलरुक्मिणी मंदिर आहे. कोरीवकाम केलेल्या लाकडी प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या भिंतींवर वरील बाजूस सखाराम महाराजांचा वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे घेवून जाणाऱ्या गुरूशिष्य परंपरेतील संतांची उठावशिल्पे आहेत. या सभामंडपात असलेले लाकडी स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी या सभामंडपात भोवतीने दर्शनरांगेची सुविधा आहे. सभामंडपातून अंतराळात प्रवेश होतो. या दुमजली अंतराळाचे संपूर्ण काम हे लाकडांत आहे. अंतराळाच्या खांबांवर अनेक संतांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. अंतराळात गर्भगृहासमोर असलेल्या दोन स्तंभरांगांमधील जमीन काही इंच खोलगट आहे. येथेही दर्शनरांगेची सुविधा केलेली आहे

प्रदक्षिणामार्ग सोडून येथील गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात संगमरवरी मखरात सखाराम महाराजांनी पंचायतन स्वरूपात देवांची स्थापना केलेली आहे. मध्यभागी विठ्ठलाची मूर्ती शेजारी उजवीकडे राधिका माता आणि डावीकडे रूक्मिणी माता यांच्या मूर्ती आहेत. राधिकामातेच्या उजव्या बाजूला गरूड तर रुक्मिणीदेवीच्या बाजूला हनुमान आहेत. पायथ्याशी दोन्ही बाजूला छोट्या आकारातील पंचधातुचे हत्ती आहेत. याशिवाय गर्भगृहात सखाराम महाराजांनी वापरलेल्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. येथेच मागच्या बाजूला विठ्ठलरुक्मिणी यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत

येथील सभामंडपाच्या शेजारी सखाराम महाराजांचे वास्तव्य ज्या झोपडीत होते ती झोपडी त्यांनी वापरलेल्या वस्तू जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. लाकडी पाट, पाण्याचा तांब्या, सुरई, जेवणाचे ताट, काश्याची भांडी, पायातल्या खडावा अशा काही वस्तू येथे आहेत. एका चांदीच्या वज्रपिठावर सखाराम महाराजांची मूर्ती आहे. याशिवाय मंदिरात गणपती श्रीदत्त यांच्याही मूर्ती आहेत. या मुख्य मंदिराशेजारी गंगादेवी अष्टभुजा माता मंदिर आहे. त्यात वज्रपिठावर अष्टभुजादेवी विराजमान आहे. त्याखालील बाजुला गंगादेवी यांची मूर्ती आहे. गंगादेवी या सखाराम महाराजांच्या अर्धांगिनी होत, असे सांगितले जाते

या मंदिरात दरवर्षी गुढीपाडवा, चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी उत्सव, वैशाख शुद्ध तृतियेला यात्रोत्सव, वैशाख शुद्ध एकादशीला रथोत्सव, वैशाख शुद्ध चतुर्दशीला सखाराम महाराज पुण्यतिथी, जेष्ठ वद्य प्रतिपदेला पंढरपूर वारीसाठी प्रयाण, जन्माष्टमी, विजयादशमी, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. या मंदिराची ख्याती प्रतिपंढरपूर अशी आहे. या ठिकाणी सद्‌गुरू सखाराम महाराज यांचा अजूनही वास आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे

उपयुक्त माहिती

  • अमळनेर बस स्थानकापासून किमी, तर जळगावपासून ५६ किमी अंतरावर
  • जळगाव, धुळे नंदूरबार येथून अमळनेरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात तसेच मंदिराच्या आवारात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९०२८६८८९२८
Back To Home