रेणुका देवी मंदिर

खरोसा, ता. निलंगा, जि. लातूर

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील खरोसा हे गाव तेथील ऐतिहासिक लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. याच लेण्यांच्या वरच्या परिसरात रेणुका देवीचे मंदिर वसलेले आहे. येथील रेणुका माता ही देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुका मातेचे जागृत प्रतिरूप मानली जाते. परिसरातील असंख्य भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. कातळात कोरलेल्या या मंदिराची उभारणी खरोसा लेण्यांच्या निर्मितीनंतरच्या काळात झाली असावी, असा अभ्यासकांचा कयास आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार, येथील रेणुका देवीची स्थापना माता सीतेने केली आहे.

लातूर जिल्ह्यास अतिप्राचीन इतिहास लाभला आहे. येथे पुराश्मयुगापासून म्हणजे सुमारे तीन लाख वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व होते, असे पुरावे आढळतात. प्राचीन काळी हे शहर ‘लट्टलूर’ किंवा ‘लत्तनूर’, ‘लत्तलौर’, ‘रतनपूर’ या नावांनी ओळखले जात असे. मौर्यकाळात दक्षिणेकडे १६ महाजनपदे होती, असा उल्लेख ‘अंगुत्तर निकाय’ या ग्रंथात सापडतो. ‘अश्मक’ किंवा ‘अस्सक’ वा ‘आंधक’ महाजनपद हे त्यापैकी एक होते. यातील अश्मक महाजनपदाच्या दक्षिणेकडील ‘कुंतल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात लातूरचा समावेश होता. कालांतराने लातूरचा हा भाग सातवाहन, वाकाटक आणि राष्ट्रकूट यांच्या अमलाखाली आला. या जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे की महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या राष्ट्रकूट घराण्याचे हे मूलस्थान आहे.

लातूरवर बदामीच्या चालुक्यांचीही राजवट होती. काही इतिहास संशोधकांच्या मते, लातूर-बिदर परिसरास ‘चालुक्य देश’ असे संबोधले जाई व यावरूनच बदामीतील राजवंशास ‘चालुक्य’ असे म्हटले जाऊ लागले. बदामीच्या चालुक्यांनी स्थापत्य कलेस मोठा आश्रय दिला होता. लातूर जिल्हा गॅझेटियरनुसार, त्यांच्या काळात खरोसा लेणी खोदण्यात आली. हा काळ इसवी सनाच्या सहाव्या ते आठव्या शतकाचा आहे. या लेण्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच ठिकाणी हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित लेणी आहेत. खरोसा गावाचा एक प्राचीन उल्लेख ‘कल्पसमूह’ या ग्रंथामध्येही आढळतो. यादव काळात सैद महंमद या मुस्लिम ग्रंथकाराने रचलेल्या या मराठी ग्रंथामध्ये ‘खरोसे’ हे रसविद्येस उपयुक्त ठरणारे स्थान असल्याचे म्हटले आहे. पाऱ्यावरील विशिष्ट प्रक्रियेने लोहादी धातूंचे सुवर्णात रूपांतर करणे आणि पाऱ्यापासून बनवलेल्या औषधांनी देह अजरामर बनवणे या विद्येस ‘रसविद्या’ म्हणत. या विद्येसंदर्भात महत्त्वाची असलेली अनेक यादवकालीन स्थाने सैद महंमदाने नमूद केली आहेत, त्यात खरोसे गावाचा समावेश आहे. यावरून या स्थानाचे महत्त्व लक्षात येते.

महाराष्ट्रातील शक्तिपीठांच्या परंपरेत कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका ही तीन पूर्ण पीठे मानली जातात, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ मानले जाते. ‘देवी भागवत’ आणि ‘स्कंद पुराणातील’ कथेनुसार, भगवान शंकरांनी सतीचे पार्थिव खांद्यावर घेऊन तांडव नृत्य केले असता, विष्णूच्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे होऊन ते पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले. त्यातील सतीचे मस्तक माहूरगडावर पडले. त्यामुळे हे स्थान जागृत शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. रेणुका देवीस यमाई, एकवीरा, यल्लम्मा अशा विविध नावांनीही संबोधले जाते. खरोसा येथील रेणुका देवीच्या मंदिराची स्थानिक आख्यायिका अशी की श्रीरामांनी वनवासकाळात या भागामध्ये वास्तव्य केले होते. त्यावेळी सीतेने येथे रेणुका देवीची स्थापना केली. या दंतकथेच्या पुष्ट्यर्थ खरोसा येथील डोंगरमाथ्यावरचे एक स्थान ‘सीतेची न्हाणी’ म्हणून दाखवले जाते.

येथील देवीच्या मंदिराभोवती दगडी आवारभिंत असून त्यात जुन्या पद्धतीचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात तुळशी वृंदावन आणि दोन प्राचीन दगडी दीपमाळा आहेत. त्यांच्या समोरच नव्याने उभारण्यात आलेला प्रशस्त व खुला सभामंडप आहे. सहा पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपात रेणुकादेवीच्या गर्भगृहाचे स्थान आहे. त्याचा दरवाजा कमी उंचीचा असल्याने वाकून आत प्रवेश करावा लागतो. आतमध्ये वज्रपीठावर रेणुकामातेची स्वयंभू मूर्ती स्थापित आहे. देवीच्या चेहऱ्याचा आकार लाभलेल्या या गोलाकार शिळेवर चांदीचे नाक, कान, डोळे आणि ओठ लावण्यात आलेले आहेत. देवीस शेंदूर आणि अलंकारांनी शृंगारलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहावर आधुनिक बांधकाम शैलीतील शिखर आहे.

मंदिरात वर्षभर विविध धार्मिक सोहळे पार पडतात. नवरात्र सोहळा हा त्यातील मुख्य उत्सव होय. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीत येथे नऊ दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. दररोज देवीचा विशेष शृंगार आणि पूजा केली जाते. विजयादशमीच्या (दसरा) दिवशी सीमोल्लंघनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. चैत्र पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. यावेळी परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. यावेळी देवीचा छबिना म्हणजेच पालखी मिरवणूक निघते. आलेल्या भक्तांसाठी येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी देवीची ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी होते. या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी १.३० आणि संध्याकाळी ४ ते रात्री ८.३० या वेळात भाविक दर्शन घेऊ शकतात.

उपयुक्त माहिती:

  • निलंगा येथून १० किमी अंतरावर
  • लातूर येथून ४३ किमी अंतरावर
  • निलंगा व लातूर येथून खरोसासाठी एसटीची सुविधा
  • गावातून खासगी वाहनांनी मंदिरापर्यंत येता येते
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२२६४८३८८, ९८२३५९१९७७

रेणुका देवी मंदिर

खरोसा, निलंगा, जिला। लातूर

Back To Home