रामदेव व मारुती मंदिर (झोपलेला मारुती)

माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर

श्रीरामांचा परम भक्त असलेला मारुती सावधचित्त योद्धा म्हणून ओळखला जातो. त्याच्या मूर्ती बहुतांशी उभ्या तर काही ठिकाणी पद्मासनात असतात. झोपलेल्या स्थितीतील मारुतीची मूर्ती दिसणे मात्र अतिशय दुर्मिळ मानले जाते. त्याचे असे रूप दाखवणारी देशभरात फारच निवडक मंदिरे आहेत. माळशिरसचे झोपलेल्या हनुमानाचे मंदिर हे त्यापैकीच एक आहे. तुकाराम महाराजांच्या किर्तनाच्या वेळी या मारुतीला मिळालेल्या शांती आणि समाधानामुळे त्याने डोळे मिटले, अशी मान्यता आहे

माळशिरस हा पालखी मार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून निघाल्यानंतर पुणे, सासवड, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी मार्गे पंढरपूरला जाते. माळशिरस येथे पालखीचा मुक्काम असतो. हा पालखीचा पारंपारीक मार्ग मानला जातो. या मंदिराची अख्यायिका अशी की पूर्वी संत तुकाराम महाराज वारीला जाताना याच मार्गाने जात. अशाच एका वारीच्या वेळी येथील राम मंदिरात वारकऱ्यांसह तुकाराम महाराजांचा मुक्काम होता. त्यांनी किर्तन करताना आपल्या भक्तीमय शब्द आणि वाणीने असे काही वातावरण निर्माण केले की सारे श्रोते भारावून गेले. त्यावेळी या मंदिरात श्रीरामांसमोर असणाऱ्या मारुतीच्या मूर्तीचे डोळेही आपोआप मिटले गेले. त्यानंतरच या मंदिराची ओळख झोपलेला मारुती मंदिर, अशी बनली.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू होते. त्यांचे रंगलेले कीर्तन थांबूच नये, असे तेथील श्रोत्यांना वाटत होते. मात्र चालून दमलेल्या वारकऱ्यांसाठी तुकारामांनी किर्तन थांबवायचे ठरवले. सर्व वारकरी झोपण्यासाठी गेले असता तुकाराम महाराजांच्या लक्षात आले की आपले किर्तन मारूतीही ऐकतो आहे. तेव्हा त्यांनी मारुतीला सांगितले की सर्व वारकरी झोपायला गेले, आता तुही झोप. तुकोबारायांनी सांगितल्याने मारूतीने डोळे मिटले आणि तेव्हापासून येथील मूर्ती ही काहीशी कललेली डोळे मिटलेली आहे

झोपलेल्या मारूतीची मूर्ती ही अतिशय दुर्मिळ समजली जाते. माळशिरस येथील मंदिरासह महाराष्ट्रात निद्रिस्त मारूती मूर्ती असलेली चार मंदिरे आहेत. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूरपिंपळझोरा येथील झोपलेला मारूती हे जागृत स्थान मानले जाते. तेथे मारूतीची झोपलेल्या अवस्थेतील सुमारे १० फूट लांबीची फूट रुंदीची स्वयंभू मूर्ती आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदिरातील मूर्तीही निद्रिस्त स्थितीत आहे. महाराष्ट्रातील याप्रकारचे चौथे मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आहे. तेथील निद्रिस्त मारूती काळा मारूती म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय देशभरात अलवर (राजस्थान), राजकोट (गुजरात), प्रयागराज, इटावा (उत्तर प्रदेश), जाम सावली, छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे निद्रिस्त मारूतीची मूर्ती असलेली मंदिरे आहेत

माळशिरस येथील हे मंदिर श्रीरामाचे असले तरी भाविकांमध्ये ते झोपलेला मारूती मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे. हे मंदिर शहराच्या गजबजलेल्या भागात आहे. पालखी मार्गावर असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी काहीशी चिंचोळी वाट आहे. तेथील कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. हे मंदिर फारसे मोठे नसले तरी त्यासमोरील सभामंडप मात्र प्रशस्त आहे. सभामंडपात प्रवेश केल्यावर डाव्या उजव्या बाजुला दोन गर्भगृहे दिसतात. डावीकडील गर्भगृहात वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती स्थापित आहेत. उजवीकडील मुख्य गर्भगृहात मारूतीची सुमारे पाच फूट उंचीची मूर्ती आहे. मारूतीचा उजवा हात डोक्याच्या वर आहे, डावा हात मात्र स्पष्ट दिसत नाही. एका मोठ्या शिळेवर कोरलेली ही उठावशिल्पमूर्ती थोडीशी तिरकी आहे. यामध्ये मारूतीचे डोळे मिटलेले दिसतात. या दोन्ही गर्भगृहावर शिखरे आहेत.

या मंदिराच्या प्रांगणात गणपती आणि महादेव यांची लहान मंदिरे आहेत. गणपती मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या वीरगळीचीही भाविकांकडून पुजा केली जाते. या मंदिरात भल्या पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रिघ लागते. मंदिरात हनुमान जयंती आणि रामनवमी हे दोन उत्सव विशेष उत्साहाने साजरे करण्यात येतात. वारकऱ्यांसाठीही हे मंदिर एक महत्वाचे स्थान आहे. आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान वारकरी या मंदिराला आवर्जून भेट देतात. तेथे कीर्तन, भजन आणि हरिपाठाचे कार्यक्रम करतात

उपयुक्त माहिती

  • पंढरपूरपासून ४८ किमी, तर सोलापूरपासून ११९ किमी अंतरावर
  • पुणे सोलापूरमधील अनेक शहरांतून माळशिरससाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : रामभाऊ दोशी, सचिव, मो. ९४२२३८०४२७, गौरव पंचवाघ, मुख्य पुजारी, मो. ८८८८६०८८८०
Back To Home