महामंडलेश्वर, तसेच मंगलवेष्टक या नावांनी प्राचीन काळी ओळखले जाणारे मंगळवेढा शहर आणि तालुका ही संतांची भूमी मानली जाते. कलचुरी बिज्जलाची राजधानी असलेल्या या शहरास मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. विठ्ठलाचे परमभक्त दामाजीपंतांमुळे, तसेच संत चोखामेळा, संत कान्होपात्रा यांच्या वास्तव्यामुळे पुनीत झालेल्या या भूमीमध्ये उभ्या असलेल्या धार्मिक स्थळांतील सर्वांत नवे व प्रसिद्ध मंदिर म्हणजे रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर होय. सन २०२४ मध्ये उभे राहिलेले हे देखणे मंदिर भाविकांप्रमाणेच पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
या मंदिराच्या उभारणीशी माता-पित्याच्या स्वप्नपूर्तीची एक आगळी कहाणी निगडित आहे. या मंदिराची उभारणी येथील अशोक कोळी या गणेशभक्ताने केली. त्यांचे आई-वडिल हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. ते मंगळवेढा येथे घर बांधत असताना, खोदकामामध्ये त्यांना उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती सापडली. ही माहिती त्यांनी एका ब्राह्मण पंडितास दिली. त्यावर, गणपतीने तुम्हाला साक्षात्कार दिला आहे, असे त्याने सांगितले व या ठिकाणी मंदिर बांधून त्यात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी, असा सल्ला त्याने दिला. त्यानुसार १९८३ मध्ये काशीबाई बाजीराव कोळी व त्यांच्या सूनबाई पारुबाई भगवान कोळी यांनी या मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. त्यांच्या मंदिर बांधणीचे स्वप्न पुढे अशोक कोळी व त्यांच्या पत्नी लता यांनी पूर्ण केले.
असे सांगितले जाते की बांधकामासाठी जसजसा निधी मिळत गेला, तसतसे मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मंदिराच्या उभारणीचे काम राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मुंडारा या गावचे स्थपती मोहनलाल सोमपुरा यांनी केले. त्यासाठी त्यांनी मंगळवेढा येथे सुमारे ४० वर्षे वास्तव्य केले. अनेक अडचणींवर मात करीत, आई-वडिलांच्या आग्रहावरून या मंदिराचे काम पूर्ण केले, असे अशोक कोळी सांगतात.
मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर ४० गुंठे क्षेत्रात उभे असलेले हे मंदिर शास्त्रोक्त पद्धतीने वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहे. त्यासाठी राजस्थानातील मकराना येथील कुंभारी पाषाणाचा वापर करण्यात आला आहे.
गणपती आपले माता-पिता शंकर-पार्वती यांना भेटण्यासाठी भव्य मिरवणुकीने जातात. ती मिरवणूक शिवपार्वतीच्या महालासमोर आली असताना प्रवेशद्वारी सूर्यमूषक व चंद्रमूषक त्यांचे स्वागत करतात, अशी या मंदिराची संकल्पना आहे. वाहनतळापासून काहीशा उंचावर असलेल्या मंदिराच्या प्रांगणात मंदिरासमोर एक विहीर व त्यावर सुंदर कारंजे बसविलेले आहे. याशिवाय प्रांगणात दोन अष्टसिद्धी मंगल दीपस्तंभ व दोन तुळशी वृंदावने आहेत. दीपस्तंभांवर ओम, श्री, स्वस्तिक, शंकर, त्रिशूल, कमळ, दीप व मंगल कलश ही आठ शुभचिन्हे कोरलेली आहेत. एखादा राजवाडा भासावा अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराभोवती असलेल्या मोठ्या संगमरवरी आवारभिंतीत नक्षीदार खिडक्या व खालील बाजूस हत्ती, घोडे व उंट यांची शिल्पे असलेली रांग आहे.
मंदिराच्या दुमजली प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व स्वागत करणारी गजराज शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर गणेशमूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूने असलेल्या आवारभिंतीत वरच्या बाजूने बाशिंगी कठडा आहे. या प्रवेशद्वारातून मंदिरासमोरील प्रांगणात प्रवेश होतो. संपूर्ण संगमरवरी फरसबंदी असलेल्या या मंदिराच्या चारही बाजूने ओवऱ्या व त्यातील देवकोष्टकांमध्ये देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, पंचमुखी मारुती, पद्मावतीसह तिरुपती बालाजी, लक्ष्मीनारायण, अष्टविनायकांच्या मूर्ती, विठ्ठल-रुक्मिणी, सरस्वती, शिवपरिवार, रेणुका माता, श्रीराम व सीता, महालक्ष्मी, खंडोबा, दत्तस्वरूप गजानन महाराज, गौतम स्वामी अशा विविध मूर्ती आहेत.
प्रांगणात मध्यभागी उंच अधिष्ठानावर रिद्धि सिद्धी गणेश मंदिर आहे. या अधिष्ठानावर गजथर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सहा पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. येथील मुखमंडप व सभामंडप खुल्या स्वरूपाचे आहेत. मुखंडपासह सभामंडपातील प्रत्येक स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या सर्व खांबांवर वरच्या बाजूने वादक आणि नर्तकींची शिल्पे आहेत.
बंदीस्त स्वरूपाच्या गर्भगृहात मध्यभागी उंच वज्रपिठावर उजव्या सोंडेची गणेशमूर्ती व या मूर्तीच्या बाजूला रिद्धि व सिद्धि यांच्या मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की हे मंदिर पश्चिमाभिमूख असल्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी गणपतीची मूर्ती असलेल्या गर्भगृहात सूर्यकिरणे पडतात.
या मंदिर-संकुलात रिद्धी-सिद्धी महागणपतीच्या मूर्तीसह एकूण ५६ देव-देवता व विविध जाती धर्मांतील साधुसंतांच्या मूर्ती आहेत. या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना १४ फेब्रुवारी २०२४ रोजी शुभ मुहूर्तावर विधिवत पद्धतीने करण्यात आली. मुंबईच्या श्री विठ्ठल रुक्मिणी वेद पाठशाळचे आचार्य वेदमूर्ती प्रसाद जोशी व आचार्य वेदमूर्ती हषिकेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा कलशारोहण व ध्वजस्तंभारोहण सोहळा करण्यात आला. या निमित्ताने १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान येथे तीन दिवसांच्या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या मंदिरात भाविकांबरोबरच पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येत असतात. गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, तसेच गणेश जयंती व गणेशोत्सव काळात मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होते. मंदिरात गणेश याग, महापूजा, दुर्वार्चन पूजा या पूजा केल्या जातात. मात्र यासाठी भाविकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असते. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९.४० वाजेपर्यंत भाविकांना या गणपतीचे दर्शन करता येते. दररोज सकाळी ७ वाजता श्रींची पुजा व आरती, ११.४५ वाजता महानेवैद्य, सायंकाळी ७ वाजता आरती व ९.३० वाजता शेजारती होते.