रामलिंगेश्वर मंदिर

श्री क्षेत्र तीर्थ, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर

दक्षिण सोलापूरमधील तीर्थ हे धार्मिक सलोख्याचे प्रतिक असलेले गाव आहे. या गावामध्ये रामलिंगेश्वर महादेवाचे मोठे मंदिर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात मुस्लिमांच्या मोहरम या सणाची सांगता होते. स्थानिक आख्यायिकेनुसार या मंदिरातील शिवलिंग प्रभू श्रीरामांनी स्थापन केले आहे. एवढेच नव्हे, तर या मंदिराशेजारी दोन शिवलिंगे आहेत व त्यांची स्थापना सीता आणि लक्ष्मण यांनी केल्याची कथा येथे प्रचलित आहे. येथील मंदिराशेजारी असलेल्या रामकुंडातील जलप्राशनाने व्याधी व चिंता दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिराविषयी आख्यायिका अशी की श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर सर्वांसमवेत ते पुष्पक विमानाने अयोध्येस परतले. श्रीराम हे शिवभक्त होते. ते रोज सकाळी शंकराची पूजा केल्याशिवाय अन्नप्राशन करीत नसत. ज्या ठिकाणी त्यांना शिवलिंग आढळत नसे, तेथे शिवलिंग तयार करून ते त्याची पूजा करीत असत. अशा प्रकारे आपल्या लंकेहून येतानाच्या प्रवासात त्यांनी ठिकठिकाणी शिवलिंगांची स्थापना केली. याच प्रकारे त्यांनी अयोध्येस जाताना या ठिकाणी वास्तव्य केले व येथे स्वहस्ते शिवलिंग स्थापन करून त्याची आराधना केली. त्यांच्याप्रमाणेच सीतामाता आणि लक्ष्मण यांनीही येथे शिवलिंगे स्थापन केली. त्या पूजेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी येथे जलकुंड निर्माण करण्यात आले. या पवित्र ठिकाणी कालांतराने मंदिरे उभारण्यात आली.

श्री क्षेत्र तीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात मोहरमचे पीर आणि ग्रामदैवत रामलिंगेश्वर यांच्यातही एकोपा दिसतो. येथील मोहरमचे वैशिष्ट्य म्हणजे ईमामखाशिम, हुसनबाशा, मौलाली, बाराईमाम, नालसाब उर्फ ईमामखाशिम असे पाच पंजे म्हणजे पीर बसविले जातात. हे पीर पकडणारे भक्त ग्रामदैवत रामलिंगेश्वर मंदिरात जाऊन नारळ वाढवून नंतर पीर पकडतात. गावातील प्रत्येकांच्या घरी जाऊन ऊद घेतात. भक्तांच्या समस्येवर उपाय सूचवितात. त्यामुळे भक्तांना आपल्या समस्या सुटतात असा विश्वास आहे. रामलिंगेश्वर मंदिरात मोहरमची सांगता होते. संपूर्ण गाव या उत्सवात सहभागी होते. इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू (मुलीचे पुत्र) इमाम हसन व हुसेन यांचा उमय्याद खलिफा यझीद प्रथम याच्या सैन्याने वध केला. करबलाच्या मैदानात सातव्या शतकात ही घटना घडली. या युद्धात त्या वेळी काही ब्राह्मणांनी हुसेन यांची साथ दिली होती. आजही त्यांचे वंशज पुणे, दिल्ली, तसेच पाकिस्तानात वास्तव्य करून आहेत. त्यांना हुसैनी ब्राह्मण असे म्हणतात. हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ शिया मुस्लिम मोहरमच्या महिन्यात ताबूत व पीर बसवतात. पीर हे हुसेन यांच्या साथीदारांच्या स्मरणार्थ उभारलेले निशाण असते. त्यातील काठीवर धातूचा पंजा बसवला जातो. श्री क्षेत्र तीर्थमध्ये इमाम खाशिम, हुसेनबाशा, मौलाली, बारा इमाम, नालसाब असे पाच पंजे म्हणजे पीर बसविले जातात.
तीर्थ गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी रामलिंगेश्वर मंदिर स्थित आहे. मंदिरासमोर असलेल्या कमानीवजा प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला तीन मेघडंबरीसदृश्य देवकोष्टकांमध्ये श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मू्र्ती आहेत. या सर्व देवकोष्टकांवर आमलक व शिखर आहे. प्रांगणात मंदिरासमोर दोन प्राचीन दीपमाळा आहेत. पूर्वीचे रामलिंगेश्वर मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील होते. आता मात्र फक्त शिखर आणि गर्भगृह पूर्वीचे आहेत. त्यासमोर नव्याने सभामंडप बांधलेला आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रशस्त अशा सभामंडपात कासवशिल्प व त्यापुढे नंदीची पाषाणी मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर दोन्हीबाजूला स्तंभशाखा आहेत. या स्तंभांच्या खालच्या बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी उंच व मोठी अखंड पाषाणातील प्राचीन शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या शिखरावरील चार स्तरांमध्ये अनेक लहान लहान देवकोष्टके व त्यातमध्ये विविध देवतांच्या रंगविलेल्या मूर्ती आहेत. पाचव्या स्तरावर आमलक व त्यावर कळस आहे. या मंदिराच्या मागे पायऱ्या असलेले एक कुंड आहे. त्याला रामकुंड असे म्हणतात. या कुंडातील पाण्याने रोग निवारण व पापनाश होताे, अशी श्रद्धा आहे. या कुंडात शिवलिंग आणि नंदी असल्याचे सांगितले जाते. या कुंडाला लागूनच आणखी एक शिवमंदिर आहे. अशी मान्यता आहे की यातील पिंडी ही लक्ष्मणाने घडविलेली आहे. मंदिर परिसरात विहिर आहे. त्यातून देवांच्या स्नानासाठी पाणी काढले जाते. या शिवाय प्रांगणात गणपती, तुळजाभवानी, अक्कामहादेवी यांची मंदिरे, नागदेवतेचे शिल्प व सीतेने स्थापन केलेले शिवलिंग आहे.
रामलिंगेश्वर मंदिरात हनुमान जयंतीपासून तीन दिवस यात्रा असते. यात्रेच्या प्रारंभी सकाळी सात वाजता श्रींच्या पालखीची व नंदीध्वजाची मिरवणूक निघते. रामलिंगेश्वराला रुद्राभिषेक व तैलाभिषेक केला जातो. या शिवाय यात्रोत्सवात कन्नड कलगी तुरा, कन्नड नाटक, कुस्त्या आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. ही यात्रा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी पर्वणी असते. यात्रोत्सवात गावात कोणी चूल पेटवत नाही. यात्रेत गूळ-खोबरे तसेच महाप्रसादाचे वाटप केले जाते. येथे नवस फेडण्यासाठी आपल्या घरापासून रामलिंगेश्वर मंदिरापर्यंत दंडवत घालत जाण्याची प्रथा आहे.

उपयुक्त माहिती

  • सोलापूरपासून २८ किमी अंतरावर
  • सोलापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home