रामकृष्ण मंदिर

माना, ता. मूर्तीजापूर, जि. अकोला

राजा बब्रुहान याने वसवलेले माणिपूर म्हणजेच आजचे माना, अशी लोकआख्यायिका असलेल्या या गावात रामकृष्णाचे सुंदर मंदिर वसलेले आहे. उमा नदीच्या तीरावर वसलेल्या या अतिप्राचीन गावातील गढीवजा किल्ल्याजवळ १९३५ मध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती सापडली होती. तसेच १९५१ मध्ये गावातील शेतकऱ्याला शेत नांगरताना श्रीकृष्णाची मूर्ती सापडली होती. या दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना या मंदिरात करण्यात आली आहे. असे सांगितले जाते की श्रीरामाची मूर्ती गावातच राहण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या सत्याग्रहासमोर तत्कालीन ब्रिटिश सरकारला झुकावे लागले होते.
‘अकोला गॅझेटियर’मध्ये माना या ग्रामनामाच्या उत्त्पतीविषयीची आख्यायिका देण्यात आली आहे. ती अशी की येथे राजा बब्रुहान नावाचा असूर राजा राज्य करीत होता. त्या वेळी माना हे एवढे मोठे होते की त्यात १३ महाल (विभाग) होते. या बब्रुहान राजाच्या गुरूचे नाव माणकेश्वर महाराज असे होते. त्यांच्या नावावरूनच माना हे नाव पडले. गॅझेटियरमधील कथेनुसार, येथे हाजी रहमान साहीब नावाचा एक अवलिया आला. त्याच्या शिष्यांमध्ये शाह लाल साहीब आणि १७ घोडेस्वार होते. या अवलियाने राजा बब्रुहान याला इस्लाम धर्म स्वीकार कर अन्यथा लढण्यास तयार हो, असे आव्हान दिले. त्यावेळी माणकेश्वर महाराज यांनी राजास समोर ठाकलेल्या धोक्याची कल्पना दिली.
माणकेश्वर महाराज यांनी माना गावापासून सात मैल दूर असलेल्या रांजणपूर खिनखिनी या गावापर्यंत एक भुयार खणले. ते एवढे मोठे होते की त्यातून राजाच्या रथासह घोडेस्वार जाऊ शकत होते. परंतु राजाने आपल्या ७० हजार सैनिकांसह हाजीचा सामना करण्याचे ठरवले. त्या युद्धात हाजीचे अनेक सैनिक मारले गेले. शाह लाल साहीब जखमी झाला. पण दुर्दैवाने त्यात राजा बब्रुहानला वीरगती प्राप्त झाली. यानंतर येथे शाह लाल याला राजा म्हणून नेमण्यात आले. ज्या हिंदूंनी इस्लामचा स्वीकार केला नाही, त्या सर्वांना मानाच्या जुन्या भागात कैद करून ठेवण्यात आले. या भागातील इस्लामी सत्तास्थापनेचा इतिहास या लोकआख्यायिकेतून जतन करण्यात आलेला आहे. अलीकडच्या काळात राजा बब्रुहान याचे नाव महाभारतातील अर्जुन व चित्रांगदा यांचा पुत्र बब्रुवाहन याच्याशी जोडण्यात येऊन, त्याने ही नगरी वसवली अशी आख्यायिका रचण्यात आली आहे.
