सखाराम महाराज संस्थान

लोणी, ता. रिसोड, जि. वाशिम

सुमारे पाच लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी झालेल्या अशनीपातातून निर्माण झालेल्या जगविख्यात लोणार सरोवरापासून सुमारे १३ किमी अंतरावर लोणी हे समृद्ध गाव आहे. या गावात सद्‌गुरू सखाराम महाराज यांचे मंदिर आहे. या मंदिरामुळे लोणी गावास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. सखाराम महाराज हे लोणीचे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. महाराजांचे हे स्थान जागृत आहे आणि ते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

‘श्री सखाराम महाराज संस्थान, लोणी’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘श्री सखाराम लीलामृत’ या ग्रंथानुसार, जालना जिल्हयातील तळणी या गावात चैत्र शुद्ध नवमी शके १७०८ म्हणजेच ९ एप्रिल १७८६ रोजी रामनवमीच्या दिवशी सखाराम महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव अहिल्या, तर वडिलांचे नाव बाळशास्त्री होते. वाशिम येथील वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री यांच्याकडे त्यांचे वेदाध्ययन झाले. बाळशास्त्री हे देवीचे उपासक होते. लीलामृतातील कथेनुसार, एकदा प्रत्यक्ष भवानी मातेने बाळशास्त्री यांना दृष्टांत दिला व सांगितले की सखाराम हा साधा विद्यार्थी नाही, तर तो तीन जन्मांचा योगी आहे. बाळशास्त्रींकडे शिक्षण झाल्यानंतर चौदाव्या वर्षी, २१ नोव्हेंबर १८०० रोजी त्यांच्या मनाविरूद्ध त्यांचा विवाह झाला. मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी गृहत्याग केला.

असे सांगितले जाते की वाशिममधील पद्मतीर्थ, रिसोड येथील पिंगळाक्षी देवी मंदिर आणि लोणार येथील कमलजादेवी मंदिर येथे तसेच काशीतील गंगेमध्ये त्यांनी जलस्तंभ योगाद्वारे कठोर तपश्चर्या केली होती. काशी येथे त्यांना साक्षात् भागिरथी देवीने दर्शन दिले होते. यानंतर देशाटन करीत ते पुन्हा लोणी येथे परतले. येथे आल्यानंतर लोणारच्या सच्चिदानंद स्वामींकडून त्यांनी दीक्षा घेतली व ‘योगानंद’ हे नाव धारण केले. त्यांनी घडवलेले चमत्कार पाहून विविध जातींचे लोक त्यांचे भक्तगण बनले. ते अयाचित वृत्तीने राहात. मिळालेल्या अन्नाचा अर्धा हिस्सा ते प्राणीमात्रांना देत आणि उरलेले अन्न भक्षण करत असत. ते मितभाषी होते. महाराष्ट्रातील थोर संत गाडगे महाराज यांच्याप्रमाणेच त्यांना कोणी पाया पडलेले आवडत नसे. ‘पाण्यातील मासा तुपात वाचत नाही, पक्षी बिळात राहू शकत नाही, साप आकाशात उडू शकत नाही, अरबी घोडा नांगराला उपयोगी नाही व बैलावरून युद्ध होत नाही, हे लक्षात घेऊन मनुष्याने निजवृत्ती सांडू नये, कर्तव्यकर्म सोडू नये.’ धर्म म्हणजे नीती आणि सदाचार, असे ते नेहमी म्हणत असत. वयाच्या ९२ व्या वर्षी, २३ नोव्हेंबर १८७८ रोजी त्यांनी समाधी घेतली.

ज्या वटवृक्षाखाली महाराजांनी समाधी घेतली, त्याच जागेवर १८८० साली प्रथम त्यांचे लहान दगडी मंदिर उभारले गेले. यानंतर २५ मार्च १९२५ मध्ये येथे नवे भव्य मंदिर उभारणीच्या कामास प्रारंभ झाला. जुन्या मंदिराचे दगड वापरून आग्नेय दिशेस असलेल्या सखाराम वाटिकेतील कुंड बांधण्यात आले. विशेष म्हणजे, त्या जुन्या मंदिराचा दरवाजा तसेच काही दगडी अवशेष येथे अजूनही जतन करून ठेवण्यात आले आहेत. सखाराम महाराजांचे हे मंदिर एखाद्या भुईकोटासारखे भासते. यास उंच दगडी तटबंदी आहे. मंदिराचा प्राकार विस्तीर्ण आहे. प्राकारास भव्य असे दगडी बांधणीचे महाद्वार आहे. आत मध्यभागी सखाराम महाराजांच्या मंदिराची भव्य वास्तू उभी आहे. येथे दुमजली सभामंडप आहे. अनेक कमानी असलेला हा सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. त्याच्या वरच्या मजल्यास सज्जा आहे. त्याच्या कठड्यास विविध पौराणिक चित्रे लावलेली आहेत. येथून मुख्य मंदिरात प्रवेश होतो. हे मंदिर पूर्णतः काळ्या पाषाणात, मराठा स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. त्याचे प्रवेशद्वार एखाद्या मखरासारखे अत्यंत कलात्मकरीत्या सजवण्यात आलेले आहे. आत कोरीव कलाकुसर केलेल्या चांदीच्या अधिष्ठानावर सखाराम महाराजांचा चांदीचा मुखवटा प्रतिष्ठापित केलेला आहे. सखाराम महाराजांचे हे दगडी मंदिर एकूण ९० फूट उंचीचे आहे. त्यावर मराठा शैलीतील त्रिस्तरीय शिखर आहे. शिखरातील देवकोष्ठकांत दशावताराच्या मूर्ती विराजमान आहेत.

