
पंढरपूरचा विठोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्यामुळे सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सोलापूर शहरात लिंगायत समाजातील थोर सिद्धपुरूष रेवण सिद्धेश्वर यांचे प्राचीन मंदिर स्थित आहे. रेवण सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे गुरू होत. ते काडसिद्धेश्वर परंपरेचे संस्थापक मानले जातात. रेवणसिद्ध हे आजही भक्तांच्या हाकेला धावून येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे लिंगायत/वीरशैवांप्रमाणेच या मंदिरात अन्य समाजातील भाविकांचीही नेहमी गर्दी असते.
रेवणसिद्ध हे वीरशैव परंपरेतील पंचमहासिद्धांपैकी एक मानले जातात. वीरशैवपंथी ग्रंथांनुसार, शिवाच्या पाच मुखांतून रेवणाराध्य, मरूळाराध्य, एकोरामाध्य, पंडिताराध्य आणि विश्वाराध्य हे पंचमहासिद्ध होत. त्यांना पंचमहाआचार्य असेही म्हणतात. ‘सिद्धांतसार’ या ग्रंथानुसार रेवणसिद्ध हे सोमेश्वर लिंगातून अविर्भूत झाले. आंध्रप्रदेशातील कोलिपाक येथे ही घटना घडली असे सांगण्यात येते. रेवणसिद्ध यांनाच काडसिद्ध असे म्हटले जाते. त्याविषयी आख्यायिका अशी की रेवणसिद्ध व मरूळसिद्ध अनेक सिद्धांसह करवीरक्षेत्री तीर्थयात्रा करीत आले. तेथे माई नावाची एक योगिनी होती. ती सर्व सिद्धांना घाबरवून त्यांना विष प्यायला लावत असे. तेथे मरुळसिद्धांच्या सांगण्यावरून रेवणसिद्धांनी विष प्यायले. परंतु त्यांना काहीच झाले नाही. अशा रितीने त्यांनी माईचा पराभव केला. या कृत्यामुळे त्यांना काडसिद्ध असे नाव पडले.
प्रख्यात संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या ग्रंथात असे म्हटले आहे की रेवणसिद्ध हे प्रथमतः नाथसिद्ध होते. धुंडीसूत मालू या कवीने रचलेल्या ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथानुसार रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी आठवे
नाथ आहेत व ते चमसनारायणांचे अवतार आहेत. अभ्यासकांच्या मते ते गोरक्षनाथांचे समकालीन होते. गोरक्षनाथांचा काळ इ.स. १०५० ते ११५० हा आहे. कळचुरी घराण्याचा संस्थापक बिज्जल याच सुमारास (११३० ते ११६८) होऊन गेला. रेवणसिद्धांनी या बिज्जलास धडा शिकवला होता, अशी एक कथा आहे. या अहंकारी राजाने एकदा रेवणसिद्धांच्या झोळीत (जोलिगे) उकळते तांदूळ टाकले. त्या बरोबर बिज्जलच्या राजवाड्यास आग लागली. बिज्जलाने रेवणसिद्धांची क्षमा मागितल्यानंतरच ती आग विझली. या कथेवरून रेवणसिद्धांचा काळ बाराव्या शतकातील ठरतो. मंगळवेढा ही बिज्जलाची आधीची राजधानी होती. तेथून रेवणसिद्ध सोन्नलगी म्हणजे आजच्या सोलापूरमध्ये आले. येथे ते किरटेश्वर मठाशेजारी असलेल्या वाड्यात राहिले. तेथे त्यांच्या पादुका उमटल्या. तेच जुने रेवण सिद्धेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. याच काळात त्यांनी मुद्युगौडा आणि सुग्गल देवी या वयोवृद्ध दाम्पत्याच्या निवासस्थानीही भेट दिली. गुरु रेवणसिद्ध यांनी या दाम्पत्याला पुत्रजन्माचा आशीर्वाद दिला आणि या दाम्पत्याच्या पोटी पुढे शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांचा जन्म झाला. सिद्धरामेश्वर यांनी लिंगायत धर्मसंस्थापक बसवेश्वरांपासून प्रेरणा घेऊन सोलापूर पंचक्रोशीत मोठे धार्मिक व सामाजिक कार्य केले.
रेवणसिद्धेश्वर हे पुढे मोतीबागेतील निसर्गरम्य आणि शांत परिसरात वास्तव्यास आले. येथे ते ध्यान आणि लिंगपूजा करीत असत. याच ठिकाणी सध्याचे रेवणसिद्धेश्वर मंदिर आहे. त्यांनी देशभर धर्म आणि शिवआराधनेचा प्रचार आणि प्रसार केला. अनेक शिष्यांना लिंगदीक्षा दिली. काही काळाने त्यांनी रुद्रमुनीश्वर यांना पट्टाधिकार दिला व ते ज्या ठिकाणाहून प्रकट झाले होते त्याच सोमेश्वर लिंगात पुन्हा विलीन झाले, अशी कथा आहे.
रेवणसिद्ध मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. मंदिराभोवती असणाऱ्या उंच दगडी
तटभिंतीमुळे ही वास्तू किल्ल्यासारखी भासते. लांबून केवळ तटभिंतीच्या आत असलेल्या मंदिराचे शिखर दिसते. तटभिंतीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. तटभिंतीच्या आतील बाजूने ओवऱ्या आहेत. दगडी फरसबंदी असलेल्या या प्रांगणात एक दीपमाळ आहे. सोलापूरमधील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिराप्रमाणेच या मंदिराजवळही नंदीध्वज आहे. रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लहान लहान मंदिरे आहेत. त्यामध्ये गणपती, दक्षिणमुखी हनुमान, नागदेवता व सिद्धराम स्वामींनी सोलापूर परिसरात स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांपैकी ६४ वे लिंग आहे.
मुख्य मंदिरातील रेवणसिद्धेश्वराचे लिंग तळघरात आहे. त्यासाठी अरूंद प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात यावे लागते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर खालच्या बाजूला किर्तीमुख व ललाटबिंबावर गणेशपट्टी आहे. गर्भगृहात पंचमुखी लिंग आहे. यातील लिंग व पिंडी पितळी पत्र्याने मढविलेली आहेत. या तळघराच्यावर असलेल्या गर्भगृहात नंदी विराजमान आहे. मंदिराच्या शिखराच्या चारही बाजूने नंदीशिल्प आहेत. शिखरावरील चार थरांमध्ये असलेल्या देवळ्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत व त्यावर लहान लहान कळस आहेत. शिखराच्या अग्रभागी आमलक व त्यावर पितळी कळस आहे.
दर रविवारी व सोमवारी या मंदिरात रेवणसिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. दर रविवारी येथे महाप्रसाद असतो. वर्षातून दोनदा येथे यात्रा असते. मकरसंक्रांत आणि श्रावणात भरणाऱ्या यात्रेवेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यात्राकाळात सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराची पालखी व मूर्ती या मंदिरात आपल्या गुरुंच्या दर्शनासाठी येते.