रायगडावरील मंदिरे

जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी, शिर्काई देवी मंदिर

किल्ले रायगड, ता. महाड, जि. रायगड

अभेद्य, दुर्गम, बेलाग अजिंक्य अशा विशेषणांनी ज्याचे वर्णन करण्यात येते, तो किल्ले रायगड ही शिवस्वराज्याची राजधानी. महाराष्ट्राच्या यातीर्थक्षेत्राबद्दल सभासदाची बखर असे सांगते कीराजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोटदौलताबाद हा पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच असे देखोन संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा.’ या राजधानीच्या गडावरील शिवराजांच्या नित्यपूजेतील एक स्थान म्हणजे जगदीश्वराचा वा वाडेश्वराचा प्रासाद

रायगड हा अत्यंत प्राचीन असा गड आहे. तो तणस, रासीवटा तसेच नंदादीपाचा डोंगर या नावाने ओळखला जाई. रायरी हेही त्याचे एक नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये जावळीबरोबरच रायरीचा हा किल्लाही काबीज केला. त्यावेळी त्यांनीच या किल्ल्यास रायगड असे नाव ठेवले. १६७१७२ च्या सुमारास शिवरायांनी हा किल्ला कायमच्या वास्तव्यासाठी निवडला. कल्याणचे सुभेदार आबाजी सोनदेव यांनी शिवछत्रपतींच्या आज्ञेने या गडावर १६७३ पूर्वी इमारती बांधून गड सुसज्ज केला. त्यानंतर १६७४ च्या राज्याभिषेकानिमित्ताने येथे जगदीश्वराचा प्रासाद म्हणून आज ओळखले जाणारे मंदिर उभारण्यात आले. मुळात हे वाडेश्वराचे मंदिर आहे. ते हेमाडपंती बांधणीचे होते. राज्याभिषेकाच्या निमित्ताने त्याचा जीर्णोद्धार करून त्यास प्रासादाचे स्वरूप देण्यात आले

जगदीश्वराच्या प्रासादाचे काम स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी केले. याचे काही ऐतिहासिक पुरावे रायगडावरच शिलालेखाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. जगदीश्वर मंदिराच्या आवारास असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायरीवरसेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकरअसे लिहिलेले आहे. हा कोरीव शिलालेख देवनागरीमध्ये आहे, मात्र त्यातील तेवढा मोडीलिपीतील आहे की याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे तेथीलइटळकरचे वाचनइंदुलकरअसेही केले जाते. याच दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर आणखी एक मोठा, आठ ओळींचा शिलालेख आहे. तो संस्कृत, देवनागरी लिपीत आणि शार्दूलविक्रिडितात लिहिलेला श्लोक आहे. तो पुढीलप्रमाणे :

श्रीगणपतेय नमः 

प्रासादोजगदीश्वरस्यजगतामानंदsदोनुज्ञया

श्रीमछत्रपतेः शिवस्य नृपतेः सिंहासने तिष्ठतः।

शाके षण्नवबाणभूमिगणनादानंदसंवत्सरे

ज्योतीराजमुहुत्रकिर्तिमहिते शुक्लेशसांर्प्पे तिथौ।।१ ।। 

वापीकूपकडागजिरूचिरै हर्म्यैर्वनेवीथिके 

स्तंभैः कुंभिगृहे नरेंद्रसदनैरभ्रंलिहै मिहिते 

श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो

यावच्च्ंद्रदिवाकरौविलसतस्तावत्समुज्रुंभते।।२।।

याचा अर्थ असा की शके १५९६ आनंद नाम संवत्सराची ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या राजज्योतिषांनी काढलेल्या कीर्तिमान शुभ मुहूर्तावर जो छत्रपती शिवनृपती सिंहासनाधीष्ठित झाला त्याच्या अनुज्ञेने जगताला आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद हिराजीने अनेक तळी, विहिरी, तलाव, रम्य वनश्री, कुंभिगृहे (म्हणजे गजशाळा), राजप्रासाद, स्तंभ इत्यादींनी मंडित असलेल्या, वाणीला अवर्ण्य अशा श्रीमंत रायगडावर निर्माण केला. जोवर आकाशात चंद्रसूर्य नांदतील तोवर हा नांदत राहो.