मुख्य मंदिराच्या बाजूलाच विठ्ठल-रूक्मिणी, गणेश, श्रीराम-सीता-लक्ष्मण यांचीही मंदिरे आहेत. प्राकारात सखाराम महाराजांनी वास्तव्य केलेला वाडा आहे. या वाड्यात सागवानी खांब आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशयोजना केलेली आहे. तेथे सखाराम महाराजांचे वंशज राहतात. सखाराम महाराजांनी जेथे तप केले, ते लोमेश्वर महादेवाचे दगडी मंदिरही येथे आहे.

मंदिराच्या आवारात एका खुल्या दालनात यात्रा-उत्सवांत वापरली जाणारी स्वयंपाकाची जुनी भांडी मांडली आहेत. १८५७ पासून सखाराम महाराजांनी येथे सर्वांना मोफत अन्नदानाची परंपरा सुरू केली होती. त्याची स्मृती या भांड्यांद्वारे येथे जतन केलेली आहे. येथे आजही संस्थानाच्या वतीने अखंड मुक्त अन्नदान केले जाते व भक्तांच्या जेवण्याची व निवासाची विनामूल्य व्यवस्था केली जाते. येथे एका ओवरीतील भिंतीवर काही छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले आहे. यात सखाराम महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा छायाचित्रांच्या माध्यमातून माहितीपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी येथे चुन्याचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी येथेच चुन्याचा घाणा लावण्यात आला होता. त्या घाण्यासाठी वापरण्यात आलेले वैशिष्ट्यपूर्ण चाकही येथे पाहता येते.

मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथे सकाळी ८ ते ११ या काळात महाराजांना अभिषेक घातला जातो. सकाळी ११.४५ व सायंकाळी ७ वाजता (एप्रिल ते सप्टेंबर या काळात सायं. ७.३० वा.) आरती होते. दुपारी १ पासून नैवेद्य दाखवून प्रसादाचे वाटप सुरू होते. येथे चैत्र शुक्ल प्रतिपदा ते षष्ठी या काळात रामायणकथा असते. रामनवमीला श्रीराम जन्मोत्सव व सखाराम महाराज जन्मोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला येथून सखाराम महाराजांच्या लोणी येथील प्रथम आगमन स्थळाकडे दिंडी नेली जाते. याशिवाय येथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे यात्रोत्सव होय. या उत्सवास कार्तिक वद्य पंचमीपासून प्रारंभ होतो. तो मार्गशीर्ष शुद्ध तृतीयेपर्यंत चालतो. या काळात कार्तिक वद्य १४ रोजी सखाराम महाराजांचे श्राद्धकार्य असते, तर कार्तिक वद्य अमावस्येस त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. पुण्यतिथीच्या दिवशी हजारो भक्तांना शिरा-पुरी आणि भाजी असा महाप्रसाद दिला जातो. या महाप्रसादाच्या वेळी करण्यात येणाऱ्या पूजेचा मान हा गोसावी आणि वंजारी समाजाचा असतो. या पंगतीतील पुरी भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही पुरी घरी साठवलेल्या धान्यात ठेवल्यास कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही, अशी जनश्रद्धा आहे.

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला येथे रथोत्सव होतो. यावेळी तीन मजली लाकडी रथातून मंदिर परिक्रमा केली जाते. वडार, लोहार, सुतार, गवंडी, आदिवासी या पाच मानकऱ्यांना मान देऊन हा रथोत्सव सुरू होतो. काही भाविक नवस पूर्ण करण्यासाठी रथ ओढतात. या रथावर रेवड्या फेकण्याची प्रथा आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी पालखी सोहळा असतो. याचा मान हा परंपरेप्रमाणे सुतार समाजाकडे असतो. वाजतगाजत पालखी मंदिरात आणून सखाराम महाराजांचा मुखवटा त्यात ठेवून त्याची मिरवणूक काढली जाते.

या मंदिर संस्थानाच्या वतीने धार्मिक कार्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यही केले जाते. येथे १९६६ सालापासून सखाराम महाराज विद्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच इंग्रजी माध्यामाची शाळा देखील सुरू करण्यात आली आहे. गरजू व गरीब लोकांसाठी वसतिगृहांची सोय आहे. शिक्षण, निवास, व जेवणाची मोफत सोय करण्यात येते. येथील वाचनालयात जुन्या ग्रंथांचा संग्रह आहे. मंदिराची गोशाळा आहे, त्यातून बायोगॅस आणि खतनिर्मिती करण्यात येते. दरवर्षी या संस्थानामार्फत आरोग्यशिबिरे भरवून गरिबांसाठी नामांकित डॉक्टरांकडून मोफत चिकित्सा आणि औषधवाटप केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • रिसोड येथून २१ किमी अंतरावर
  • वाशिम येथून ६० किमी अंतरावर
  • रिसोड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८८०६८२१९९१, ७७६७०७६७८८

सखाराम महाराज संस्थान

लोनी, ताल. रिसोड़, जिला. वाशिम

Back To Home