पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिरूर येथील रामलिंग मंदिर प्रसिद्ध आहे. श्रीरामाने येथील शिवलिंगाची निर्मिती केल्यामुळे या स्थानाला ‘रामलिंग’ असे म्हटले जाते. हे प्राचीन देवस्थान ‘नवसाला पावणारे देवस्थान’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही भूमी श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची समजूत असल्याने येथे भाविकांचा सतत राबता असतो.
मंदिराची आख्यायिका अशी की श्रीरामाने लंकेकडे जाताना घोड नदीच्या किनारी रूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्या राक्षसाचे शिर येथे पडल्याने या स्थळाला ‘शिररूर’ असे नाव पडले; कालांतराने ते ‘शिरूर’ असे झाले. श्रीराम लंकेकडे जात असताना दिवसभर ते प्रवास करत आणि रात्री एखाद्या ठिकाणी मुक्काम करत असत. मुक्कामासाठी थांबल्यावर ते रात्री शिवलिंग तयार करून पहाटे, सूर्योदयापूर्वी त्याचे नदीत विसर्जन करत असत. शिरूर येथेही त्यांनी असेच लिंग तयार करून विसर्जित केल्याची समजूत आहे.
यादवांचा पाचवा राजा भिल्लमदेव याने १२व्या शतकात हे शिवमंदिर बांधले. या हेमाडपंती मंदिराच्या पुढे नऊ खणी दगडी सभामंडप आणि छोटा नंदी होता. १६९४ मध्ये, पेशवे काळात गिरीसुताने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हा मंदिराला कळस, पुढ्यात मोठा नंदी, उत्तरेकडील प्रवेशद्वार व मंदिराभोवती मातीच्या भिंती, ओवरी इत्यादी बांधकाम करण्यात आले. १९५२ मध्ये गावकऱ्यांच्या मदतीने दगडी भिंती बांधण्यात आल्या. १९७४ मध्ये रसिक धारीवाल यांनी रामलिंग मंदिर जीर्णोद्धार आणि समाजविकास मंडळ स्थापन करून महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरवण्यास सुरुवात केली. तटबंदीयुक्त मंदिर परिसरात प्रवेश करताना विटकरी रंगाचे प्रवेशद्वार आणि त्यावर त्याच रंगाचा कळस पाहावयास मिळतो. शांत वातावरण, प्रशस्त परिसर आणि मंदिराची विविधरंगी रचना येथे पाहायला मिळते. मंदिर परिसरात संगमरवरी फरशीचा वापर करण्यात आला आहे. प्रवेशद्वाराजवळ सुबक नंदीमंडप असून दगडात कोरलेला रेखीव नंदी तेथे स्थित आहे. मुख्य मंदिराच्या बाहेरही नंदीची लहान प्रतिकृती पाहावयास मिळते. दगडात कोरलेल्या मंदिराच्या आतील बाजूसही संगमरवरी फरशीचा वापर करण्यात आला आहे. सभामंडपात वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. मंदिराचा गाभारा १० फूट खोल असून त्यात शिवलिंग स्थित आहे. या गाभाऱ्यातील भिंतींवरही नक्षीकाम आहे.
महाशिवरात्रीपासून तीन दिवस मंदिरात यात्रा भरते. त्याच वेळी हरिनाम सप्ताहदेखील केला जातो व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने येथे आलेल्या भाविकांना अन्नदान केले जाते. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी दुपारी घोड नदीवरील शिवसेवा मंदिरातून श्री रामलिंगाची प्रतिमा ठेवलेली पालखी निघते. त्यानंतर पहाटेपर्यंत पालखीचा हा सोहळा गावात सुरू असतो. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यती होतात. बाहेर गावाहून आलेल्या भाविकांच्या निवासासाठी येथे भक्तनिवासाची सोय आहे.
मंदिरात सकाळी ५.३० वाजता व सायंकाळी ७ च्या सुमारास आरती होते. ग्रामस्थ, भाविक, भक्त या आरतीसाठी उपस्थित असतात. मंदिर परिसरात पूजेसाठी आवश्यक साहित्य, प्रसाद यांची विक्री केली जाते.