महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधील रेणुका माता आणि नांदेडच्या माहूरगडची रेणुका माता एकच. चांडवडमधील हे प्राचीन रेणुका मातेचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ही माता दिवसभरात त्रिविध म्हणजे तीन रूपांमध्ये (बालरूप, तरुणी, वृद्ध) दिसते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराबाबतची आख्यायिका अशी की रेणुका माता ही ऋषी जमदग्नी यांची पत्नी, तर भगवान परशुराम यांची माता होती. ती रोज पतीस नदीवरून पाणी आणून देत असे. एक दिवस रेणुका मातेला येण्यास उशीर झाला. ऋषी जमदग्नी यांनी अंतर्मनाने पाहिले असता रेणुका नदीवरील राजा आणि राणी यांची जलक्रीडा पाहण्यात दंग झालेली त्यांना दिसली. रेणुका मातेच्या या कृतीचा जमदग्नी यांना भयंकर राग आला व त्यांनी पुत्र परशुराम यांना माता रेणुकेचा वध करण्याची आज्ञा केली. पितृआज्ञा शिरसावंद्य मानून परशुरामाने आपल्या आईचे शिर धडावेगळे केले. यातील धड हे माहूरगड येथे, तर शिर हे चांदवड येथे पडले. त्यामुळेच या दोन्हीही ठिकाणी रेणुका मातेचे स्थान आहे. आजही माहूरला रेणुकादेवीच्या केवळ पादुका, तर चांदवडला केवळ मस्तक पाहायला मिळते.
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे तांबकडा डोंगराच्या कुशीत रेणुका मातेचे हे स्थान आहे. मंदिराबाहेरील प्रांगणात दोन दगडी दीपस्तंभ, तुळशी वृंदावन, यज्ञकुंड, तीर्थ तलाव आहे. मंदिरापुढील भिंतीचे बांधकाम घडीव दगडात करण्यात आले आहे. भव्य तटबंदीयुक्त प्रवेशद्वारातून आत आल्यावर एखाद्या गुहेत आल्याचा भास होतो. मंदिर परिसर प्रशस्त आहे. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सभामंडप बांधले आहेत. हे सभामंडप तसेच मंदिराचा गाभारा संपूर्ण दगडात कोरलेला आहे. सभामंडपातील देवड्यांमध्ये गणपती, आदिमाया, महादेवी यांच्या मूर्ती आहेत. एका लहानशा जागेत मारुतीचे मंदिर आहे.
गाभाऱ्यात रेणुका मातेची तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आहे. शेंदूर लावलेला शिळेचा भाग म्हणजे देवीचे शिर असून त्याला डोळे, नाक, तोंड आहेत. देवीला नथ व मुकुट घातले जाते. देवीचा मुखवटा सुमारे दोन किलो सोन्यापासून बनविण्यात आला आहे. रेणुकादेवीच्या मूर्तीच्या शेजारीच परशुरामाचे स्थान आहे.
हे मंदिर आधी गुहेच्या स्वरूपात होते. सध्या जे मंदिराचे भक्कम दगडी बांधकाम दिसते ते अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केल्याच्या नोंदी आहेत. अहिल्यादेवी रेणुका मातेच्या उपासक होत्या. त्यांचा रंगमहाल म्हणजेच आताचा होळकर वाडा, या मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. असे सांगितले जाते की या वाड्यातून मंदिरात जाण्यासाठी एक भुयारी मार्ग असून सध्या सुरक्षेच्या कारणास्तव तो बंद आहे. यात्रेच्या दिवसांत अहिल्यादेवींची प्रतिमा पालखीतून देवीच्या भेटीला आणली जाते. अनेक वर्षांपासून ही परंपरा आजही येथे सुरू आहे.
या देवीची नवरात्रात मोठी यात्रा भरते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी सकाळी रंगमहालातून एक पालखी निघते. तिच्यात देवीचा मुखवटा व दागदागिने असतात. कडक बंदोबस्तात ही पालखी देवीच्या मंदिरात जाते. दिवसभर देवीचा सोन्याचा मुखवटा व दागदागिने मंदिरात देवीच्या अंगावर असतात. संध्याकाळपर्यंत ही पालखी पुन्हा पोलिस बंदोबस्तात रंगमहालात परत आणण्यात येते. या नऊ दिवसांत येथे देवीची मिरवणूक, महाअभिषेक, आरती आदी धार्मिक कार्यक्रम होत असतात. उत्सव काळात मंदिराला आकर्षक रोषणाई केलेली असते.
नवरात्रीत काळात हजारो स्त्री-पुरुष मोठ्या श्रद्धेने येथे घटी बसतात. या नऊ दिवसांत देवीच्या सानिध्यात राहून पूजाविधी करणे, देवीचे गुणगाण, स्तोत्र, मंत्रोच्चार, सप्तशतीचे पठण आणि महत्त्वाचे म्हणजे नऊ दिवस देवीच्या नावाचा जप करणे; याला ‘घटी बसणे’ असे म्हटले जाते. ही देवी नवसाला पावणारी व मनोकामना पूर्ण करणारी आहे अशी भाविकांची दृढ श्रद्धा असल्याने, हजारो भाविक दररोज येथे दर्शनाला येत असतात.
‘रेणुका देवी ट्रस्ट’च्या माध्यमातून मंदिर परिसरात भक्तनिवास, विश्रामगृहाची सुविधा करण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाकडूनही मंदिर परिसरात वेळोवेळी सुधारणा केली जाते. दर महिन्याच्या पौर्णिमेला देवीची पालखी निघते. तसेच रोज देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली जाते. दररोज सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना गाभाऱ्यात जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेता येते.