जालना जिल्ह्यातील न्हावा येथील श्री रंगनाथ स्वामी विश्रांती मठ हे मराठवाड्यातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र आध्यात्मिक केंद्र आहे. आधुनिक काळातील महान संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंगनाथ स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे सव्वाशे ते दीडशे वर्षांचा दीर्घ इतिहास असलेल्या या मठात महाराजांची संजीवन समाधी आहे. भोगाकडून निवृत्तीकडे नेणारा मार्ग दाखवत महाराजांनी जनप्रबोधनाचे मोठे कार्य येथे केले. या मठात धार्मिक विधींसोबतच वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतनही केले जाते.
भौतिक सुखात रमलेल्या समाजाला निवृत्तीच्या मार्गातून आत्मज्ञानाची जाणीव करून देत उन्नतीच्या मार्गाला लावणारे अनेक संत महात्मे भारतात झाले आहेत. त्यांची ही अखंडित परंपरा आजही सुरू आहे. समाजाचे प्रबोधन करून, अनेक प्रकारचे चमत्कार दाखवून आणि प्रसंगी समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या संतांच्या परंपरेत रंगनाथ स्वामींचे नाव आदराने घेतले जाते. महाराजांचे हे समाधी मंदिर जालना जिल्ह्यातील न्हावा गावात आहे. या मठाला ‘आनंदी आत्मानंद सरस्वती श्री संत रंगनाथ महाराज विश्रांती मठ’ या नावाने देखील ओळखले जाते. आजही हजारो भाविक या समाधीच्या दर्शनासाठी येथे येतात. हा मठ महाराजांच्या हयातीत एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला गेल्याचे सांगितले जाते. सुमारे सव्वाशे ते दीडशे वर्षांच्या या जुन्या मठात इसवी सन १९१५ मध्ये महाराजांची समाधी बांधली गेली.
रंगनाथ महाराजांचा जन्म जालन्यातील कसबा भागातील त्यांच्या वाड्यात फाल्गुन शुद्ध एकादशी शके १७७० म्हणजेच इसवी सन १८४८ मध्ये झाला.
जालन्याचे जहागीरदार चिमणाजीपंत देशमुख आणि भागीरथी माता हे त्यांचे आई-वडील होत. रंगनाथ हे त्यांचे दुसरे अपत्य होते. त्यांच्या जन्माबाबत एक रंजक कथा सांगितली जाते. वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत बाळ मुळीच रडले नाही, तेव्हा काळजीत पडलेल्या आई-वडिलांनी त्यांना जालन्यातील प्रसिद्ध सुफी संत नूरशाहवली यांच्या हुजऱ्यात नेले. तिथे शाहबाबांचा आशीर्वाद मिळाला आणि बाळ रडू लागले. शाहबाबांनी तेव्हाच वर्तवले होते की हे बाळ पुढे जाऊन मोठा संत महात्मा होईल. दुर्दैवाने वयाच्या सातव्या वर्षी महाराजांचे आई-वडील वारले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे चुलते नरसिंहराव देशमुख यांनी केले. महाराजांना बालपणापासूनच एकांत आणि ध्यानधारणेची ओढ होती. त्यांचे शिक्षण आणि व्यवहाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून त्यांच्या काकांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यानंतर रंगनाथ स्वामी पैठणला गेले. तिथे त्यांची भेट चिन्मयानंद यांचे शिष्य सहजानंद स्वामी यांच्याशी झाली. महाराजांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि स्वामींनी त्यांना ‘आनंदी आत्मानंद’ हे नाव दिले. येथूनच महाराजांचे भारतभ्रमण सुरू झाले. प्रवासात त्यांना अनेक योगी भेटले आणि महाराज सतत ज्ञानार्जन करत राहिले.
त्यांनी जालना येथील सुरकीच्या डोंगरावर म्हणजेच जिला आता कैलास टेकडी म्हणतात, तेथे सलग बारा वर्षे कठोर तपसाधना केली. तेथे त्यांना दैवी दृष्टांत झाला आणि त्यानंतर त्यांनी समाजप्रबोधन आणि जनसेवेला सुरुवात केली. त्यांच्या चमत्कारांमुळे भक्त परिवार वाढत गेला. महाराजांचे चरित्र अनेक आध्यात्मिक आणि भौतिक चमत्कारांनी संपन्न आहे. त्यांनी अनेक ठिकाणी मठ आणि मंदिरांची स्थापना केली. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे देहावसान येथील ध्यान गुंफेत झाले आणि त्यांच्या भक्तांनी त्यांचे समाधी मंदिर या मठात उभारले.
न्हावा गावाजवळ मुख्य रस्त्यावरच मठाची एक स्वागत कमान आहे. मठाच्या समोर मोठे वाहनतळ आहे. मठाला एखाद्या किल्ल्यासारखी भक्कम तटबंदी असून त्यात दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी खोल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर मठाच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणातून वरच्या नगारखान्यात जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी पायऱ्यांचे जिने आहेत. प्रांगणात तटबंदीला लागूनच ओवऱ्या आणि सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत.
