उरणजवळील विनायक या गावातील रिद्धी–सिद्धी विनायकाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. इ.स. १३६५ म्हणजेच चौदाव्या शतकातील हे मंदिर ठाणे येथील चक्रवर्ती राजा हंबीरराव याने बांधलेले आहे. कोकण भूमीतील हा भाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. रानवड व अलिबाग–नागाव येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखांत तसा उल्लेख सापडतो. सध्या हे शिलालेख मुंबई येथील संग्रहालयात आहेत. याशिवाय या मंदिरातही हंबीररावाचा शिलालेख असलेली गद्धेगळ आहे. या प्राचीन मंदिरामुळे या गावाचे ‘विनायक’ असे नाव पडल्याचे सांगितले जाते.
उरणपासून साधारणतः ३ किमी अंतरावर असलेल्या विनायक गावात सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. हा परिसर प्राचीन काळी रानवड या नावाने प्रसिद्ध होता. ऐतिहासिक नोंदींनुसार, हा परिसर सातवाहन, त्रैकूटक, कलचुरी, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकुट व शिलाहार यांच्या अमलाखाली होता. चाणजे व रानवड येथील अनुक्रमे इ.स. १२६० व १२५९ च्या शिलालेखांनुसार उत्तर कोकणचा शिलाहार राजा सोमेश्वर दत्त याच्या ताब्यात उरण होते. यानंतर येथे यादवांची सत्ता प्रस्थापित झाली. हंबीरराव हा देवगिरीच्या यादवांचा सरदार होता. त्याने यादवांच्या पडत्या काळात येथे स्वतःचे राज्य स्थापन केल्याचे दिसते. या मंदिरातील सिद्धिविनायक मूर्तीच्या मागील शिलाखंडावर एक २० ओळींचा लेख कोरलेला आहे. सुमारे पाच फूट उंच व दोन फूट रुंद असलेल्या या शिलाखंडावरील लेखात हंबीररावाचा उल्लेख आहे.
हा शिलाखंड म्हणजे गद्धेगळ आहे. शिलालेखात नोंदवलेल्या मजकुराच्या विपरित जो वागेल, त्याच्या घरातील स्त्रियांना दिलेली शिवी वा शाप म्हणजे गद्धेगळ. त्याच्या सर्वांत वरील भागात चंद्रसूर्य व मंगलकलश असतो, तर सर्वांत खाली गर्दभ व स्त्री यांचा संकर चित्रित केलेला असतो. येथील गद्धेगळावरील संस्कृत–मराठी भाषेतील व नागरी लिपीतील मजकूर पुढीलप्रमाणे आहे –
ओं स्वस्ति श्री ईजरत ७६६ सकुसावतु १२८७ विश्वावसु सवं
त्सरे अंतर्गत माघ शुध प्रतिपदापूर्वक समस्तराजावळिसमळंक्रित
स्त्रिठिशुर्कनाणुये राजसां पश्चिमसमुद्राधिपतिरायंकल्लाणविजयराज्ये
श्री स्थानक नियुक्त (?) ठाणे कोंकण हंबिरुराऊ राज्यं क्रोति महा अमात्य
सर्वभा अरिसिही प्रभु तंनिरोपित उरणे आगरे अधिकार्य ईत्यादि विव–
ळवर्तक तस्मिनकाळे प्रवर्तमाने सति क्रयप्रत्रांगमभिलिक्षते यथा उ–
रणे आगरे पडविसे ग्राम वास्ततव्य तस्मिं तटे परक्षेत्रे सिमुकंतासुत आ
जळकेळि समुद्रिं अरिसिहि प्रभु संयुक्ता क्रये दश सवृक्षमाळाकुळस्व–
सिमापर्यंत पर्वमुनिगंधाभ्यांतरग्रह छरिगण समेत्यं राहाट ६ निरंमि
वाडिक्रमें आ जळ कंति सिहिप्रभु क्रये ६ शनम्यो परिक्रया–मयतेच्या
व्रिविसेम ठाकरे सिअईनाकाइनेंयि आरि शतं द्राम आजळ कं नारो ११(?)
कृपातळी क्रोनि क्रो—या अंत्राक्ष स्वामिदेव भट वर्त्तक माईदेकंतमळ
—डि विठळे मठ पडविसे माईदेकं नयियकं रविजक तथा ज्यळउं म्हा
ळे कामकतं काउळे रामदेकंतं उपाध्ये, कान्हुराअेतुमं म्हतारा, माहादु
म्हंतारा पदि म्यतारा आईमककुमाळु म्हतारा —————-
—————- प्रात पुण्यार्था लिखितं मा
हादेवे हं मिळी ल तेहेवां ही पाडारि सिहिप्रभु भियवळी अठि पतां २
धरमकार्यात सोळा जागी घातली उपणु–उपजु —————-
ममकमं परिक्षीजां तवं वमसभुवान । याहं कर छम्मोम्मीमंम
धर मोही पाळति …… श्री. श्री…….
(याच्या पुढे आणखी तीन ओळी आहेत. मात्र त्या आता वाचण्यापलीकडे गेल्या आहेत.)
