
महाडकडून रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दहा किलोमीटर अंतरावर तळोशी हे गाव आहे. येथे असलेले देवी रंगुमातेचे जागृत स्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे रूढार्थाने कोणतीही मूर्ती किंवा देवीचे मंदिर नाही. साड्या नेसवलेली दोन वृक्षांची खोडे हेच येथील देवीचे रूप आहे. असे सांगितले जाते की या दोन वृक्षांखाली अदृश्य स्वरूपात देवीचा वास आहे. महाड तालुक्यासह महाराष्ट्र व गुजरात राज्यातूनही हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
रायगड किल्ल्याच्या तळाशी असलेले एकमेव गाव म्हणजे तळोशी. गांधारी नदीचे मुबलक पाणी आणि मैदानी सखल प्रदेश अशी भूरचना असल्यामुळे शिवशाहीत तळोशी येथे सैन्यांचा तळ असे. अनेक लढायांसाठी जाण्यापूर्वी सैनिक याच तळावर जमत असत व येथून ते कामगिरीवर जात असत. असे हे ऐतिहासिक गाव आज ओळखले जाते ते येथील रंगुमाता देवस्थानामुळे. रंगुमाता देवीचे येथील स्थान स्वयंभू आहे. मात्र, ते कधी अस्तित्वात आले याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रंगुमातेचे हे स्थान प्रसिद्ध आहे. स्थानिक लोककथेनुसार, महाराज रायगडावरून एखाद्या मोहिमेवर निघाले की प्रथम रंगुमातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन पुढे जात असत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार पिलाजीराव पार्टे यांच्याकडे या देवीच्या पूजेचा मान होता. पिलाजीराव हे पार्टे कुटुंबीयांचे पूर्वज. पार्टे कुटुंबीयांमध्ये पूर्वी सहा भाऊ होते. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला यापैकी एका कुटुंबाकडे देवीच्या नित्यपूजेची जबाबदारी दिली जात असे. ही प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. आजही पार्टे कुटुंबीयांकडेच या देवीच्या नित्यपूजेची जबाबदारी आहे.
या ठिकाणी मंदिर नाही, याची एक आख्यायिका सांगितली जाते. पार्टे कुटुंबीयांच्या पूर्वजांनी ज्या वेळी येथे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवीने स्वप्नदृष्टांत देऊन त्यांना सांगितले की माझे मंदिर हे केवळ निगडीच्या झाडापासून व ते एका रात्रीत बनवावे; परंतु निगडीच्या झाडाची वाढ ही मर्यादित असते. त्यापासून मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे खांब अथवा
फळ्या पाडणे जिकीरीचे होते. त्यामुळे निगडीच्या झाडापासून मंदिर बांधणे व तेही एका रात्रीत हे अशक्यप्राय असल्याने देवीला येथे मंदिर नको आहे, असे समजून पार्टे कुटुंबीयांनी मंदिर बांधण्याचा विचार सोडून दिला. त्यामुळे या ठिकाणी आजतागायत मंदिराचे बांधकाम होऊ शकलेले नाही.
महाड–रायगड रस्त्यापासून सुमारे २ किमी अंतरावर तळोशी हे गाव आहे. या रस्त्यापासून रंगुमाता देवस्थानापर्यंत जाण्यासाठी गाडीरस्ता आहे. या देवस्थानाच्या कमानीतून एका प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. भाविकांच्या सोयीसाठी या प्रांगणात पत्र्याचा मंडप (शेड) व फरसबंदी करण्यात आलेली आहे. या परिसरातील मोठमोठ्या वृक्षांखाली पार बांधलेले आहेत. याशिवाय येथे एक प्राचीन विहीरही आहे. मंदिराचे गर्भगृह म्हणजेच रंगुमातेचे स्थान जेथे आहे तेथे मध्यम आकाराचे खोड असलेली दोन झाडे आहेत. या दोन्ही खोडांना दोन ते अडीच फूट उंचीपर्यंत साडी नेसविली जाते. या स्थानाभोवती तिन्ही बाजूंनी दोन फूट उंचीची भिंत आहे. या झाडांच्या मागच्या बाजूला भाविकांकडून देवीला अर्पण करण्यात येणाऱ्या हिरव्या बांगड्यांच्या माळा लावलेल्या आहेत.
रंगुमाता ही नवसाला पावणारी व हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीला केलेला नवस पूर्ण झाल्यानंतर येथे साडी–चोळी, पितळी घंटा, हिरव्या बांगड्या, फळे व भोजन अर्पण करून भाविकांकडून नवसपूर्ती केली जाते. येथील तथाकथित गाभाऱ्याभोवती भाविकांकडून देवीला अर्पण केलेल्या लाखो हिरव्या बांगड्या, हजारो साड्या व शेकडो पितळी घंटा पाहिल्या की भाविकांची देवीवर असलेल्या श्रद्धेची प्रचिती येते. भाविकांकडून अर्पण केलेल्या साड्यांमधून दररोज दोन साड्या देवीचे स्थान असलेल्या दोन वृक्षांच्या खोडांना नेसविण्यात येतात. अनेक भाविक हे देवीला मांसाहारी नैवेद्य अर्पण करण्याचा नवस बोलतात. त्यासाठी कोंबडा अथवा बकऱ्याचा बळी दिला जातो. तो नैवेद्य देवीला अर्पण केला जातो व प्रसाद म्हणून भाविकांकडून तो सेवन केला जातो. बळी देण्याच्या या प्रथेला ‘देवीची राखण देणे‘ असे म्हटले जाते. श्रावण महिना वगळता वर्षभर कोणत्याही दिवशी ही ‘राखण’ भाविक आपल्या सोयीनुसार देत असतात.
येथे दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दिवसांत येथे भाविकांची मोठी गर्दी होते. या उत्सवासाठी रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथील महिला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. देवीचा वार्षिकोत्सवदेखील येथे साजरा केला जातो. या उत्सवाचा कोणताही एक निश्चित असा दिवस नाही. भाविकांना सोयीचा ठरेल असा, मे महिन्याच्या २० तारखेपूर्वीचा एक दिवस या उत्सवासाठी निश्चित केला जातो.