जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात सोमठाणा येथे एका उंच टेकडीवर रेणुका देवीचे प्राचीन मंदिर वसलेले आहे. रेणुका देवी ही शाक्तपंथीयांची मुख्य देवता आहे आणि तिला तंत्रमार्गातील आराध्य देवता मानले जाते. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या देवीची देशात अनेक उपपीठे आहेत. सोमठाणा हे त्यापैकी एक महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणाला ‘प्रतिमाहूर’ किंवा ‘धाकटी माहूर’ असे संबोधले जाते. स्थानिक लोक या देवीला ‘जगदंबा’ किंवा ‘विश्वमाता’ म्हणून पुजतात. भाविकांच्या श्रद्धेनुसार ही देवी अत्यंत जागृत, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आणि नवसाला पावणारी शक्ती आहे. बदनापूर आणि परिसरातील अनेक कुटुंबे आपली कोणतीही शुभ कार्ये करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या डोंगरावर येतात.
या मंदिराच्या स्थापनेबाबत विविध पौराणिक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने स्वतः या ठिकाणी देवीच्या तांदळा स्वरूपाची स्थापना केली आणि या परिसराच्या रक्षणाची जबाबदारी देवीवर सोपवली.
दुसऱ्या पौराणिक संदर्भानुसार, हे मंदिर सत्ययुगातील असल्याचे मानले जाते. जेव्हा भगवान महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी आले होते, तेव्हा पार्वतीला सोमठाणा येथील निसर्गरम्य डोंगर परिसर आवडला. तिने येथेच राहण्याची इच्छा व्यक्त केल्याने पार्वतीदेवी रेणुका मातेच्या रूपात आणि महादेव शिवपिंडीच्या स्वरूपात येथे विराजमान झाले. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे मंदिर सुमारे चारशे वर्षे प्राचीन आहे. ऐतिहासिक गॅझेटियर्स आणि सरकारी कागदपत्रांमध्येही या मंदिराचा उल्लेख तालुक्याचे एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून करण्यात आला आहे. मूळ मध्ययुगीन किंवा यादवकालीन हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिराचा काळानुसार अनेकदा जीर्णोद्धार झाला आहे. या परिसरावर निजामाची सत्ता असतानाही मंदिराचे अस्तित्व आणि तेथील पूजाविधी अखंडपणे सुरू राहिल्याच्या ऐतिहासिक नोंदी आढळतात.
जालना – औरंगाबाद मार्गावर सोमठाणा फाट्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान लागते. येथून सुमारे चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. टेकडीच्या पायथ्यापर्यंत पक्की सडक आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत येथे येण्यासाठी सुमारे १५० पायऱ्यांचा मार्ग आणि रस्ता असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी खांब व त्यावर पत्र्याचे वक्राकार छत बसवले आहे.
टेकडीच्या माथ्यावर वाहनतळाची सोय आहे. येथून मुंबईपासून नागपूरपर्यंत जाणारा ‘समृद्धी महामार्ग’ स्पष्टपणे दिसतो. मंदिर परिसराचे अलीकडील काळात सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. प्रांगणात दोन मोठ्या दीपमाळा आहेत. प्रांगणापासून १५ पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात एका चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेल्या सिंहाचे पितळी शिल्प आणि त्यापुढे होमकुंड आहे. सभामंडपात भिंतीलगत भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. पुढे अंतराळ आणि प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृहाची रचना केलेली दिसते. या अंतराळाच्या छतावर विविधरंगी काचेचे नक्षीकाम असलेली मिनाकारी सजावट आहे. गर्भगृहात मध्यभागी देवीची स्वयंभू मूर्ती आहे आणि तिच्या मागे सोनेरी पत्र्यावर नक्षीदार कलाकुसर आहे. मुख्य मूर्तीच्या समोर अंतराळात देवीची उत्सवमूर्ती आहे. गर्भगृहावर असलेले त्रिस्तरीय चौकोनी शिखर वरच्या बाजूला निमुळते होत जाणारे आहे. त्याच्या शिरोभागी आमलक व कळस आहे.
मंदिर परिसरात डोंगरावर बारामाही पाणी उपलब्ध असलेले एक छोटे कुंड आहे. या कुंडातील पाण्यात स्नान केल्यामुळे त्वचारोग किंवा अन्य शारीरिक व्याधी निवारण होतात, अशी श्रद्धा आहे. रेणुका देवी मंदिराच्या समोरील बाजूला महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या प्रवेशद्वारासमोर काळ्या पाषाणातील नंदी आहे. मंदिरात जमिनीवर मध्यभागी शिवपिंड आहे आणि त्यावर तांब्याचा नाग व अभिषेक पात्र ठेवलेले आहे. या मंदिराचे शिखर पॅगोडा प्रकारचे दोन थरांचे आहे. महादेवाच्या मंदिराशेजारी असलेल्या परशुराम मंदिरात अधिष्ठानावर परशुरामाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. पौराणिक संदर्भांनुसार रेणुका मातेला दोन बहिणी आहेत. त्यापैकी एक बहीण याच सोमठाणा डोंगराच्या पायथ्याला वास्तव्यास आहे आणि दुसरी बहीण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाढेजळगाव येथील डोंगरावर स्थित आहे. या तिन्ही बहिणींचे दर्शन घेणे पुण्यकारक मानले जाते.
मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा करण्यात आलेल्या आहेत. नवरात्रीच्या काळात येथे राहणाऱ्या भाविकांसाठी राहुट्यांचे ओटे उभारण्यात आले आहेत. १९६५ मध्ये या ठिकाणी ऊर्ध्व दुधना प्रकल्पाची निर्मिती झाल्यामुळे या परिसराचा कायापालट झाला.
हे धरण या भागातील शेतीसाठी वरदान ठरले आहे आणि येथील निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. सोमठाणा रेणुका माता संस्थानतर्फे येथे वर्षभर ‘अन्नदान’ उपक्रम राबवला जातो. तसेच दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवास आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. पावसाळ्यात या परिसरातील निसर्ग सौंदर्य खुलते, त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते.
मंदिरात शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे दोन मुख्य वार्षिक उत्सव साजरे होतात. या काळात हजारो भाविक देवीची ओटी भरण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्रीत भक्त दहा दिवस परिसरात राहुट्या उभारून मुक्काम करतात. याव्यतिरिक्त चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, श्रावण व मार्गशीर्ष मास, नागपंचमी आणि महाशिवरात्री यांसारखे सण उत्साहात साजरे केले जातात. उत्सवांच्या वेळी भजन, कीर्तन, प्रवचन, देवीचा गोंधळ आणि होम-हवन यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा असते. यावेळी देवीची पालखी मिरवणूक निघते. मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा आणि अमावस्येला दर्शनासाठी येथे मोठी गर्दी असते. मंदिराचे दैनंदिन वेळापत्रक पहाटे पाच वाजता सुरू होते. सकाळी सहा वाजता पहिली आरती, दुपारी बारा वाजता नैवेद्य आणि आरती, तर सायंकाळी सात वाजता धुपारती व शेजारती होते. रात्री नऊ वाजता भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद होतात.