रहाळकर राममंदिर

सदाशिव पेठ, पुणे


राजे-रजवाड्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात महाल, वाड्यांबरोबर जुन्या काळापासून खासगी देवस्थानेही उभी आहेत. कालांतराने त्यातील अनेक देवस्थाने सर्वांसाठी खुली झाली. सदाशिव पेठेतील श्री रहाळकर राम मंदिरदेखील त्यापैकीच एक. छत्रपती शाहू महाराजा़ंच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान बाजीराव पेशवे यांचे पुतणे सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या नावाने सदाशिव पेठ ओळखली जाते‌. येथे विश्रामबाग वाडा आणि विंचूरकर वाडा यांसारखे अनेक जुने वाडे आजही इतिहासाची साक्ष देतात. हे वाडे शहराच्या समृद्धीची, राजेशाही जीवनशैलीची प्रतीके आहेत, तर येथील मंदिरे आध्यात्मिक प्रगतीचे दर्शक आहेत.

इंग्रज राजवटीत सदाशिव पेठेत राहणाऱ्या गणेशबाबा रहाळकर यांनी १८३८ मध्ये असाच शहराच्या आध्यात्मिक प्रगतीला हातभार लावत आपल्या जागेत राम मंदिर उभारले. या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने मूर्तीची प्रतिष्ठापना करून रहाळकर कुटुंबीय, त्यांचे नातलग आणि जवळच्या लोकांनी श्रीरामाची पूजा सुरू केली. नजीकच्या काळात उत्सवप्रियतेने नावाजलेले हे मंदिर कालांतराने सर्वांसाठी खुले करण्यात आले. श्री रहाळकर राम मंदिर याच नावाने आजही ते प्रसिद्ध आहे. नागनाथपारावरून शनिपाराकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या श्रीरामतीर्थ या इमारतीमध्ये हे मंदिर आहे.

मंदिरातील मूर्तीबाबत सांगितले जाते की, येथे सध्या असलेली मूर्ती एका सराफाकडे गहाण होती. ती मूर्ती विकण्याची इच्छा त्याने गणेशबाबा रहाळकर यांच्याकडे व्यक्त केली. रहाळकर यांच्या मनात ती मूर्ती भरली, परंतु पैशांअभावी त्यांना ती विकत घेता आली नाही. काही दिवसांनी ज्या सराफाकडे मूर्ती होती त्याला पोटशूळ उठले. अनेक उपाय करूनही तो बरा होईना. त्याचवेळी त्याला श्रीरामाने स्वप्नदृष्टांत देऊन मूर्ती गणेशबाबा रहाळकर यांच्याकडे पोचती करा, असे सांगितले. स्पप्नदृष्टांतानुसार सराफाने ती मूर्ती पालखीतून श्री. रहाळकर यांच्या घरी विनामुल्य पोचविल्यानंतर त्याचा पोटशूळ कमी झाला. त्यानंतर गणेशबाबा रहाळकर यांनी सध्या असलेल्या जागेत मंदिर बांधून या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

मंदिराची उभारणी अतिशय साधी असली तरी त्या साधेपणात रामभक्तीने भारलेल्या वातावरणाची अनुभूती येते. मंदिराच्या भिंती पूर्वी दगड-मातीने बांधल्या गेल्या होत्या. मात्र काळाच्या ओघात त्याची दुरवस्था झाल्याने त्यांची जागा आता पक्क्या भिंतींनी घेतली आहे. मंदिराच्या पुढे लहानसे अंगण आहे. प्रवेशद्वारातून आत अंगणात आणि तेथून पुढे मंदिरात जाताना मुख्य मंडप लागतो. त्यात हनुमंताची मूर्ती प्रतिष्ठापित करून छोटेसे मंदिर उभारण्यात आलेले आहे. या निस्सीम रामभक्ताला वंदन करूनच भाविकांना रामदर्शनाला पुढे व्हावे लागते.

मंदिरात सिंहासनाधिष्ठित रामपंचायतन मूर्ती आहेत. अशा मूर्ती महाराष्ट्रात एकमेव असल्याचे सांगितले जाते. (रामपंचायतन म्हणजे राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या एकत्रित मूर्ती) प्राचीन ग्रंथांमध्ये श्रीरामाच्या राज्याभिषेकाचे वर्णन आहे, तशीच ही मूर्ती असल्याने याला पट्टाभिषिक्त रामपंचायतन म्हटले जाते. सिंहासनावर बसलेले श्रीराम व सीता, डावीकडे शत्रुघ्न व उजवीकडे लक्ष्मण व भरत आहेत. तसेच भालदार-चोपदार, नल-नील, जाम्बुवंत, सुग्रीव आदी त्यात आहेत. एकाच संगमरवरी दगडात हे सर्व कोरलेले आहे.

मंदिरात दररोज सायंकाळी आरती होते. आठवड्यातील काही दिवस महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होतो. या मंदिरात रामनवमी, तसेच हनुमान जयंतीच्या उत्सवाला शेकडोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. येथील एक वैशिष्ट्य म्हणजे रामनवमीच्या आदल्या दिवशी अष्टमीला कौसल्येचे प्रातिनिधिक रूप म्हणून गर्भवती स्त्रीला बोलावून तिचे डोहाळे जेवण केले जाते. येथील डोहाळे जेवण व रामजन्माचा सोहळा पुण्यात प्रसिद्ध आहे. मागील १८३ वर्षे रामसेवेची ही परंपरा रहाळकर कुटुंबीयांकडून अविरत सुरू आहे. अत्याधुनिक पुणे शहरात वर्दळीच्या ठिकाणी असलेले रहाळकर राम मंदिर अजूनही आपल्या जुन्या वास्तुशैलीचा बाज कायम राखून आहे. सध्या रहाळकर कुटुंबातील सातवी पिढी श्रीरामाच्या सेवेत आहे.

उपयुक्त माहिती:

  • पुणे रेल्वेस्थानकापासून पाच किमी अंतरावर
  • स्वारगेट बसस्थानकापासून तीन किमी
  • आप्पा बळवंत चौकातून पायी सात मिनिटांवर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
Back To Home