रोकडेश्वर मंदिर

पांगरा (शिंदे), ता. वसमत, जि. हिंगोली

रक्षकदेवतांच्या अनेक नावांपैकी रोकडेश्वर किंवा रोकडोबा हे काहीसे कमी प्रचलित नाव आहे. ही रक्षकदेवता ग्रामीण भागात अधिक पाहावयास मिळते. गावात शिरू पाहणाऱ्या आधि-व्याधी व संकटे रोखणारा तो रोकडोबा, या नावाने रक्षकदेवतेला पूजले जाते. मात्र, काही ठिकाणी रोकडा म्हणजेच पैसे देणारा म्हणूनही रोकडोबा ओळखला जातो. रोकडेश्वराची विदर्भ व मराठवाड्यात अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. येथीलच एक प्रसिद्ध मंदिर वसमत तालुक्यातील पांगरा गावात आहे. दर बारा वर्षांनी बदलली जाणारी लाकडाची मूर्ती व जत्रा हे येथील वैशिष्ट्य आहे.

हे मंदिर किती प्राचीन आहे याबद्दल निश्चित माहिती नसली, तरी ते चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असावे, असे येथील ग्रामस्थ सांगतात. अलीकडील काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. हे मंदिर आधुनिक पद्धतीने सिमेंट काँक्रीट वापरून बांधण्यात आले आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी गावातील एक स्त्री नदीकिनारी धुणे धुवायला गेली असताना नदीच्या पाण्यात तरंगणारी रोकडेश्वराची लहान मूर्ती तिच्या बादलीत आली. त्या स्त्रीने मूर्तीला हात लावताच देवाने दृष्टांत दिला की ‘मी फुलदाभा गावातील आहे. मला तुमच्या गावी स्थापित करा आणि दर बारा वर्षांनी बेलाच्या झाडाची नवी मूर्ती करत जा.’

गावातील पेव्हर ब्लॉक आच्छादित रस्त्यालगत हे मंदिर आहे. मंदिरास सुमारे पंधरा फूट उंच भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील विशाल प्रवेशद्वार रस्त्यापेक्षा उंच असल्यामुळे प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. प्रांगणात तटबंदीला लागून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह व मंगल कार्यालय आहे.

सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. सभामंडपास डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार गोलाकार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. अंतराळाकडील दोन स्तंभांवर खाली व शीर्षभागी कमळफुलांची नक्षी आहे. सभामंडपाच्या वितानावर चक्रनक्षी आहे. पुढे सभामंडपापेक्षा सुमारे तीन फूट उंच अंतराळ आहे. भिंतीविरहित अंतराळास तीन पायऱ्या आहेत. अंतराळात चार स्तंभ आहेत. स्तंभांच्या खाली व शीर्षभागी कमळफुलांची नक्षी आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर कासव शिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास दोन अर्धचंद्राकार पायऱ्या आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर पाच सलग मखर आहेत. गर्भगृहात मधल्या अधिक उंच मखरासमोर अर्धचंद्राकार पायरी आहे. मधल्या मखरात रोकडेश्वराची सुमारे साडेतीन फूट उंच शेंदूरचर्चित लाकडी मूर्ती आहे. देवाच्या एका हातात गदा आहे, तर दुसरा हात खाली सोडलेला आहे. देवाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. रोकडेश्वराच्या मखराच्या डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी दोन मखर आहेत. त्यात संत ज्ञानेश्वर, विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम व श्रीदत्तात्रेय यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गात वज्रपीठावर शिवपिंडी, नंदी व इतर स्थानिक देवतांचे पाषाणे आहेत. गर्भगृहाच्या छतावर सुमारे पंधरा फूट उंच चार थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखरात देवकोष्ठके आहेत. त्यात विविध देवांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत. या आमलकावर कळस व ध्वजपताका आहे.

रोकडोबाची यात्रा बारा वर्षांतून एकदा भरते. यात्रेच्या वेळी देवाच्या जुन्या मूर्तीचे विसर्जन करून नवी मूर्ती स्थापन केली जाते. चार ते पाच महिने आधीपासून यात्रेची तयारी सुरू होते. नवी मूर्ती बनवण्यासाठी मूर्ती बनवण्यायोग्य सुमारे चार फूट जाड खोड असलेले बेलाचे झाड आसपासच्या परिसरातून हेरून ठेवले जाते. सुमारे महिनाभर आधी झाड तोडून मंदिराजवळील शेतात आणून सुताराला बोलावणे धाडले जाते. सुतार झाडाच्या खोडातून मूर्ती घडवतो. नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून जुनी मूर्ती विसर्जित केली जाते. यावेळी बारा दिवसांची यात्रा भरते. तेव्हा हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सलग बारा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, जागरण, प्रवचन, मिरवणूक, रिंगण इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बारा दिवस मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी जिल्हाभरातून हजारो भाविक देवाच्या दर्शनाला व नवस फेडण्यासाठी येतात. महाशिवरात्री, शारदीय नवरात्र व सर्व एकादशीला मंदिरात विशेष उत्सवांचे आयोजन करण्यात येते. दर गुरुवार, शनिवार, पौर्णिमा व अमावस्येला मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • वसमत येथून ३३ किमी अंतरावर
  • हिंगोली येथून ३८ किमी अंतरावर
  • वसमत येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही

रोकड़ेश्वर मंदिर

पांगरा (शिंदे), ताल. वासमत, जिला. हिंगोली

Back To Home