जालना जिल्हा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला प्रदेश आहे. या जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे, लेणी आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. यांपैकीच एक महत्त्वाचे आणि प्राचीन वारसा स्थळ म्हणजे भोकरदन तालुक्यातील आलापूर येथील श्री रामेश्वर महादेव मंदिर होय. भोकरदन तालुका पूर्वी’भोगवर्धन’ या नावाने प्रसिद्ध होता. प्राचीन भारताच्या नकाशावर भोगवर्धन हे एक महत्त्वाचे नगर आणि व्यापारी केंद्र होते. सातवाहन काळातील इतिहास या भूमीने अनुभवला आहे. या नगराचा उल्लेख इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील सांची, भारहूत आणि भाजे येथील स्तुपांवरील लेखांमध्ये आढळतो. हे लेख त्या काळातील भोगवर्धनच्या लोकांच्या दानशूरपणाची साक्ष देतात. पैठण आणि तेर नंतर भोगवर्धन हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे संपन्न शहर होते. आलापूर हे भोकरदन शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असून ते याच प्राचीन नगराचा एक भाग असावे, असे येथील अवशेषांवरून दिसते.
रामायणातील कथेनुसार, प्रभू श्रीरामांनी पित्याोच्या वचनासाठी चौदा वर्षांचा वनवास स्वीकारला.
यावेळी लक्ष्मण आणि सीता यांनीही त्यांच्यासोबत वनात जाण्याचा निर्णय घेतला. अयोध्येतून निघालेले प्रभू श्रीराम गंगा नदी पार करून प्रयाग, चित्रकूट, दंडकारण्य, पंचवटी, रामटेक, हंपी, किष्किंधा आणि रामेश्वर अशा मार्गाने सीतेच्या सुटकेसाठी लंकेला गेले. या प्रवासादरम्यान त्यांनी ज्या ठिकाणी मुक्काम केला, तेथे पूजेसाठी शिवपिंडीची स्थापना केली. जालना जिल्ह्यातील आलापूर येथील रामेश्वर मंदिरातील शिवपिंड देखील प्रभू श्रीरामांनीच स्थापित केलेली आहे, अशी मान्यता आहे. येथील शिवपिंडीच्या दर्शनाने महादेव आणि प्रभू श्रीराम या दोघांचेही आशीर्वाद मिळतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षे प्राचीन असावे, असे त्याच्या बांधकामावरून दिसते. मंदिराची मूळ रचना आणि त्यावरील हेमाडपंती स्थापत्यशैली ही यादवकालीन वैभवाचे प्रतीक आहे. येथील शिवपिंड प्रत्यक्ष श्रीरामांनी स्थापन केल्यामुळे ती रामायणकालीन असल्याचे स्थानिक लोक मानतात. वनवास काळात प्रभू श्रीराम दंडकारण्याचा भाग असलेल्या या अरण्यात मुक्कामास राहिले होते, तेव्हा त्यांनी नित्य पूजेसाठी या शिवपिंडीची स्थापना केली आणि पुढे येथे मंदिर उभारले गेले.
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, प्रभू श्रीराम वनवासात असताना येथे आधीच असलेल्या शिवमंदिरात थांबले होते आणि त्यांनी या पिंडीची पूजा केली होती. यावरून ही शिवपिंडी रामायण काळाच्याही आधीची असावी, असे म्हटले जाते.
याशिवाय, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचेही आलापूर शिवारात वास्तव्य झाले होते, असे लीळाचरित्रातील संदर्भांवरून मानले जाते. या धार्मिक संदर्भामुळे हे मंदिर शैव भक्त आणि महानुभाव पंथीयांसाठी महत्त्वाचे आहे.
जालना जिल्ह्याचा बराचसा भाग डोंगराळ असला तरी, नद्यांच्या खोऱ्यात संस्कृतीचा विकास झाला आहे. केळना नदी ही या परिसरातील जीवनवाहिनी असून तिच्या काठावरच रामेश्वर मंदिरासारखी अनेक मंदिरे आहेत. या मंदिरापासून जवळच नदीच्या काठावर ‘तुकाई लेणी’ आहेत. या लेण्यांचा इतिहास आठव्या ते दहाव्या शतकातील राष्ट्रकूट काळाशी संबंधित आहे. या लेण्यांमधील मूर्तींची शैली राष्ट्रकूट शिल्पकलेचे दर्शन घडवते. काही संशोधकांच्या मते, या लेण्यांच्या निर्मितीची सुरुवात सहाव्या-सातव्या शतकातील कलचुरी राजवटीत झाली असावी. लेण्यांमध्ये देवी तुकाईची मूर्ती असल्याने याला तुकाई लेणी म्हणतात. रामेश्वर मंदिर, तुकाई लेणी आणि जवळचे सिद्धेश्वर मंदिर हे एकाच ऐतिहासिक कालखंडाची ओळख करून देतात. मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून येथे भाविकांसाठी विश्रांतीची सोय आहे.