किल्ल्यावरील बाजारपेठ म्हणून जी दाखवली जाते, त्या इमारती ओलांडून साधारणतः एक किलोमीटर पुढे आल्यानंतर जगदीश्वर मंदिर आहे. मंदिराभोवती दगडी जाडजूड प्राकारभिंत आहे. आत सर्वत्र दगडी फरसबंदी केलेली आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. हे प्रवेशद्वार अत्यंत सुबक आहे. ते रायगडच्या नगारखान्याची (किंवा काही अभ्यासकांच्या मते जी शिवपूर्वकाळातील विजयस्तंभाची इमारत आहे त्याची) छोटी प्रतिकृती आहे. या द्वारावर नक्षीकाम केलेले आहे. दोन्ही बाजूंस कमळाचे चिन्ह दिसते. पश्चिमेचा दरवाजा काहीसा लहान आहे. हल्ली येथूनच मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला जातो. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे. या दरवाजातून मंदिराच्या मागील बाजूने प्राकारात प्रवेश होतो

मंदिरासमोर नंदीची मोठी पाषाणमूर्ती आहे. शिल्पसौष्ठवाचा उत्तम नमुना असलेली ही मूर्ती आज भग्नावस्थेत आहे. या मूर्तीनजीकच्या परिसरात राज्याभिषेक सोहळ्याच्या कालावधीत शिवाजी महाराजांची आणि कवी भूषण यांची पहिली भेट झाल्याची कथाश्रीमान योगीया कादंबरीत रणजीत देसाई यांनी दिली आहे. तीच कहाणी सर्वजण इतिहास म्हणून सांगतात. मात्र कवी भूषण म्हणजेच कानपूर जिल्ह्यातील त्रिविक्रमपूर येथील कवी भूषण रत्नाकर त्रिपाठी हे १६६७ च्या अखेरीस शिवरायांच्या दरबारात दाखल झाले होते. जगदीश्वराचे मंदिर संपूर्ण दगडात, उंच जोत्यावर बांधलेले आहे. ते आयताकृती आकाराने भव्य आहे. चौदा हजार चौरस फूट इतकी जागा या मंदिराने व्यापली आहे. या मंदिरावर तत्कालीन विजापुरी वा मुस्लिम स्थापत्यशैलीचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. मंदिरास शिखरस्थानी घुमट आहे त्याच्या चारही बाजूंना सहा मनोरे वा मिनार आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या वरच्या बाजूलाही दोन मिनारांचे उठावशिल्प कोरलेले आहे. या चौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे

मंदिराच्या सभामंडपात मोठा गोल दगडी चौथरा आहे. येथे पूर्वी कासव होते, असे सांगितले जाते. सभामंडपास पूर्वेकडे, तसेच दक्षिण आणि उत्तर दिशेने असे एकूण तीन दरवाजे आहेत. गर्भगृहाच्या दरवाजाच्या पायरीवर कीर्तिमुख आहे. असेच कीर्तिमुख पूर्व दरवाजावरही आढळते. गर्भगृहाच्या द्वारावर वरील बाजूस दोन यक्षमुखे आहेत. गाभाऱ्याच्या मध्यभागी जगदीश्वराची पिंडी आहे. येथे असलेली पिंडी ही मूळ नसून ती नंतर बसविण्यात आलेली आहे, असे सांगितले जाते. शिवछत्रपती रायगडावर असताना नित्यनेमाने या मंदिरात दर्शनासाठी येत असत. शिवराज्याभिषेकापूर्वी नंतरही त्यांनी मिरवणुकीने जाऊन जगदीश्वराचे दर्शन घेतल्याची नोंद आहे

शिवसमाधी स्थान

जगदीश्वर मंदिराच्या समोरच संपूर्ण महाराष्ट्राचे पुण्यतीर्थ असे छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थान आहे. २२ मार्च १६८० रोजी शिवछत्रपतींना ज्वराची व्यथा जाणवू लागली. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि अखेर श्रीनृपशालिवाहन शके १६०२ रौद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, शनिवार ता. एप्रिल १६८० रोजी दोन प्रहरी म्हणजे दुपारी १२ वाजता शिवछत्रपतींचे महानिर्वाण झाले. त्यांच्या पवित्र पार्थिवावर जगदीश्वराच्या प्रासादासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले. युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते महाराजांच्या पार्थिवास मंत्राग्नी देण्यात आला. उत्तरक्रिया साबाजी भोसले शिंगणापूरकर यांनी राजाराम महाराजांना समीप बसवून केली. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी शिवछत्रपतींची समाधी बांधली. ही समाधी म्हणजे एक अष्टकोनी चौथरा होता

