
नवदुर्गांपैकी चामुंडा देवी म्हणजेच चौंडेश्वरी देवी होय. उत्तर भारतात ती ‘चामुंडा’ म्हणून तर दक्षिण भारतात ‘चौंढेश्वरी’, ‘चौडेश्वरी’ वा ‘चामुंडेश्वरी’ या नावाने पूजली जाते. चौंडेश्वरी देवी ही वळसंग गावची ग्रामदेवता आहे. येथे रामलिंग चौंडेश्वरी मातेचे मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात रामलिंगेश्वराचेही स्थान आहे, त्यामुळे या मंदिराला रामलिंग चौंडेश्वरी माता मंदिर म्हणून ओळखले जाते. या देवीची यात्रा व त्यातील बाळबट्टल सोहळा हे वळसंगचे खास आकर्षण आहे. ही यात्रा महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणमधील सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.
चौंडेश्वरी देवीच्या उत्पत्तीची कहाणी ‘मार्कंडेय पुराणा’तील ‘देवी माहात्म्या’च्या ७व्या अध्यायात कथन केलेली आहे. ती अशी की शुंभ–निशुंभ या दैत्यांनी इंद्राकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा त्यांच्या वधाकरिता पार्वतीमातेच्या शरीरकोषातून अंबिका देवी निर्माण झाली. चंड आणि मुंड हे शुंभ–निशुंभाचे सेवक होते. त्यांनी अंबिकेस पाहिले व तिच्या रुपसौंदर्याचे वर्णन शुंभाकडे केले. शुंभाने अंबिकेस आपली पत्नी हो, असा निरोप पाठवला. अंबिकेने त्यास धुडकावून लावल्यावर तिला पकडून आणण्यासाठी शुंभ–निशुंभाने चंड–मुंडांना पाठवले. त्यावेळी अंबिकेच्या शरीरातून प्रकटलेल्या कालीने चंड–मुंडांचा वध केला. यामुळे देवी अंबिका देवीने कालीदेवीस चामुंडा असे नाव दिले. याच चामुंडा, चामुंडेश्वरीचा अपभ्रंश चौंडेश्वरी वा चौंढेश्वरी असा झाला.
कोष्टी समाजाची आराध्य देवता असलेल्या चौंडेश्वरीची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांत मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते. या मंदिरापासून काही पावलांवर दीपमाळ आहे. मंदिराभोवतालच्या दुमजली वास्तूत मंडप आहे. काही पावले चालत आल्यावर मंदिराच्या मूळ वास्तूत प्रवेश होतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात अनेक देव–देवतांच्या प्रतिमा आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस राक्षसाचे कीर्तीमुख आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीच्या मध्यभागी असलेल्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात मधोमध मोठ्या शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. मागे भिंतीलगत वज्रपिठावर मध्यभागी चौडेश्वरी देवीचा तांदळा आहे. त्यावर चांदीचा सुंदर मुखवटा आहे. चौथऱ्यावर देवीच्या दोन्ही बाजूला देवतांचे मुखवटे आहेत.
अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवसापासून रामलिंग चौंडेश्वरी देवीची तीन दिवस यात्रा असते.या यात्रेला सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. या यात्रेचे मुख्य
आकर्षण म्हणजे ‘बालबट्टल’ जो दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता देवीच्या मंदिराबाहेर निघून गावाला प्रदक्षिणा घालतो. यात्रेतील ‘बाळबट्टल’ सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण येथून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.
या संदर्भात आख्यायिका अशी की सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी वीर नावाच्या मुलाने कर्नाटकातील माशाळ येथील मंदिरातून बट्टल म्हणजे चांदीची वाटी आणली. माशाळमधील गावकऱ्यांना हे समजल्यावर त्यांनी त्या बालकाचा पाठलाग सुरू केला. बालकाला वाटेत असंख्य अडचणी आल्या. काटे टोचून पाय रक्तबंबाळ झाले, पण तो थांबला नाही. आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी चांदीची वाटी घेऊन तो वळसंग गावाच्या वेशीवर सायंकाळनंतर आला. त्याने तेथील द्वारपालाला आत सोडण्याची विनंती केली, पण रात्र पडू लागल्याने त्या द्वारपालाने दरवाजा उघडण्यास नकार दिला. अखेर एका खिडकीतून बट्टल वेशीच्या आत टाकून तो मुलगा दिंडूरच्या दिशेने धावू लागला. माशाळचे लोक त्याच्या पाठलागावर होतेच. तो दिंडूर
रस्त्यावरील मड्डी बसवण्णा येथे येऊन थकून थांबला. आजही त्या ठिकाणी त्या बालकाची समाधी आहे. त्याच्या हातात बट्टल नसल्याने निराश झालेले माशाळचे लोक रिकाम्या हाताने परतले. ही घटना माशाळकरांसाठी दु:खाची होती, तर वळसंग ग्रामस्थांसाठी उत्साहाची होती. त्यामुळे त्यांनी हा दिवस वळसंगमध्ये रामलिंग चौडेश्वरी यात्रेच्या रूपात साजरा करण्यास सुरूवात केली. ती परंपरा आजही कायम असल्याचे येथील गावकरी सांगतात. ही चांदीची वाटी वळसंगमध्ये आहे व माशाळचे लोक ती परत नेण्यासाठी येऊ शकतात, असा येथील नागरिकांचा समज आहे. त्यातूनच संपूर्ण रात्र जागरण करून वळसंगचे ग्रामस्थ या वाटीचे संरक्षण करतात. या सोहळ्यास बाळबट्टल असे म्हणतात. हटगर कोष्टी समाज या यात्रेचे नेतृत्व करतो. विविध समाजांनाही यात्रेचा मान दिला जातो. सर्व जाती–धर्माचे लोक यात्रेत सहभागी होतात.
बाळबट्टलची मिरवणूक यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री बारा वाजता (दुसऱ्या दिवशी पहाटे) अत्यंत उत्साहात सुरू होते. ती सकाळी सात वाजेपर्यंत चालते. कर्नाटकातील माशाळ गावातून चांदीचा दिवा आणला जातो. हा दिवा घेऊन देवीचे रूप घेणारी महिला गावाभोवती प्रदक्षिणा घालते. या महिलेच्या डोक्यावर फुलांच्या माळा व दोन्ही पायांत ४० किलो वजनाचे घुंगरू बांधलेले असतात. एका हातात धारदार तलवार आणि दुसऱ्या हातात अखंड पेटता दिवा असतो. भाविक देवीची ओटी भरतात आणि आशीर्वाद घेण्यासाठी जमिनीवर बसतात. देवीला मनोकामना सांगितल्यास ती पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गावावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी देवी गावाभोवती प्रदक्षिणा घालते.
बट्टल म्हणजे चांदीची वाटी अन्य गावातील भक्त घेऊन जाऊ नयेत, यासाठी वळसंग येथील ग्रामस्थ आणि देवीभक्त दक्ष असतात. पूर्वी या चांदीच्या वाटीच्या संरक्षणासाठी भक्तगण काठी, कुऱ्हाडी, तलवारी अशी शस्त्र घेऊन सज्ज असत. पण सध्या अशी शस्त्रे बाळगण्यावर बंदी आहे. यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त केला जातो. यात्रेदरम्यान लोकांमध्ये आजवर कधीही वाद–विवाद झालेले नाहीत, असे गावकऱ्यांकडून सांगितले जाते.