
रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक नाथ व ८४ सिद्धांपैकी एक सिद्ध होते. त्यांना श्रीदत्तात्रेय, शिव व मत्स्येंद्रनाथांचा आशीर्वाद व सिद्धी प्राप्त होती. गुरू मत्स्येंद्रनाथांच्या आज्ञेने ते माणदेशातील विटा किंवा विठग्रामाच्या नजीक मूळस्थान येथे आले. येथे मठ स्थापन करून त्यांनी आपले अवतारकार्य सुरू ठेवले. येथून ते ज्या–ज्या ठिकाणी गेले, ती सर्व ठिकाणे पुढे मंदिर म्हणून प्रसिध्दी पावली. विटा शहरातील साखरेबुवांचे घर या पैकीच एक आहे. आज या ठिकाणी हजारो भाविक नित्य दर्शनासाठी येत असतात.
गोरक्षनाथांच्या ‘किमयागार’ या ग्रंथावरून पुढे धुंडीसूत मालू या कवीने ‘नवनाथ भक्तिसार’ हा ग्रंथ रचला. आजही महाराष्ट्रात श्रावण महिन्यात असंख्य घरांत त्याचे पारायण होते. या ग्रंथानुसार रेवणनाथसिद्ध हे चमसनारायणांचे अवतार आहेत. त्याच प्रमाणे लिंगायत शैवांच्या काडसिद्धेश्वर परंपरेनुसार, रेवणसिद्धनाथ हे काडसिद्धेश्वर परंपरेचे संस्थापक आणि पहिले काडसिद्धेश्वर मानले जातात. अभ्यासकांच्या मते रेवणसिद्ध हे गोरक्षनाथांचे
समकालिन आहेत. गोरक्षनाथांचा काळ इ.स. १०५० ते ११५० हा आहे. ते रेवानदीच्या तीरावर सहनसारूक नावाच्या शेतकऱ्यास सापडले. त्यामुळे त्यांचे नाव रेवण असे ठेवण्यात आले, असे ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथात म्हटले आहे. या ग्रंथाच्या ३६व्या अध्यायात त्यांची विटेग्रामातील वास्तव्याची कथा सांगण्यात आली असून, ते ‘विटे प्रांतीं। अद्यापपर्यंत नांदतसे।’ असे म्हटलेले आहे.
रेवणसिद्धांच्या येथील मंदिराची आख्यायिका अशी की येथील साखरेबुवा यांच्या घराण्याचे मूळ पुरुष रेवणसिद्धांचे निस्सिम भक्त होते. ते येथून रेवणनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी नित्यनेमाने मूळस्थान येथे जात असत. परंतु वयोमानानुसार त्यांना दर्शनास जाणे अशक्य होऊ लागले, तेव्हा रेवणनाथ स्वतः त्यांच्या घरी आले व म्हणाले की यापुढे तुम्ही मूळस्थानला येवू नये, उलट मीच तुमच्या घरी वर्षातून पंधरा दिवस मुक्कामी व चार खेपा भेटायला येईन. यावेळी रेवणनाथांनी साखरेबुवांच्या हाती आपल्या पादुका दिल्या व आशीर्वाद म्हणून काही नाणी दिली. त्या नाण्यांतून साखरेबुवांनी
रेवणनाथांचा चांदीचा मुखवटा बनवून घेतला व आपल्या घराचे मंदिरात परिवर्तन केले. अलीकडील काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
विटा शहरातील सोनार गल्लीत रस्त्यालगत हे मंदिर आहे. प्रांगणात मंदिरासमोर प्राचीन जोड–समाध्या आहेत. मंदिरासोबतच या समाधी मंदिरांचा देखील जीर्णोद्धार कऱण्यात आला आहे. सुमारे तीन फूट उंच जगतीवर सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपास समोर, डाव्या व उजव्या बाजूला अशी एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. तिन्ही प्रवेशद्वारांसमोर, सभामंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रत्येकी सात पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूला असलेल्या नक्षीदार चौकोनी स्तंभांवर वरील बाजूस कमळ फुलांची नक्षी व दीपकोष्टके आहेत. द्वारशाखेजवळ दोन्ही बाजूस उभ्या धारेची नक्षी असलेले व वर निमुळते होत गेलेले गोलाकार स्तंभ आहेत. हे स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. 
येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. वितान घुमटाकार व छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपात जमिनीवर कासव शिल्प आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व ललाटपट्टीवर पर्णलता व पुष्पलता नक्षी आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके आहेत.
गर्भगृहात वज्रपिठावर मखर व त्यात देवाचा मुखवटा आहे. येथे देवाची सिंहासनारूढ, अश्वारुढ अशी विविध रूपात पूजा बांधली जाते. देवास उंची वस्त्रे, अलंकार व डोक्यावर फेटा परिधान केलेला असतो. येथे देवाची पितळी पदकमले ठेवलेली आहेत. देवाच्या मागे चांदीच्या प्रभावळीवर मध्यभागी कीर्तिमुख आहे. दोन्ही बाजूंना पानाफुलांच्या नक्षी आहेत. मखराच्या दोन्ही बाजूंस उत्सव काळात व पालखी मिरवणुकीत वापरले जाणारे देवाचे पितळी मुखवटे आहेत. वज्रपिठासमोर खालील बाजूस मारूतीची शेंदूरचर्चित
पाषाणमूर्ती आहे. वज्रपिठाच्या दोन्ही बाजूंना पितळी समया आहेत. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूला प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाचे वितान नक्षीदार अष्टकोनी आहे.
मंदिराच्या बाह्य बाजूला असलेल्या प्रत्येक खिडकीच्या दोन्ही बाजूला नक्षीदार स्तंभ व स्तंभांवर सज्जा आहे. मंडोवरावर देवकोष्टके व खालील बाजूस गोमुख प्रणाली आहे. मंदिराच्या छतावर बारा कोनांवर बारा लघुशिखरे आहेत. सभामंडपाच्या छतावर मध्यभागी घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर भूमीज शैलीतील तीन थरांचे शिखर आहे. त्यात स्तंभनक्षी, उभ्या रचनेचे कूट शिखर व आडव्या रचनेचे शाल शिखर आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी कळस व त्यावर ध्वजपताका आहे.
महाशिवरात्र हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीला मूळस्थान येथील मंदिरातून देव पंधरा दिवसांसाठी या मंदिरात राहण्यासाठी येतात. याशिवाय अश्विन मासात नवान्न पौर्णिमेस, दसरा, तसेच गुरू पौर्णिमा व दत्त जयंती या चारही वार्षिक उत्सवांच्या वेळी देव पालखी मिरवणुकीने या मंदिरात येतात. प्रत्येक पालखी सोहळ्याच्या वेळी मंदिरात देवांची साग्रसंगीत पूजा केली जाते. येथील देव व मूळस्थान येथील देव अशा दोन पालख्या काळेश्वर महादेव मंदिरात जातात. तेथे पालख्यांची शर्यत होते. या मंदिरातील पालखी व गावातील इतर पाच पालख्या तेथूनच परत गावाकडे येतात. मूळस्थान येथील पालखी पुन्हा मूळ मंदिरात पोहोचते. सर्व उत्सवांच्या वेळी राज्यभरातून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. मंदिरात सोमवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची गर्दी असते.