राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा शहरापासून सुमारे तेरा किमी अंतरावरील आडगाव राजा येथे रेणुकामातेचे प्राचीन मंदिर आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारलेल्या या मंदिरात विराजमान असलेल्या रेणुका मातेसमोर जिजाऊंच्या मातोश्री म्हाळसाबाई यांनी कन्यारत्नासाठी नवस केला होता. नवसपूर्तीनंतर त्यांनी संपूर्ण गावात हत्तीवरून साखर वाटली होती, अशी लोकश्रुती आहे. या मंदिराला लागूनच लखुजीराजे यांनी बांधलेला तलाव आहे. तो आजही या गावाची तहान भागवतो. या मंदिराच्या परिसरात चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते आणि शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान नऊही दिवस येथे रेणुकामातेचा जागर केला जातो.
लखुजीराजे जाधव यांना मूर्तजा निजामशहाकडून दहाहजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन प्राप्त झाले होते. आडगाव हे त्यांच्या वतनदारीतील एक महत्त्वाचे गाव होते. लखुजीराजे यांना दत्ताजी, अचलोजी, बहादूरजी आणि रघुजी हे चार पुत्र होते. दत्ताजींना देऊळगाव राजा, अचलोजींना मेहुणा राजा, बहादूरजी यांना किनगाव राजा तर रघुजी यांना आडगाव राजाची जहागिरी देण्यात आली होती. सिंदखेड राजा शहराच्या चारही दिशांना, सुमारे १३ किमी अंतरावर ही गावे वसलेली आहेत.
या गावांमध्ये राजे घराण्यातील व्यक्तींचे वास्तव्य राहिल्यामुळे या चारही गावांच्या नावापुढे ‘राजा’ हा शब्द जोडला गेला आहे. या गावात लखुजीराजे यांच्या काळात बांधण्यात आलेला एक ऐतिहासिक भुईकोट आहे. लखुजीराजे यांचा शस्त्रसाठा त्यांचे थोरले बंधू राजे जगदेवराव यांच्या ताब्यात याच गावात असे. त्याची साक्ष देणारी भूमिगत तळघरे या कोटाच्या आत आजही पाहायला मिळतात. कालौघात हा भुईकोट भग्न झाला असला, तरी हे गाव या कोटाच्या सभोवार पसरलेले आहे. घडिव दगडात सुमारे १५ फूट उंचीची तटबंदी असलेल्या या भुईकोटाची रचना दशकोनी आकाराचा परकोट व मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर चौकोनी आकाराचा बालेकिल्ला अशा दोन भागांत करण्यात आली आहे. या परकोटाच्या तटबंदीत एकूण चौदा बुरुज होते, त्यांपैकी दोन बुरुज आता पूर्णपणे नष्ट झाले आहेत. आडगाववरून सिंदखेड राजा येथे जाणारा भुयारी मार्गही असल्याचे जुने लोक सांगतात.
या गावात प्रवेश करताच रेणुका मातेचे प्राचीन मंदिर लक्ष वेधून घेते. हे मंदिर नेमके केव्हा बांधण्यात आले, याचा निश्चित इतिहास उपलब्ध नाही; मात्र बाराव्या-तेराव्या शतकात हेमाडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर उभारण्यात आले असावे, असे मानले जाते. लखुजीराजे यांना चार पुत्र होते, मात्र कन्यारत्न नव्हते.
त्यामुळे त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांनी या मंदिरात रेणुका देवीसमोर नवस केला. ‘कन्यारत्न झाल्यास संपूर्ण गावात हत्तीवरून साखर वाटेन’, असे त्यांनी देवीला साकडे घातले होते. जिजाऊंच्या जन्मानंतर म्हाळसाबाई यांनी गावात हत्तीवरून साखर वाटून नवस फेडला, अशी आख्यायिका या भागात प्रसिद्ध आहे.
मंदिराला लागूनच लखुजीराजे यांच्या काळात बांधलेला तलाव आहे. मंदिरासमोर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेले प्रांगण आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. या मंदिरात एक शिवालयही आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना सुबक स्तंभशाखा आहेत. कालौघात मंदिराच्या सभामंडपाची काही प्रमाणात पडझड झाली असल्याने छतावरील काही भागात पत्र्यांचे छप्पर टाकण्यात आले आहे. सभामंडपात अनेक दगडी स्तंभ आहेत. दगडी स्तंभपादांवर उभ्या असलेल्या या स्तंभांवर विविध आकार कोरलेले आहेत. मंदिरावर बाह्यभागात फारसे कोरीव काम नाही, परंतु सभामंडपातील भिंतींवर अनेक देवकोष्ठके कोरलेली आहेत. त्यात काही देव-देवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत.
डावीकडे असलेल्या एका मोठ्या देवकोष्ठकात शेषशायी विष्णू व लक्ष्मीची प्राचीन मूर्ती पाहायला मिळते. या देवकोष्ठकाच्या खालील बाजूस कोरीव काम असलेली पाषाणी शिळा आहे. पूर्वी मंदिरात असलेल्या मूळ मूर्तीचा हा भाग असावा, असा कयास बांधता येतो. वरच्या भागात असलेल्या वितानावर सुंदर कलाकुसर आहे. अंतराळातील देवकोष्ठकात गणेश व इतर देवतांच्या मूर्ती आहेत आणि येथील वितानावरही सुंदर कलाकुसर केलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारस्तंभ कोरलेले आहेत. गर्भगृहात दगडी देव्हाऱ्यात रेणुका मातेचा मोठा शेंदूरचर्चित तांदळा विराजमान आहे. त्यावर नाक, डोळे, कान, ओठ तसेच पाय कोरलेले आहेत. मंदिरात असलेल्या शिवालयाच्या अंतराळातील एका देवकोष्ठकात नागदेवतेची तर दुसऱ्या देवकोष्ठकात अन्य एक मूर्ती आहे. तीन-चार पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. आत मोठ्या शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. रेणुका मातेच्या मंदिरावर तसेच शिवालयावर स्वतंत्र शिखरे आहेत. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी परिसरात छोटे भक्तनिवासही उभारण्यात आले आहे.
या मंदिरात चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. परिसरातील अनेक भाविक या यात्रेदरम्यान देवीच्या दर्शनासाठी येतात. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान नऊही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सायंकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात येते. त्यानंतर कीर्तन, गायन, दांडिया नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या उत्सवादरम्यान अनेक दानशूर व्यक्तींकडून भाविकांना दररोज मोफत फराळ तसेच सुमारे तीन क्विंटल खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. रात्री भजन व देवीचा जागर केला जातो.