कालांतराने या समाधीची दुरवस्था झाली. ‘रायगडची जीवनगाथाया संशोधनग्रंथात शां. वि. आवळसकर यांनी पेशवे दफ्तर अन्य कागदपत्रांच्या आधारे गडावर होणाऱ्या विविध खर्चांची माहिती नोंदवली आहे. मात्र त्यात समाधीचा उल्लेख नाही. इंग्रजांनी हा किल्ला घेतल्यानंतर १० मे १८१८ रोजी दुपारी कर्नल प्रॉथर हा इंग्रज अधिकारी गडावर गेला होता. त्यावेळी त्याला समाधी भग्न झाल्याचे दिसले. १८८० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन समाधीस्थळ शोधून तेथे साफसफाई केली. १८८५ मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल हे गड पाहून गेले. त्यांनी समाधीची भग्नावस्था पाहून दुरुस्तीबाबतच्या सूचना कुलाब्याच्या कलेक्टरला पत्र लिहून केल्या. १८८५ मध्ये गोविंद आबाजी जोशी, वसईकर हे रायगडावरील समाधीची अवस्था पाहून आले त्यांनी त्यावर पुस्तक लिहून अनेकांचे लक्ष वेधले. या पुस्तकाचे नावरायगड किल्ल्याचे वर्णनछत्रपती शिवाजी महाराजांची थोडीशी कारकीर्द आणि महाराजांचे समाधीचे जीर्णोद्धाराविषयीं प्रार्थनाअसे होते. पुढे महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक आदी नेत्यांच्या रेट्यातून समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले, तसेच गडावर उत्सव सुरू झाले. १९२५ मध्ये समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला. एप्रिल १९२६ रोजी तात्यासाहेब केळकर, राजे लक्ष्मणराव भोसले आदींनी गडावर जाऊन समाधीची वेदोक्त पूजा केली. त्या दिवशी शिल्पकार फडके यांनी बनविलेला शिवछत्रपतींचा अर्धपुतळा येथे सिंहासनशिलेवर बसवण्यात आला. तसेच शिल्पकार करमरकर यांनी केलेला ब्राँझचा प्रतिमाफलक तेथे मांडण्यात आला. यानंतर १९३५ मध्ये या समाधीचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला.

या समाधीचा आकार शिवछत्रपतींच्या राजमुद्रेप्रमाणे अष्टकोनी आहे. भूतलापासून काही इंच वर अष्टकोनी आकारात दगडी फरसबंदी करण्यात आली आहे त्यावर मध्यभागी चिरेबंदी पाषाणाचा उंच अष्टकोनी चौथरा उभारण्यात आला आहे. या चौथऱ्यास जाळीदार कठडा आहे. त्यावर मधोमध उंच मेघडंबरी त्यात शिवाजी महाराजांचे उठावशिल्प बसवण्यात आले आहे. या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येथे सतत शिवप्रेमी येत असतात. शिवपुण्यतिथीच्या दिवशी येथे हजारो लोक जमून शिवछत्रपतींना आदरांजली अर्पण करतात

शिर्काई देवी मंदिर

जगदीश्वर मंदिरापासून काही अंतरावर शिर्काई देवीचे लहानसे प्राचीन मंदिर आहे. शिर्काई म्हणजेच महिषासुरमर्दिनी. विशेष म्हणजे या मंदिरात सभागृह गर्भगृह नाही. गर्भगृहाच्या जागेवर केवळ पाषाणाचा देव्हारा आहे. त्यामध्ये शिर्काई देवीची अखंड पाषाणातील अत्यंत रेखीव मूर्ती स्थानापन्न आहे. ही देवी शिर्के घराण्याची कुलदेवता आहे. या मंदिराविषयी शिवकाळापूर्वीपासूनचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. शिवकाळात ही देवता गडदेवता म्हणून नावारूपास आली. येथील कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभी शिर्काई देवीची विधिवत पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा होती. ती आजही कायम आहे

रायगड किल्ल्याचा महादरवाजा पार करून बालेकिल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर प्रथम हत्ती तलाव येतो. तेथून गंगासागर तलावाकडे जाण्यासाठी एक छोटी वाट आहे. या वाटेतच हे मंदिर आहे. १११२ व्या शतकात रायगड हा शिर्के घराण्याकडे होता. मंदिरासमोरच होळीचा माळ आहे. डाव्या बाजूस असलेला चौथरा शिर्काई देवीचा घरटा म्हणून ओळखला जातो. घरट्याच्या मागे उंबराच्या झाडांच्या दाटींमध्ये शिर्काई देवीचे मंदिर आहे. त्यावेळी त्यांनी आपल्या या कुलदेवतेचे स्थान येथे स्थापन केले असावे.

