पुण्यातील लोणी काळभोरजवळील रामदरा मंदिर म्हणजे निसर्गसुंदर असे शांत तीर्थस्थळ. मूळचे अयोध्या येथील श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांच्या प्रयत्नातून हे मंदिर उभे राहिले. असे सांगितले जाते की, धुंदीबाबांना अयोध्येत असताना श्रीरामाचा साक्षात्कार झाला. वनवासात असताना लोणी काळभोरजवळील या क्षेत्रात माझे वास्तव्य होते आणि तेथे माझा कायम वास राहील, असा दृष्टांत श्रीरामाने धुंदीबाबांना दिला. तेव्हा त्यांनी लोणी काळभोरचे ठिकाण शोधून काढत येथे आपला आश्रम बांधला.
येथे एक शिवलिंग आढळल्यानंतर त्यांनी त्याची प्रतिष्ठापना करून या जागेवर भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प केला. १९५४ च्या सुमारास येथे फक्त एक ओढा होता. ओढ्याजवळ तलाव बांधून त्यात मंदिराचे बांधकाम करायचे, असा निश्चय धुंदीबाबांनी केला. त्यासाठी स्थानिकांची मदतही घेतली. त्याच प्रयत्नांतून उभे राहिले अनन्यसाधारण सौंदर्याने भारलेले असे श्री रामदरा मंदिर. येथील जंगलासारखी, पण नियंत्रित केलेली झाडे, सदैव कानावर पडणारे पक्ष्यांचे कूजन, सुशोभीकरणातून साकारलेले झाडाभोवतीचे पार व बैठक व्यवस्था आणि तलावात बांधकाम असल्यामुळे मंदिराच्या तिन्ही बाजूने दिसणारे पाणी यामुळे हा परिसर भाविकांना अक्षरशः भारावून टाकतो. धुंदीबाबा येण्यापूर्वी येथे गर्द जंगल होते. स्थानिक नागरिक या परिसरात जायलाही घाबरायचे, असे सांगितले जाते. पण आता हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येऊ लागला आहे.
असेही म्हटले जाते की, प्राचीन काळात श्री क्षेत्र रामदरा हे शंकराचे स्थान होते. पेशवे काळात त्याची डागडुजीही करण्यात आली. पण कालांतराने त्याकडे दुर्लक्ष झाले. पुढे भग्नावस्थेतील मंदिराचा धुंदीबाबांनी जीर्णोद्धार केला आणि त्यातूनच आताचे हे सुंदर मंदिर उभे राहिले. १९८२ साली येथे कोटी गायत्री महायज्ञ झाल्याचे सांगितले जाते.
वनवासात असताना काही काळ श्रीरामचंद्रांनी सीता आणि लक्ष्मण यांच्याबरोबर येथे वास्तव्य केले होते, अशी भाविकांची धारणा आहे. म्हणूनच या स्थानाला ‘रामदरा’ असे संबोधण्यात येते. आजूबाजूला तलावाचे पाणी आणि मध्ये मंदिर. त्यामुळे एक पूल ओलांडून पलीकडे मंदिरात जावे लागते. कमळाची फुले आणि इतर लता वेलींनी तलाव सजलेला आहेच, पण तेथे बदकेही पाण्यात-पाण्याबाहेर आश्वस्तपणे फिरत असतात.
मंदिराचे बांधकाम घडीव दगडांचे आहे. प्रवेशद्वारावर एका चबुतऱ्यावर नंदी आहे, तर दुसऱ्या चबुतऱ्यावर हनुमंत प्रतिष्ठापित आहे. मंदिरातील सभामंडपात २४ खांब आहेत. येथील भिंतींवर देवतांची शिल्पचित्रे आहेत. यात तांडवनृत्य करणाऱ्या शंकराचे शिल्प लक्ष वेधून घेते. सभामंडपात धुंदीबाबांची संगमरवरी मूर्ती आहे. एका बाजूला यज्ञासाठी कुंडही बांधण्यात आला आहे. गर्भगृहात शिवलिंगासोबत राम, सीता, लक्ष्मण आणि दत्ताच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सध्या देवस्थानच्या नावावर ३५ एकर जमीन असून शेतीच्या उत्पन्नातून मंदिराची देखभाल केली जाते.
पुण्यापासून २६ किलोमीटर अंतरावर असलेले आणि सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर फाट्यावरून सहा किलोमीटर अंतर पार करून या देवस्थानाकडे जाता येते. भाविकांना सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत या मंदिरात जाऊन देवदर्शन करता येते.