रेणुका देवी मंदिर,

भगूर, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक

राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक असलेल्या रेणुका देवीचे नाशिकमधील भगूर येथील स्थान जागृत मानले जाते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी आणि रेणुका माता मंदिरामुळे भगूर हे गाव प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी देवी आणि मंदिरासमोर असलेल्या (बारव) विहिरीत आंघोळ केल्यास त्वचाविकार नाहीसे होतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने दररोज येथे शेकडो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात.

दारणा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावाला प्राचीन इतिहास आहे. पूर्वी येथे महर्षी भृगू ऋषींचे वास्तव्य होते. ते स्थापत्यशास्त्राचे तज्ज्ञ समजले जात. नाशिकमधील काळाराम मंदिर भृगूवास्तुशास्त्रानुसार बांधल्याचे मानले जाते. त्यांनी ऋग्वेद, अथर्ववेद, भृगूसंहिता, भृगू आयुर्वेदसंहिता, भृगूस्मृती (मनस्मृती), भृगू गीता (वेदान्तविषयक), भृगूसिद्धांत आणि भृगूसूत्र आदी ग्रंथ लिहिले. असे सांगितले जाते की भृगू ऋषींनी दंडकारण्यातील या परिसरात साधना केली व गुरुकुल उभारले, म्हणून या परिसराला ‘भार्गव’ असे नाव पडले होते. त्याचे पुढे ‘भगूर’ झाले. येथील दारणा नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी रेणुका देवी मंदिराची स्थापना केली. भृगू ऋषींचे वास्तव्य, शिवकाळ, पेशवाईतील कर्तृत्वाच्या कहाण्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्वातंत्र्य चळवळ असा वारसा भगूरला लाभला आहे. सावरकरांनी भगूरवर लिहिलेली ‘भार्गव’ ही कविता या गावाचे महात्म्य वर्णन करते.

या मंदिराची आख्यायिका अशी की पुरातन काळात दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाने आपल्या वनवासकाळातील काही वर्षे व्यतित केली होती. सध्याच्या भगूर येथे वास्तव्यास असताना श्रीरामांनी रेणुका देवीची पूजा केली होती. साधारणतः २०० वर्षांपूर्वी एका महिलेच्या स्वप्नदृष्टांतानुसार या देवीची मूर्ती येथे जमिनीत सापडली.

नाशिक-भगूर मार्गावर देवळाली कॅम्पमध्ये रेणुका मातेचे मंदिर आहे. हे मंदिर धटिगन नावाच्या व्यापाऱ्याने बांधल्याचा उल्लेख मंदिरातील शिलालेखावर आहे. पूर्वीचे मंदिर कौलारू व लहान असल्याने २००२ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. रेणुका देवीचे हे मंदिर संगमरवरी असून मंदिराचा परिसर स्वच्छ व प्रशस्त भासतो.

प्रांगणातून मंदिरात प्रवेश करताच सभामंडपात स्थित असलेल्या देवीचे दर्शन होते. चांदीच्या मखरात विराजमान असलेली ही देवी अष्टभुजाधारी आहे. मुकुट, नथ, मंगळसूत्र व साडी परिधान केलेली देवीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण भासते. देवीसमोर सिंह आणि कासव यांच्या प्रतिमा आहेत. देवीजवळ अखंड तेवत असलेल्या नंदादीपातील तेल त्वचेवर लावल्यास त्वचाविकार बरा होतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक भाविक त्वचाविकारातून मुक्तीसाठी देवीला नवस बोलतात. नवसपूर्तीनिमित्त येथे देवीला चांदीचा पत्रा वाहण्याची प्रथा आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरासमोरील दगडी पायऱ्या असलेली बारव (विहीर). या बारवेत बाराही महिने पाणी असते. ५ मंगळवारी उपवास करून या बारवेत स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जिवंत झरा असल्याने येथील पाणी उपसल्यानंतर काही क्षणातच ही बारव लगेच पाण्याने भरून जाते. ही बारव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याची नोंद आहे.

नवरात्रोत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. यावेळी ९ दिवस यात्रा असते. घटस्थापनेच्या दिवशी रेणुका मातेचा पंचामृताने अभिषेक केला जातो. सातव्या दिवशी रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत दुर्गाष्टमी होम केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिप्रदा ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत दररोज नित्यदुर्गा सप्तशतिपाठ होतो. दसऱ्याच्या दिवशी गावातील खंडोबा महाराजांच्या मंदिरातून स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवी व खंडेराव महाराज यांच्या मूर्तींची मिरवणूक सिमोल्लंघनासाठी या मंदिरात आणली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवीला स्मरून केलेले ‘जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे…’ हे गीत प्रसिद्ध आहे. या उत्सवावेळी अनेक सावरकर प्रेमी व भाविकांची येथे उपस्थिती असते. दसरा आणि कोजागरी पौर्णिमा या दिवशी येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून २४ किमी, तर नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून ७ किमी अंतरावर
  • नाशिक, इगतपुरीपासून एसटी, नाशिक महापालिका परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home