राम मंदिर

तुळशीबाग, पुणे


पुण्यातील गजबजलेल्या भागात बुधवार पेठेतील तुळशीबागेत रामाचे पेशवेकालीन प्रसिद्ध मंदिर आहे. पेशवाईत पुण्याचे सुभेदार असलेल्या श्रीमंत नारो आप्पाजी खिरे यांनी १७६२ साली सुमारे १४० फूट उंचीचे शिखर असलेल्या या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. खुद्द पेशवे व त्यांचे कुटुंबीय, तत्कालीन नामवंत सरदार, जहागीरदार मंडळी या मंदिरात दर्शनासाठी येत असत, असे सांगितले जाते.

पानिपतच्या भीषण युद्धानंतर पुणेकरांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशाने १७६२ साली श्रीमंत नारो आप्पाजी खिरे यांनी हे मंदिर बांधण्यास घेतले. नारोअप्पा यांनी त्या वेळचे वास्तुशास्त्रज्ञ नंदराम नाईक यांची मंदिराच्या वास्तुरचनेसाठी नियुक्ती केली होती. मंदिराचा उंबरा १७६३ च्या नोव्हेंबरमध्ये बसवला. मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती नोव्हेंबर १७६५ मध्ये घडवून आणल्या. हे काम प्रसिद्ध मूर्तिकार उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी केले. त्याबद्दल त्यांना ३७२ रुपये मोबदला देण्यात आला होता. मंदिराचे काम ३२ वर्षे सुरू होते आणि त्यासाठी १,३६,६६७ रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.

मंदिराच्या परिसरात तुळशीबाग ही मंदिरानंतर निर्माण झालेली बाजारपेठ आहे. रामाच्या दर्शनासाठी त्यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने येत असत. त्यांना याच भागात काही गृहोपयोगी वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून नारोआप्पा यांनी दोन-तीन व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली होती. हळूहळू या दुकानांच्या संख्येत वाढ होऊन आताची बाजारपेठ तयार झाली.

मंदिराचा परिसर एक एकर इतका आहे. मंदिराच्या प्रांगणात गणपती मंदिर व शंकराचे मंदिर आहे. मुख्य मंदिरासमोर दासमारुतीची मूर्ती आहे. दीड मीटर उंचीची ही मूर्ती काळ्या दगडात घडविलेली आहे. प्रांगणात दोन मजली नगारखाना आहे. मराठे व हैदराबादचा निजाम यांच्यातील खर्डा येथील लढाईसाठी जाताना श्रीमंत माधवराव पेशवे या मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी खर्ड्याची लढाई जिंकली, तर तिन्ही त्रिकाल चौघडा सुरू करीन, असा नवस केला होता. पेशव्यांना या लढाईत यश मिळाले. त्यामुळे त्यांनी नवसपूर्ती म्हणून हा नगारखाना बांधून दिला.

हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्यरचनेचे सुंदर उदाहरण आहे. मंदिराच्या उंच शिखरावर देव-देवतांची आणि संतांची शिल्पे आहेत. शिखराच्या वरच्या भागावर सोन्याचा मुलामा दिलेला कळस आहे. मंदिराच्या भिंतींवर रामाच्या पराक्रमाची भित्तीचित्रे लावलेली आहेत.

सुमारे २५ फूट उंचीच्या सभामंडपाचे छत लाकडी आहे आणि त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. तसेच खांब व कमानी रेखीव आहेत. गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला कोरीव काम केलेले सागवानी छत आहे. सुंदर नक्षीदार चांदीच्या प्रभावळीत राम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. मूर्तींमधील आयुधे व तलम पोशाख कलात्मकरीत्या कोरलेले दिसतात. दोन्ही बाजूंच्या कोनाड्यांत मारुती व विष्णूच्या संगमरवरी मूर्ती आहेत.

मंदिरात दत्तजयंती, आषाढी एकादशी, रामनवमी व चैत्री एकादशी, असे उत्सव साजरे केले जातात. रामनवमी उत्सवादरम्यान येथे नऊ दिवस शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होतात.

मंदिरात दररोज पहाटे ५.३० वाजता सनई-चौघडा वादन होते. सकाळी ६.३० ते ७ या वेळेत काकड आरती असते. सकाळी ९ वाजता आरती, दुपारी १२ वाजता महानैवेद्य, संध्याकाळी ७.३० वाजता सायंकालीन आरती व रात्री १० वाजता शेजारती, असा मंदिराचा दैनंदिन कार्यक्रम असतो. प्रत्येक एकादशीला सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० भजन, संध्याकाळी ५.३० वाजता कीर्तन व रात्री ८ वाजता प्रवचन असते. दर शनिवारी, एकादशीला आणि मंदिरामध्ये साजऱ्या होणाऱ्या इतर उत्सवांदरम्यान पहाटे ५.३०, सकाळी ९, संध्याकाळी ७.३० व रात्री १० वाजता सनई-चौघडा वादन होते. महाशिवरात्रीला लघुरुद्र आणि नरक चतुर्दशी व भाऊबीजेला दुपारी १२ वाजता आरती होते. पहाटे ५.३० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात रामाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस सुविधा
  • खासगी वाहने मंदिर परिसरात आणण्यास मज्जाव
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Back To Home