मंदिराची मुख्य वास्तू सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागांत आहे. जुन्या गर्भगृहास जोडून सभामंडप आणि अंतराळाचा भाग अलीकडच्या काळात बांधलेला आहे. गर्भगृहाचे बांधकाम मूळ हेमाडपंती शैलीत असून नवीन भाग आधुनिक पद्धतीचा आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एका उंच चौथऱ्यावर नंदीमंडप आहे व त्यात काळ्या पाषाणातील मोठी नंदीमूर्ती आहे. सभामंडपाचे मुख्य प्रवेशद्वार मोठे असून त्याला लाकडी दरवाजे आहेत. याशिवाय डाव्या-उजव्या बाजूला दोन छोटी प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपाच्या पुढे अंतराळातील स्तंभांवर हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत. अंतराळात डाव्या बाजूला श्रीगणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार लहान असल्याने भाविकांना वाकून आत यावे लागते. या द्वाराच्या खालच्या बाजूला चंद्रशिळा आहे.
पूर्वी हे गर्भगृह अंतराळापेक्षा सहा फूट खोल होते आणि तिथे उतरण्यासाठी पायऱ्या होत्या; मात्र दुरुस्तीच्या कामात ते अंतराळाच्या पातळीवर आणले आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी मुख्य शिवपिंड असून त्यावर तांब्याचा नाग आहे. पिंडीवर अभिषेक करण्यासाठी वर अभिषेकपात्र आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीच्या कोपऱ्यांत श्रीगणेश आणि पार्वती देवीच्या मूर्ती आहेत. भिंतींना फरशा असल्या तरी खांबांचा वरील भाग आणि त्यावरील यक्षशिल्पे आजही दिसतात. गर्भगृहाचे अष्टकोनी छत कोरीव कामासाठी प्रसिद्ध असून त्यावर भैरव, भैरवी, यक्ष आणि पौराणिक प्रसंगांची चित्रे आहेत. छताच्या मध्यभागी असलेले दगडी झुंबर आणि कोरीव काम अत्यंत देखणे आहे. मंदिरावर चार थरांचे शिखर असून त्याचे पहिले तीन थर अष्टकोनी तर चौथा थर घुमटाकार आहे. शिखराच्या वर कळस आणि धर्मध्वज आहे. मुख्य मंदिरासमोर आधीच्या पुजाऱ्यांचे समाधी मंदिर आहे. प्रांगणात उंच चौथऱ्यावर शनिदेवाचे खुले मंदिर आहे. येथे शनिदेवाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. शनि मंदिराच्या शेजारीच हनुमानाचे लहान मंदिर आहे. हनुमान मंदिरासमोरच जमिनीच्या पातळीपासून तीन फूट खोल अंतरावर एक शिवपिंडी असून तिथे जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
आलापूरच्या या रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र आणि श्रावण महिना हे मुख्य उत्सव असतात. महाशिवरात्र हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असून तो माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी आलापूर येथे मोठी जत्रा असते. भाविक पहाटे केळना नदीत स्नान करून महादेवाच्या दर्शनासाठी येतात.
या काळात हजारो लोक दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावण महिन्यातही मंदिरात मोठी रिघ असते. प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची विशेष पूजा आणि रुद्राभिषेक केला जातो. याशिवाय चैत्र पाडवा, हनुमान जयंती, शनि जयंती, दसरा, दिवाळी आणि आषाढी-कार्तिकी एकादशी यांसारखे सणही साजरे होतात.
उत्सवाच्या वेळी मंदिरात लघुरुद्र आणि महाअभिषेक होतो. यावेळी भजन, कीर्तन आणि कथावाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. उत्सवकाळात येथे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. दर सोमवार, शनिवार तसेच प्रदोष आणि पौर्णिमेला येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते. दररोज सकाळी ७.४५ व सायंकाळी ६.३० वाजता येथे आरती होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.