या शिलालेखात, हिजरी (ईजरत) ७६६ आणि शके १२८७ (म्हणजे इ.स. १३६५) विश्वावसु संवत्सर माघ शुद्ध प्रतिपदा तिथीला पश्चिमसमुद्राधिपती आणि श्रीस्थानकावर नियुक्त असलेल्या हंबीररावाच्या कार्यकाळात झालेल्या खरेदीखताची नोंद आहे. उरण नजीकच्या पडीवसे येथील सागरतीराजवळ असलेली जागा विकल्याची नोंद यात आहे व त्यावेळी हंबीररावाचा महाअमात्य म्हणून अरिसिंही प्रभू कार्यरत असल्याचे दिसते. या लेखाच्या अखेरीस साक्षीदारांचा उल्लेख आहे. या साक्षीदारांची आडनावे वर्तक, उपाध्ये आणि म्हातरा/म्हतारा (म्हात्रे?) अशी आहेत.
या गद्धेगळावरून येथील रिद्धी–सिद्धी विनायक मंदिरास किमान चौदाव्या शतकापासूनचा इतिहास असल्याचे दिसते. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या काळात १७५३ मध्ये येथील घरत घराण्याकडे या गणपतीच्या पूजा–अर्चेची सनद देण्यात आली. ती सनद येथील घरत कुटुंबाकडे आजही पाहायला मिळते. पेशवेकाळातच या मंदिरात गणेशोत्सव सुरू झाला. त्यास आता २५० हून अधिक वर्षे होऊन गेली आहेत.
हिरव्या गर्द वनराईत एका तलावाकाठी रिद्धी–सिद्धी विनायकाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात एक विहीर आहे. येथील प्रांगणाला पेव्हर ब्लॉकची फरसबंदी लावलेली आहे. त्यामुळे हा परिसर आणखी सुंदर भासतो. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस हनुमानाचे मंदिर आहे. सिद्धिविनायक व हनुमान एकमेकांना पाहात असल्याचा भास होतो. सिद्धिविनायकाचे मंदिर पूर्वाभिमुख तर मारुतीचे पश्चिमाभिमुख आहे. सर्वसाधारणपणे मारुतीचे मंदिर हे दक्षिणाभिमुख असते, परंतु येथे मात्र ते पश्चिमाभिमुख आहे. या मंदिरात मारुतीच्या दोन मूर्ती आहेत. त्यातील दुसरी मूर्ती ही येथील श्यामराव नाईक या गृहस्थांना मोरा येथील चिऱ्यांच्या खाणीत सापडली होती.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची संरचना आहे. मुखमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गजराजांची शिल्पे आहेत. मूळ मंदिरासमोर नंतरच्या काळात बांधलेला येथील सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर सज्जा आहे व तेथे जाण्यासाठी दोन बाजूला लाकडी जिने आहेत. गर्भगृहाच्या समोर एक मोठा पितळी मूषकराज आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत स्थानिक देवता आहेत. या गर्भगृहाचे संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे. सभागृहासाठी मात्र सिमेंट–काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. जुन्या मंदिरातील काचेच्या हंड्या सभामंडपात जतन करण्यात आल्या आहेत. मंदिरात होणारे उत्सव व संकष्टी चतुर्थीला त्या प्रज्वलित करण्यात येतात. भिंतीवर वरच्या बाजूला चारही दिशांना हत्तींची रांग व त्यावर कलाकुसर असलेल्या नक्षीची पट्टी दिसते.
गर्भगृहात एका वज्रपीठावर शेंदूरचर्चित विनायकाची मूर्ती आहे. एकाच पाषाणात विनायकासह रिद्धी–सिद्धी कोरलेल्या आहेत, हे येथील वैशिष्ट्य समजले जाते. हा पाषाण साडेतीन फूट उंचीचा; तर अडीच फूट रुंद व आठ इंच जाडी असलेला आहे. विनायकाची मूर्ती साडेतीन फूट उंच आहे. रिद्धी–सिद्धीच्या मूर्ती दोन फूट उंचीच्या आहेत. विनायकाच्या मस्तकी नक्षीदार मुकुट आहे. हातात परशू, अंकुश आहेत आणि मांडीवर ठेवलेल्या हातात मोदक व लाडू आहेत. विनायकाने पीतांबर धारण केलेले आहे व दोन्ही पाय मांडी घालण्यासाठी दुमडलेले आहेत. याच मूर्तीच्या मागे सव्वातीन फूट उंचीचा शिलालेख आहे. या मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या गणेशमूर्तीवर वर्षातील काही दिवस सकाळच्या वेळी थेट सूर्यकिरणे पडतात.
हा गणपती नवसाला पावतो, अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे. उद्योग–व्यवसायात यश, पुत्रप्राप्ती, गृहशांती, कन्याविवाह यासाठी खूप मोठ्या प्रमाणात या गणपतीजवळ नवस बोलले जातात. माघी चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो. याशिवाय प्रत्येक चतुर्थी व अंगारकीलाही येथे भाविकांची रीघ असते. मंदिरात दररोज पहाटे ५.३० वाजता काकड आरती होते. सायंकाळची आरती ७.३० वाजता होते. आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी मंदिरात सायंकाळी भागवत कथा, तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी विनायकाचे दर्शन घेण्याची आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी त्याच्या चरणी प्रार्थना करण्याची येथील ग्रामस्थांची परंपरा आहे.