उमा नदीच्या तीरावर असलेल्या व सुमारे दोन हजार उंबरठे असलेल्या या गावात अनेक पुरातन मंदिरे, गोपुरे तसेच भग्न झालेल्या मूर्तींचे अवशेष आढळतात. ब्रिटिश राजवटीदरम्यान गावातील गढीवजा किल्ल्याजवळ जमिनीत ३ जुलै १९३५ रोजी प्रभू रामचंद्रांची पाषाणात घडवलेली सुंदर मूर्ती ग्रामस्थांना आढळली. ब्रिटिश सरकारने ही मूर्ती नागपूर येथील पुरातत्त्व संग्रहालयात ठेवण्याचे आदेश दिले. त्यावेळी ही मूर्ती गावातच राहावी, यासाठी ग्रामस्थांनी सत्याग्रह केला. अखेर ब्रिटिशांना ग्रामस्थांपुढे नमते घ्यावे लागले. पुढे ८ मे १९५१ रोजी या गावातील एका शेतकऱ्याला शेत नांगरत असताना श्रीकृष्णाची पाषाणात घडवलेली मूर्ती सापडली. त्यानंतर गावात मंदिर उभारून या दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. अत्यंत दुर्मीळ असलेल्या कसवटीच्या पाषाणात घडवलेल्या या दोन्ही मूर्तींवर बारीक कलाकुसर आहे. काही वर्षांपूर्वी गावात श्री विष्णूंची मूर्तीही सापडली. या मूर्तीचीही या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अलिकडेच या गावात तीन प्राचीन मूर्ती आढळल्या. त्यापैकी एक मूर्ती २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथ यांची आहे. या गावाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत पाचलेगावकर, जगद्गुरु शंकराचार्य, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आदींनी भेट दिल्याचे सांगण्यात येते.
माना गावाच्या मध्यवर्ती भागात रामकृष्ण मंदिर आहे. सर्वबाजूंनी तटबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या छोटेखानी प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात उजवीकडे एक मोठे सभागृह व डावीकडे मंदिर आहे. या सभागृहात उत्सवप्रसंगी विविध कार्यक्रम होतात. सभामंडप व दोन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारानजीक एका देवळीत मारुती, गरूड यांच्या मूर्ती व एक शिवपिंडी आहे. येथील अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपातील सर्व स्तंभ हे वरील बाजूने महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत.
सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहांची रचना आहे. शेजारी शेजारी असलेल्या या दोन गर्भगृहांमध्ये उजवीकडील गर्भगृहात संगमरवरी वज्रपिठावर काळ्या पाषाणातील श्रीकृष्णाची कोरीव काम असलेली वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. या मूर्तीच्या पाठशिळेवरही नक्षीकाम आहे. हातात बासरी घेऊन असलेल्या श्रीकृष्ण मूर्तीच्या चरणांजवळ स्त्री द्वारपाल व गायी कोरलेल्या आहेत. या मूर्तीच्या शेजारी डावीकडील देवकोष्टकात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती व उजवीकडे संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमा तसेच दोन पादुका आहेत. या गर्भगृहाच्या शेजारी डावीकडे संगमरवरी वज्रपिठावर श्रीरामाची मूर्ती आहे. श्रीकृष्ण मूर्तीप्रमाणेच या मूर्तीवरही कोरीवकाम आहे. या मूर्तीचे वेगळेपण असे की नेहमीप्रमाणे येथे श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण नसून येथील मूर्तीच्या एका हातात रामफळ आहे. या मूर्तीच्या पाठशिळेवर सीता व लक्ष्मणाच्याही मूर्ती कोरलेल्या आहेत. येथील सीतेच्या हातात सीताफळ आहे. या मूर्तीच्या उजवीकडील देवकोष्टकात गजानन महाराज यांची संगमरवरी मूर्ती आहे व डावीकडे अखंड काळ्या पाषाणातील कोरीव विष्णूमूर्ती आहे. विष्णूच्या हातांमध्ये शंख, चक्र, गदा आदी आयुधे आहेत. श्रीराम व कृष्ण यांच्या मूर्तींवर मुकुटांऐवजी फेटे परिधान केले जातात.
या मंदिरात दररोज काकडआरती, हरिपाठ, आरती व प्रसाद होतो. रामनवमी व गोकुळ अष्टमी उत्सव हे येथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. रामनवमीनिमित्त येथे सात दिवस भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. याशिवाय गजानन महाराज प्रकट दिन उत्सवही येथे साजरा केला जातो. उत्सवकाळात हजारो भाविक येथे श्रीराम व कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  • मूर्तीजापूर येथून १३ किमी अंतरावर
  • मूर्तीजापूर येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून मूर्तीजापूर येथे एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home