रूपा भवानी मंदिर

भवानी पेठ, सोलापूर, ता. जि. सोलापूर

भारतात, विशेषकरून दक्षिण भारतात, शाक्त पंथीय परंपरांचा विशेष प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच दक्षिण भारतात देवीची मंदिरे व शक्तीस्थाने अधिक आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता तुळजाभवानी आहे. या देवीची अनेक नावे व रूपे आहेत. रूपाभवानी हे त्यातीलच एक नाव होय. रूपाभवानीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर सोलापूर शहरात भवानी पेठेत आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराबाबत अख्यायिका अशी की येथील सावकार शाह यांच्या शेतात बंडोबा पुजारी हे शेतमजुरीचे काम करीत. ते पडीक जमिनीची साफसफाई करून नांगरणी करीत असताना नांगराच्या फाळाला लागून पाषाण मूर्ती जमिनीतून वर आली. ती मूर्ती हुबेहूब तुळजाभवानीचे रूप दिसत असल्याने बंडोबा पुजारी यांच्या तोंडून रूपाभवानी अशी हाक बाहेर पडली. त्यामुळे तेथे जमलेल्या लोकांनी देवीला रूपाभवानी नावाने संबोधले. जमलेले लोक देवीला साकडे घालू लागले. त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्याने देवी जागृत असल्याची ख्याती शहरभर पसरली. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. पुढे सावकार शाह यांनी या ठिकाणी देवीचे मंदिर उभारले. आजही या मंदिरात बंडोबा पुजारी यांचे वंशज देवीची सेवा करतात.
मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराजवळ पूजा साहित्याची अनेक दुकाने आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष व येथूनच वरील मजल्यावर जाण्यासाठी जीना आहे. मंदिराचे प्रशस्त प्रांगण प्रवेशद्वारापेक्षा खाली असल्याने उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रांगणात असलेल्या लहान उद्यानात विविध प्रकारची फुलझाडे आहेत. मंदिरासमोर पाषाणी बांधणीचा लहान चौथरा व त्यावर पद्मपादुका आहेत. बाजूला मोठ्या चौथऱ्यावर दीपमाळ आहे. दीपमाळेच्या चौथऱ्यावर जीर्ण व प्राचीन शिल्पे आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. खुल्या स्वरूपाच्या सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. सभामंडपात तिन्ही बाजूला एकूण दहा नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात पीठा-मिठाच्या परड्या आहेत. दर्शनाला आलेले भाविक यात जोगवा म्हणून पीठ, मीठ, तेल, धान्य आदी वस्तू टाकतात. सभामंडपात यज्ञकुंड व त्यापुढे चौथऱ्यावर संगमरवरी सिंहशिल्प आणि जमिनीवर कासव शिल्प आहे.
पुढे चार नक्षीदार गोलाकार स्तंभांवर तीन महिरपी कमानी असलेले अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. स्तंभ व त्यावरील कमानी विविध रंगात रंगवलेल्या आहेत. येथे मेजावर पद्मपादुका व देवीचा उत्सव मुखवटा ठेवण्यात आलेला आहे. उत्सवकाळात भाविकांना येथूनच दर्शन घ्यावे लागते. अंतराळ सभामंडपापेक्षा खाली असल्याने दोन पायऱ्या उतरून अंतराळात यावे लागते. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीला लागून प्राचीन शिवपिंडी व शेंदूर चर्चित पाषाण मूर्ती आहेत. येथेच नगारा आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. मंडारकावर किर्तीमुख आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उभ्या धारेची नक्षी असलेले गोलाकार स्तंभ, चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावरील चांदीच्या मखरात रूपाभवानी देवीची मूर्ती आहे. देवीला चांदीचा मुखवटा व अंगावर विविध वस्त्रे व अलंकार आहेत. मूर्तीच्या मागे सुवर्ण प्रभावळीत मध्यभागी शेषनाग व वर कीर्तीमुख आणि मकर तोरण आहे. गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील चार थरांचे शिखर आहे. शिखरावर चारही कोनांवर वानर शिल्पे आहेत. शिखराचा पहिला थर चौकोनी आहे व त्यात चारही बाजूंना प्रत्येकी पाच देवकोष्टके आहेत. शिखराच्या दुसऱ्या थरात चारही कोनांवर प्रत्येकी तीन थरांचे मेघडंबरीसदृश स्तंभ आहेत. शिखराच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या थरात प्रत्येकी बारा देवकोष्टके आहेत. सर्व देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
रूपाभवानी मंदिराच्या बाजूला लहान जोडमंदिरे आहेत. यातील डाव्या बाजूच्या मंदिरात वज्रपिठावर पार्वतीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. देवीच्या हातात त्रिशूल व ढाल आहे. मूर्तीच्या बाजूला वज्रपिठावर शिवपिंडी आहे. उजव्या बाजूच्या मंदिरात वज्रपिठावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती, बाजूला शिवपिंडी, नंदी व नागशिळा आहेत.
रूपाभवानी ही तुळजाभवानीचे रूप असल्याने तुळजाभवानी मंदिरातील सर्व नित्यपूजा व उत्सव येथे साजरे केले जातात. मंगळवारी व पौर्णिमेस देवीचा छबीना काढला जातो. शारदीय नवरात्रोत्सवात रोज वेगवेगळ्या रूपात देवीचा छबीना निघतो. दसऱ्याला देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. यावेळी शहरातील पार्क मैदानात जाऊन देवी सीमोल्लंघन करून पुन्हा पालखीत बसून मंदिरात परत येते. कोजागिरी पौर्णिमेला देवीचा छबीना निघतो. मंदिरात चैत्र नवरात्री व शाकंभरी नवरात्री साजरी केली जाते. वर्षभरातील सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती

  • सोलापूर बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९५६१२५५०५०
Back To Home