राणी सती मंदिर

हिंगोली, ता. जि. हिंगोली

महादेवाच्या पत्नीचे नाव सती होते. सतीच्या मृतदेहाचे ५१ तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले, त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे किंवा सतीपीठे निर्माण झाली. प्रजापती दक्ष कन्या सतीने आपल्या पतीच्या अपमानाचा निषेध म्हणून यज्ञ कुंडात स्वतःची आहुती दिली होती. पुराणातील या कथेचा धागा पकडून पतीच्या प्रतिष्ठेसाठी चिता आहुती देणाऱ्या स्त्रियांना सती म्हटले जाऊ लागले. त्यांची मंदिरे निर्माण झाली. शक्तिपीठे म्हणून त्यांची पूजाही केली जाऊ लागली. राजस्थानातील झूनझून येथे राणी सतीचे मूळ शक्तीपीठ आहे. त्याची उपपीठे देशभरात निर्माण झाली आहेत. हिंगोली येथील मंदिर त्यापैकीच एक आहे.

एका आख्यायिकेनुसार राजपूत कन्या नारायणी यांचा विवाह थंडनदास या शूर सरदारासोबत झाला. विवाहाच्या काही दिवसातच थंडनदास यांचा लढाईत मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर नारायणी देवी सती गेली. तिचे मंदिर राजस्थानमधील झूनझून येथे बांधले गेले. पुढे तिला राणी सती देवी तसेच दादीजी या नावानेही संबोधले जाऊ लागले. ही देवी मारवाडी समाजातील अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. राणी सतीचे मूळ प्राचीन मंदिर राजस्थानातील झूनझून येथे आहे. मारवाडी समाजाने व्यापार-उद्योगासाठी ज्या ज्या ठिकाणी स्थलांतर केले, त्या त्या ठिकाणी मंदिरे बांधली. त्यांनी आपल्या कुलदेवीची म्हणजेच राणी सतीची त्रिशूल रूपात स्थापना केली. राणी सती देवीची सीता सती, महादोई सती, मनोहारी सती, मनभावन सती, यमुना सती, ज्ञानी सती, पुरा सती, पिरागी सती, जीवनी सती, तिली सती, कृष्ण सती अशी एकूण तेरा नावे आहेत. स्थळपरत्वे ती वेगवेगळ्या नावाने पूजली जाते.

हिंगोली-अकोला रस्त्यालगत हे मंदिर आहे. मंदिराभोवती तटबंदी आहे. या तटबंदीत प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात विविध प्रकारची झाडे आहेत. तेथे भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिराजवळ प्रांगणात मंगल कार्यालय व बालोद्यान आहे. उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साधने आहेत. मुखमंडप, सभामंडप व तीन गर्भगृहे असे या मंदिराचे स्वरूप आहे. मुखमंडप प्रांगणापेक्षा उंचावर आहे. प्रवेशद्वारात तीन पायऱ्या आहेत. मुखमंडपात समोरील बाजूला दोन गोलाकार स्तंभ आहेत. या स्तंभांवर छत आहे. सभामंडप मुखमंडपापेक्षा उंच आहे. चार पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. त्याला बाह्यबाजूने नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत. स्तंभांवर उभ्या धारेची नक्षी आहे. सभामंडपाच्या छताला काचेची सुंदर झुंबरे टांगलेली आहेत. सभामंडपात पुढील बाजूस तीन स्वतंत्र गर्भगृहे आहेत. मध्यभागी असलेले गर्भगृह राणी सती देवीचे आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर काही इंच उंचीचा चौथरा आहे. चौथऱ्यावर स्टेनलेस स्टीलचा कठडा लावून अंतराळाची रचना केलेली आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वारावर आणि द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. नक्षीदार ललाटपट्टी व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे.

गर्भगृहात सती देवीची त्रिशूल रूपातील मूर्ती आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या मूर्तीला चांदीचा मुखवटा आहे. मूर्तीच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट आहे. मूर्तीच्या मागे चांदीच्या प्रभावळीत पर्णलता, पुष्पलता, मयूरतोरण व अभिषेकी गजराज आहेत. वरील दोन्ही कोपऱ्यांत सूर्य व चंद्र प्रतिमा आहेत. सतीदेवीच्या गर्भगृहाच्या डाव्या व उजव्या बाजूला जवळपास सारखीच रचना असलेले दोन गर्भगृहे आहेत. डावीकडील गर्भगृहात वज्रपीठावर राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. त्यासमोर स्वतंत्र वज्रपीठावर दास मारुतीची मूर्ती आहे. सर्व मूर्तींच्या डोक्यावर चांदीचे मुकुट आहेत. उजव्या बाजूच्या गर्भगृहात वज्रपीठावर राधा-कृष्णाच्या मूर्ती आहेत. त्यांच्याही शिरावर चांदीचे मुकुट आहेत. तिन्ही गर्भगृहांच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहेत.

सभामंडपाच्या छतावर चहुबाजूने सुरक्षाकठडा आहे. तिन्ही गर्भगृहांच्या छतावर चौकोनी निमूळती शिखरे आहेत. सती देवीच्या गर्भगृहाचे शिखर इतर दोन शिखरांपेक्षा अधिक उंच आहे. शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व कळस आहेत. इतर दोन शिखरांच्या शीर्षभागी प्रत्येकी एक आमलक व कळस आहेत. सती माता मंदिरापासून काही अंतरावर जागृत महादेव मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीमंडपात वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप व सभामंडपात मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात शिवपिंडी आहे.

भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्या हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिरावर विद्युत रोषणाई केली जाते. मंदिर परिसरात फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात. यावेळी भाविक देवीला पुरणपोळी व दही भाताचा नैवेद्य अर्पण करतात. मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, कथावाचन, नृत्य, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील दुसरा महत्त्वाचा उत्सव आहे. यावेळी सलग दहा दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून कन्या पूजन करून व्रताचे उद्यापन केले जाते. अष्टमीस यज्ञाचे आयोजन केले जाते. याशिवाय दसरा, दिवाळी व वर्षभरातील इतर सण, उत्सवही येथे साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंगळवार, शुक्रवार, षष्ठी, अष्टमी, पौर्णिमा व अमावस्या या दिवसांत मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात देवीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • हिंगोली बस स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून हिंगोलीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२२३३३९९

रानी सती मंदिर

हिंगोली, जिला हिंगोली

Back To Home