राजराजेश्वर मंदिर

अकोला, ता. अकोला, जि. अकोला

राजराजेश्वर महादेव हे अकोला शहराचे आराध्यदैवत आहे. राजराजेश्वराचे येथील शिवालय प्राचीन मंदिर वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून ओळखले जाते. या मंदिरामुळेच अकोला नगरीला ‘राजराजेश्वर नगरी’ म्हणूनही ओळखले जाते. राजराजेश्वरावर अकोला जिल्ह्यातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. अनेक ग्रामस्थ या ग्रामदैवताचे दर्शन घेतल्यानंतरच आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरूवात करतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात येते. या कावडयात्रेच्या वेळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.
‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्युम ए’च्या १९१०सालच्या आवृत्तीत या मंदिराविषयीची आख्यायिका देण्यात आली आहे. त्यानुसार, अकोलसिंह नावाच्या राजपूत सरदाराने या गावाची स्थापना केली. तो पूर्वीच्या काळी अकोल्यापासून सहा मैल अंतरावर असलेल्या कान्हेरी येथे राहात असे. सध्या अकोला जेथे वसलेले आहे, त्या भागात घनदाट जंगल होते. या जंगलात एक महादेवाचे मंदिर होते. अकोलसिंहची पत्नी या मंदिरात महादेवाची पूजा करण्यासाठी नेहमी येत असे. राजाच्या रागीट स्वभावामुळे ती त्याला न सांगता दररोज सूर्योदयापूर्वी, अंधारात किल्ल्याबाहेर पडून शिवशंकराची पुजा करण्यासाठी या मंदिरात येत असे. मात्र ती न सांगता दररोज पहाटे कुठेतरी जात असल्याने राजाला तिच्या चारित्र्याचा संशय येऊ लागला.
एके दिवशी राणी मंदिरात जाण्यासाठी किल्ल्याबाहेर पडताच त्याने तिचा पाठलाग केला. त्याला मंदिराच्या दारात पाहिल्यानंतर राणीला त्याच्या मनातील भाव समजले. पतीने आपल्या चारित्र्यावर संशय घेतल्याने दुखावलेल्या राणीने आपल्याला स्वतःमध्ये सामावून घेण्याचे साकडे राजराजेश्वराला घातले. त्याचक्षणी पिंडी दुभंगली गेली आणि पिंडीने राणीला आपल्यात सामावून घेतले. त्यानंतर शिवपिंडी पुन्हा अखंड झाली. त्यावेळी राजाच्या हातात राणीच्या साडीच्या पदराचा काही भाग लागला. असे सांगण्यात येते की पुढे अनेक वर्षे तो साडीचा तुकडा शिवलिंगाच्या बाहेर दिसत असे. यानंतर दुःखाने वेडापिसा झालेल्या अकोलसिंह याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ येथे वस्ती वसवली. एकदा येथील एका जागेवर एक ससा कुत्र्याचा पाठलाग करीत असल्याचे अकोलसिंह यास दिसले. हा शुभसंकेत मानून त्याने या ठिकाणी त्याची गढी बांधली. पुढे औरंगजेबाने त्याचा वजिर-ए-आझम असदखान यास अकोला हे शहर इनाम म्हणून दिल्यानंतर त्याने याच गढीच्या जागेवर १६९७मध्ये एक किल्ला बांधला. असदगड म्हणून तो ओळखला जातो. या किल्ल्यानजीक राजराजेश्वराचे हे प्राचीन मंदिर स्थित आहे. १९१०मधील नोंदीनुसार, या मंदिराच्या मालकीची १०० एकर जमीन होती, तसेच मंदिरास वार्षिक १५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळत असे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिरासमोर भव्य प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार राजस्थानी रेड स्टोन वापरून बांधलेले आहे. त्यात एक मुख्य प्रवेशद्वार व दोन्ही बाजूला लहान दरवाजे आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरसबंदीयुक्त प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या असलेल्या या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एक मोठी घंटा व त्याखाली एका चौथऱ्यावर अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मोठी मूर्ती आहे. नंदीच्या चौथऱ्यावर पाषाणी कासव मूर्ती, छोटी शिवपिंडी तसेच गणेशाची पितळी मूर्ती आहे. सभामंडपातील सर्व स्तंभ हे महिरपी कमानीच्या आकाराने एकमेकांशी जोडलेले आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वर छताकडील भागावर शिवपरिवाराची भलीमोठी प्रतिमा आहे. गर्भगृहात मध्यभागी मोठ्या दगडी शाळुंकेमध्ये राजराजेश्वराची पिंडी आहे. या शिवलिंगावर नागाने छत्र धरलेले आहे. उत्सवांच्या प्रसंगी त्यावर धातुचा मुखवटा बसवण्यात येतो. शिवलिंगाच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीवर पार्वतीमाता विराजमान आहे. मंदिरासमोरच कालिका माता व गणेश मंदिरे आहेत. कालिका माता मंदिराच्या आवारात दत्तात्रय, रामदरबार, राधा-कृष्ण, गजानन महाराज आदींच्या मूर्ती आहेत.
राजराजेश्वराच्या दर्शनासाठी दिवसभर येथे भाविक येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात असंख्य भाविक राजराजेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येतात. या महिन्याच्या अखेरच्या सोमवारी येथे येणाऱ्या कावड यात्रेचे शहरवासीयांसाठी दिवाळीएवढेच महत्त्व आहे. १९६४ मध्ये अकोल्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी शिवभक्तांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने राजराजेश्वराला जलाभिषेक केला होता. त्यानंतर चांगला पाऊस झाला आणि दुष्काळ मिटला. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. या कावडयात्रेच्या आदल्या दिवशी अनेक कावडधारी अकोल्यापासून २० किमी अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पात्रातून कावडीमध्ये जल भरतात. त्यानंतर रात्रभर अनवाणी पायी प्रवास करत ते शहराच्या वेशीजवळ येतात. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात पालखी व कावड यात्रा मंदिराकडे मार्गस्थ होते. मंदिरात आल्यावर या कावडींमधील जलाने राजराजेश्वरावर अभिषेक केला जातो. या यात्रेत अकोला जिल्ह्यातील असंख्य भाविकांबरोबरच शेजारील जिल्ह्यांतील अनेक भाविकही सहभागी होतात.
कार्तिक महिन्यातील वैकुंठ चतुर्दशीला येथे हरिहर मिलन सोहळा होतो. या सोहळ्याच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केला जातो. त्यानंतर षोडशोपचार पूजा झाल्यावर राजराजेश्वराला ५६ भोग अर्पण केले जातात. नंतर महाआरती केली जाते. या सोहळ्यालाही असंख्य भाविक उपस्थित असतात. याशिवाय कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी म्हणजेच दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघतो.
२०२४ मध्ये राजराजेश्वर मंदिर परिसराच्या विकासकामासाठी सुरू केलेल्या खोदकामादरम्यान एक भुयार आढळले. या भुयारात सुमारे २०० वर्षे जुनी इमारत आढळली. या इमारतीच्या दगडांवर ‘जय बजरंग बली’, ‘जय श्रीराम’ लिहिलेले असून भुयाराच्या आत दोन खोल्या आहेत. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक येथील राजराजेश्वराचे दर्शन घेऊ शकतात. दररोज केवळ दुपारी ११.३० ते १२ या वेळेत नेवैद्याकरिता (भोग) गर्भगृहाचे दरवाजे बंद असतात.

उपयुक्त माहिती:

  • अकोला एसटी स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून अकोल्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२२९३९८१०, ९८२३०४७४१२
Back To Home