रांझेश्वर मंदिर

रांझे, ता. भोर, जि. पुणे


पुण्याजवळील खेड शिवापूरपासून जवळच असलेल्या रांझे या गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे. स्थापत्य कलेसोबतच जलव्यवस्थापन स्थापत्याचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर शिवकाळापूर्वीपासून असल्याचे सांगितले जाते. याच मंदिर परिसरात शिवाजी महाराजांनी रांझे गावच्या बाबाजी ऊर्फ भिकार गुजर पाटलाला महिलेशी गैरवर्तन केले म्हणून हातपाय कलम करण्याची शिक्षा दिली होती.

खेड शिवापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर हे प्राचीन मंदिर आहे. निसर्गाचे भरभरून दान व ऐतिहासिक कोंदण लाभलेले रांझे गावातील हे मंदिर शंकर महादेवाला समर्पित आहे. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशालाच एक भव्य दगडी कमान आहे. मंदिरात जाण्यासाठी तेथून काही पायऱ्या खाली उतराव्या लागतात. काहीसे खोलगट भागात असलेल्या या मंदिराची बांधणी घडीव दगडामध्ये, तर शिखराचे काम हे विटा व चुना यांच्या साह्याने केलेले असावे. या शिवाय संपूर्ण मंदिर परिसराला दगडी तटबंदी आहे. मंदिराची रचना नंदीमंडप, सभागृह व गाभारा अशी आहे. दगडातच बांधलेल्या या नंदीमंडपात तीन नंदी विराजमान असून हा नंदीमंडप मुख्य मंदिरापासून काहीसा वेगळा आहे.

मंदिराचे गोलाकार सभागृह दगडी खांबांवर तोलून धरलेले आहे. येथून गाभाऱ्यात प्रवेश करताना दाराच्या दोन्ही बाजूला गणपती व मारुतीच्या सुंदर कोरीव मूर्ती दिसतात. गाभाऱ्यातील स्वयंभू शिवपिंडीखाली जिवंत पाण्याचा झरा आहे. याच झऱ्याचे पाणी मंदिराशेजारी असलेल्या कुंडांमध्ये येते, असे सांगितले जाते. या मंदिराचा कळस व त्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. कळसावर विठ्ठल-रखुमाई, गणपती, मारुती आदी देवदेवतांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. कळसावरील चार टोकांवर छोटे मनोरे आहेत.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील एकमेकाला जोडलेली तीन पाण्याची कुंडे. पहिले देवकुंड. या कुंडातील पाणी देवपूजा व पिण्यासाठी वापरले जात असे. या कुंडांमध्ये उतरण्यासाठी आणखी काही पायऱ्यांच्या साह्याने खाली जावे लागते. त्यासाठी दोन पायरी मार्ग आहेत. या कुंडातच तीन छोटी छोटी देवळे आहेत. त्यामध्ये पूर्वी मूर्ती होत्या, असे सांगितले जाते. दुसरे कुंड आहे सूर्यकुंड. यामधील पाण्याचा वापर आंघोळीसाठी करण्यात येत असे. देवकुंड भरले की त्यातील अधिकचे पाणी गोमुखाद्वारे सूर्यकुंडात येते. सूर्यकुंडातील पाणी शेजारी असलेल्या तिसऱ्या कुंडात जाण्यासाठी लहान लहान छिद्रे आहेत. तिसऱ्या कुंडातील पाण्याचा वापर हा धुण्यासाठी, तसेच इतर कामांसाठी केला जात असे. या तिन्ही कुंडांमधील अतिरिक्त पाणी हे पुढे शिवगंगा नदीला जाऊन मिळते. तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वीची ही कुंडे, पाण्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल, याचे उत्तम उदाहरण आहेत.

या मंदिराला लागूनच एक मोठा वाडा आहे. त्यात जिजाबाई राहत होत्या, असे सांगितले जाते. तेथे घोडे बांधण्यासाठीची एक जागाही आहे. हे गाव राजमाता जिजाबाईंना लखोजीराजे जाधव यांनी खर्चासाठी आंदण म्हणून दिले होते, अशी नोंद इतिहासात सापडते. पेशवाईच्या काळात हाच वाडा नारो गणेश यांच्या ताब्यात होता. याच वाड्याच्या एका बाजूला लक्ष्मीनारायण मंदिर आहे. श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला येथे पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनाला येतात. याशिवाय अनेक चित्रपट व मालिकांचे चित्रिकरणही येथे होत असते.

उपयुक्त माहिती:

  • भोरपासून ४० तर खेड शिवापूरपासून ३ किमी अंतरावर
  • गावात येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात.
  • निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home