रामेश्वर मंदिर

पळसोद, ता. जळगाव, जि. जळगाव

जळगाव तालुक्यातील पळसोद येथे तापी, गिरणा आणि अंजनी या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर रामेश्वर मंदिर वसलेले आहे. अशी मान्यता आहे की वनवासकाळात श्रीराम, लक्ष्मण सीता महिनाभर येथे वास्तव्यास होते. श्रीराम लक्ष्मण यांनी दैनंदिन पुजेसाठी येथील नदीतील वाळूपासून बनविलेल्या दोन शिवपिंडी या मंदिरात आहेत. याशिवाय ऋषि विश्वामित्र यांनी या ठिकाणी गायत्री यज्ञ केला होता. त्यामुळे रामायणकाळापासून महत्त्वाचे स्थान असलेले हे रामेश्वर मंदिर जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थळ मानले जाते

रामेश्वर हे शंकराचे एक नाव आहे. या नावाबद्दलची पौराणिक कथा अशी की श्रीरामाने रावणाचा वध केला, पण रावण हा ब्राह्मण होता. त्यामुळे श्रीरामास ब्रह्महत्येचे पाप लागले. त्याचे क्षालन करण्यासाठी श्रीरामाने शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करावी, असे ऋषींनी सांगितले. तेव्हा सीतेने समुद्रतीरी वालुकालिंग तयार केले. तेच शिवलिंग रामेश्वरम् म्हणून ओळखले जाऊ लागले. ऋषींनी श्रीरामाला रामेश्वर या नावाचा अर्थ विषद करून सांगण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीरामाने सांगितले होते कीरामस्य ईश्वरः सः यः रामेश्वरःम्हणजे जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. शिवशंकर हा माझा ईश्वर आहे. तेव्हा रामेश्वर म्हणजे शंकर

पळसोद येथील रामेश्वर मंदिराची आख्यायिका या पौराणिक आख्यायिकेशी मिळतीजुळती आहे. या मंदिराबाबत असे सांगितली जाते की रामायण काळात हा दंडकारण्याचा भाग होता. विंध्याचल पर्वतापासून गोदावरीपर्यंतच्या परिसरात दंडकारण्य पसरलेले होते. वनवासात असताना श्रीरामलक्ष्मणसीता यांचे वनामध्ये किमान दहा वर्षे वास्तव्य होते. सध्या जेथे मंदिर आहे त्या परिसरात पूर्वी विश्वामित्र ऋषींचा आश्रम होता. श्रीराम, सीता लक्ष्मण वनवासकाळात विश्वामित्र ऋषींच्या येथील आश्रमात महिनाभर थांबले होते. त्यावेळी आपल्या दैनंदिन पुजेसाठी श्रीराम लक्ष्मण यांनी येथील नद्यांच्या संगमावरून वाळू आणली त्यापासून शिवपिंडी तयार केल्या. विश्वामित्रांनी या दोन्ही वालुकामय शिवपिंडींची येथे प्राणप्रतिष्ठापना केली. तेव्हापासून येथील गर्भगृहात दोन शिवपिंडी आहेत. श्रीरामाने शिवपिंडीची स्थापना केली म्हणून या तीर्थक्षेत्रास रामेश्वर असे संबोधले जाते. काही धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते राजा दशरथाचे जेव्हा निधन झाले तेव्हा श्रीराम याच परिसरात होते. त्यामुळे त्यांनी दशरथ राजाचा दशक्रिया विधी आणि पिंडदान येथील त्रिवेणी संगमावर केला. परंतु याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काहींच्या मते श्रीराम हे लक्ष्मण आणि सीता यांच्यासमवेत वनवासकाळात नाशिकमधील पंचवटीत गोदावरी तीरावर गेले होते. तेव्हा त्यांनी दशरथ राजांचा श्राद्धविधी केला होता. त्यावेळेपासून ते ठिकाणरामकुंडनावाने ओळखले जाते

काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले असले तरी येथील नोंदींनुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या काळात म्हणजे .. १७६६ ते १७९५ दरम्यान या मंदिराचा जिर्णोद्धार झालेला आहे. त्रिवेणी संगमाजवळ मातीच्या एका उंच टेकडीवर रामेश्वर मंदिर स्थित आहे. वाहनतळापासून काही पायऱ्या चढल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. टेकडीच्या पठारावर असलेल्या या प्रांगणातून येथील परिसराचे त्रिवेणी संगमाचे विहंगम दृश्य दिसते. प्रांगणाभोवती आवारभिंत त्यावर सुरक्षा कठडे आहेत. प्रांगणात सर्वत्र पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. प्रांगणातून सुमारे २० पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिरात प्रवेश होतो. तारकाकृती सभामंडप मध्यभागी गर्भगृह अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले हे प्रशस्त मंदिर आहे

बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपाच्या भिंतींमध्ये अनेक खिडक्या आहेत. त्यामुळे उंचावर असलेल्या या सभामंडपात हवा प्रकाश पुरेसा येतो. मुख्य प्रवेशद्वार सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. मध्यभागी खोलवर असलेल्या गर्भगृहाभोवती गोलाकार स्तंभ आहेत. या स्तंभांवर शिखराचे वजन पेललेले आहे. सभामंडपातून चार पायऱ्या उतरून मध्यभागी असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात मध्यभागी काही इंच खोल चौकोनाकार जमिनीवर दोन शिवपिंडी आहेत. त्यापैकी एक मोठी एक लहान आहे. या दोन्ही शिवलिंगांवर नागाने छत्र धरलेले आहे वरील कलशातून जलाभिषेक होतो.

या गर्भगृहात असलेल्या दोन शिवलिंगांबाबत आख्यायिका अशी की श्रीराम लक्ष्मण या ठिकाणी वास्तव्यास होते तेव्हा श्रीरामाने लक्ष्मणाला एक शिवलिंग तयार करण्यास सांगितले. पण काही कारणाने लक्ष्मणास विलंब झाला, त्यामुळे श्रीरामाने स्वतःच शिवलिंग तयार करून पूजा सुरू केली त्याचवेळी लक्ष्मणही शिवलिंग घेऊन आला. त्याचा अपमान होऊ नये म्हणून बाजूला त्याने आणलेले शिवलिंग ठेवून त्याचीही श्रीरामाने पुजा केली. त्यामुळे या मंदिरात दोन शिवलिंग आहेत

महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो. त्यावेळी हजारो भाविक रामेश्वराच्या दर्शनासाठी येतात. याशिवाय श्रावण महिन्यातही भाविकांची येथे गर्दी असते

उपयुक्त माहिती

  • जळगाव येथून ४१ किमी अंतरावर
  • जळगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९५२७१७००४६
Back To Home