१८८५ मध्ये गोविंद बाबाजी जोशी, वसईकर यांनी प्रसिद्ध केलेल्यारायगड किल्ल्याचे वर्णनया पुस्तकामध्ये, तेव्हा तेथे शिर्काई देवीच्यादेवळाचा घरटाहोता असा उल्लेख आलेला आहे. या पुस्तकाच्या पान क्र. ३७ वर असे म्हटले आहे कीगंगासागराचे पूर्वेकडे एक देवळाचा घरटा बराच दूर आहे. त्यांत मूर्ती वगैरे काहीं नसून तेथील मूर्ती अष्टभुजांची महिषासूरमथनी एके ठिकाणीं पलीकडे बसविलेली दृष्टीस पडते. या देवीस शिरकाबाईचें देऊळ असें म्हणतात.’ दुर्गसंशोधक प्र. के. घाणेकर यांच्यानुसार, शिर्काई देवीच्या मूळ मंदिरावर वीज पडली. त्यामुळे ते भग्न झाले होते. पुढे १९३५ मध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम करणारे कंत्राटदार तात्यासाहेब सुळे यांनी शिर्काई देवीचे सध्याचे छोटेखानी मंदिर उभारले

या देवतेविषयीचे अनेक ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाल्यानंतर काही अनिष्ट घटना घडल्या. त्यामुळे निश्चलपुरी गोसावी यांनी शिवरायांचा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला. त्या अनिष्ट घटना घडण्यास जी काही कारणे निश्चलपुरी यांनी नोंदवली होती, त्यात शिर्काई देवीची पूजा करण्यात आली नव्हती हे एक कारण होते. कोणत्याही शुभप्रसंगी वा मोहिमेवर जाण्यापूर्वी शिर्काईचा आशीर्वाद घेतला जात असे. .. १७७२ मध्ये रायगडचा पोतनीस विठ्ठल यशवंत पेशव्यांना जुमानेसा हिशेब देईनासा झाल्यावर, तसेच रायगडचा हवालदार यशवंत मोरे हा सिद्दीस सामील होणार असल्याचा रंग दिसल्यावर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी रायगड ताब्यात घेण्यासाठी आपले सरदार आपाजी हरि यांना पाठवले. त्यांनी १७७३ मध्ये हा किल्ला लढून तसेच युक्तीने ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने गडावरील मुख्य दैवत शिर्काईचे दर्शन घेतले. त्यावेळी त्याने देवीपुढे दोन रुपये दक्षिणा ठेवली. त्याने येथे नवचंडी होम केल्याचाही उल्लेख आहे शिर्काईच्या खर्चासाठी ठरीव उत्पन्नही लावून देण्यात आले होते. रायगड फत्ते व्हावा म्हणून शिर्काईस दागिन्यांचा नवस करण्यात आला होता. त्याविषयीची सनद पुण्याहून सादर झाल्यानंतर देवीस दागिने तयार करून धाडण्यात आले, अशीही पेशवे दफ्तरातील नोंद आहे. यानंतर रायगडच्या हवालदारपदी नेमलेल्या हंसाजी खैरा याने शिर्काईस बकऱ्याचा बळी देऊन देवीची यात्रा केली. पुढे ऑक्टोबर १७७५ या दिवशी महाडहून रायगडावर दोन मुखवटे पाठवल्याचा उल्लेख पेशवे दफ्तरातील अप्रकाशित कागदांत (रूमाल क्र. ) आहे ते शिर्काईचे मुखवटे असावेत असेरायगडची जीवनगाथाया संशोधनग्रंथात शां. वि. आवळसकर यांनी म्हटले आहे

शिर्काई देवीपुढे नवरात्रांत घट उठल्यावर गोंधळ होत असे. १७८६ मध्ये तो बंद पडला. त्यानंतर किल्ल्यावर उपद्रव सुरू झाला. तेव्हा पुन्हा गोंधळ सुरू करण्यात आला. गडावर कोणत्याही तऱ्हेचा उपद्रव सुरू झाला की शिर्काईची यात्रा करावयाचीच असा रिवाज असे त्या उत्सवाप्रीत्यर्थ होणाऱ्या खर्चाच्या याद्या उपलब्ध आहेत, असे या संशोधन ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. शिर्काईस सरकार खात्यातून साडीचोळी तसेच दर दसऱ्याच्या दिवशी बोकडाचा बळी दिला जात असे. . . १७८७ मध्ये रायगडवर मुसळधार पाऊस पडून महादरवाजावरील हौद रात्रीच्या वेळी फुटला पाण्याचा लोंढा दरवाजावरून वाहू लागला. दरवाजा उघडून पाण्यास वाट करून देणे अशक्य झाले. तेव्हा शिर्काईस बोकड देण्याचा नवस करण्यात आला होता, अशीही एक नोंद आहे. यावरून येथील शिर्काई देवीस शिवकाळात पेशवाईत असलेले महत्त्व लक्षात येते.

उपयुक्त माहिती

  • महाडपासून २६ किमी अंतरावर
  • महाडवरून एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने गडाच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • पायथ्यापासून गडावर येण्यासाठी रोपवेची सुविधा
  • पाचाड येथे निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home