प्रांगणामध्ये श्री दत्तात्रेयांचे एक लहान मंदिर व त्याच्या समोर यज्ञकुंड आहे. बाजूलाच एक गोशाळा आणि वारकरी शिक्षण संस्थेची इमारत आहे. तटबंदीला लागून भाविकांच्या निवासासाठी भक्तनिवासाची इमारत आहे. पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात ठिकठिकाणी भाविकांसाठी आसन व्यवस्था केलेली आहे. समाधी मंदिराच्या समोर प्रांगणात एक सिंहाचे शिल्प आहे. समाधी मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा थोडे उंचावर आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल शिल्पे आणि इतर शुभचिन्हे कोरलेली आहेत. दाराच्या चौकटीवर रंगनाथ महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग शिल्पांच्या रूपात दाखवले आहेत. दाराच्या वरच्या बाजूला गणपतीचे शिल्प आणि महिरपी तोरण आहे. या तोरणाच्या दोन्ही बाजूंना हंसांची शिल्पे आहेत. सभामंडपाच्या समोरच्या भिंतीत उजेडासाठी झरोके आहेत. सभामंडपाला डाव्या आणि उजव्या बाजूंनी अजून दोन दरवाजे आहेत.
सभामंडपाच्या आत भिंतींना लागून चारही बाजूंनी सुमारे दहा फूट रुंद आणि तीन फूट उंच चौथरे आहेत, तर मधली जागा थोडी खोलगट आहे. या खोलगट भागात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. सभामंडपात चौथऱ्यावर दगडाचे खांब आहेत, तर खोलगट भागात सिमेंटचे खांब आहेत. दगडाच्या खांबांवर नक्षीकाम असून त्यावर लाकडी तुळया आहेत. या तुळयांवर लाकडी छत आहे. सिमेंटच्या खांबांवर सिमेंटचेच छत आहे. सभामंडप बंदिस्त असला तरी उजेडासाठी अनेक खिडक्या आहेत. येथे उत्सव काळात वापरली जाणारी पालखी ठेवलेली असते. सभामंडपाच्या पुढे रंगनाथ स्वामींचे समाधी असलेले मुख्य गर्भगृह आहे. या गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभामंडपापेक्षा चार फूट उंच आहे. तिथे जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या चौकटीवर फुलापानांची नक्षी व वरच्या बाजूला इष्टदेवतेचे शिल्प आहे. गर्भगृहात मध्यभागी रंगनाथ स्वामींच्या समाधीचा चौथरा आहे. त्यावर स्वामींची चांदीची मूर्ती व त्यावर सुंदर फेटा आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीत एक देवळी असून त्यात रंगनाथ स्वामींनी स्वतः स्थापन केलेली त्रिमूखी दत्तात्रेयांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाहेरून प्रदक्षिणेसाठी मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर आणि त्यावर कळस आहे. रंगनाथ स्वामींच्या समाधी मंदिराच्या बरोबर समोर त्यांचे शिष्य सरस्वती आनंद स्वामी यांचे समाधी मंदिर आहे.
या मंदिराची रचना साधी असून त्यात फक्त गर्भगृह आहे. आत सरस्वती आनंद स्वामींच्या समाधीवर पितळी मुखवटा बसवलेला आहे. या मंदिरावरही घुमटाकार शिखर आणि कळस आहे.
रंगनाथ महाराज समाधी मंदिराच्या मागील बाजूला त्यांच्या शिष्या आनंदीमाई आत्मानंद यांचे समाधी मंदिर आहे. हे मंदिर अर्धखुला सभामंडप आणि गर्भगृह अशा रचनेचे आहे. गर्भगृहात आनंदीमाई यांच्या समाधीवर त्यांची मूर्ती आहे. मागील भिंतीतील देवळीत तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे. या मंदिरालाही प्रदक्षिणा मार्ग आणि घुमटाकार शिखर आहे. फाल्गुन शुद्ध एकादशी हा महाराजांचा जयंती सोहळा आणि पौष वद्य एकादशी हा महाराजांचा पुण्यतिथी सोहळा हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. याशिवाय राम जन्मोत्सव, आषाढी आणि कार्तिकी एकादशी, दत्त जयंती आणि श्रावण महिन्यात येथे मोठे उत्सव साजरे केले जातात. उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पालखी सोहळा हे येथील आकर्षणाचे केंद्र असते. उत्सवाच्या वेळी परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. वर्षातील सर्व एकादशींना आजूबाजूच्या गावांतील पालख्या या मठात येतात. मंदिरात भाविकांची रोजच वर्दळ असते, त्यामुळे हे स्थान जालन्यातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.