छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म स्थळ असलेला पुरंदर किल्ला हा स्वराज्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक. हा बलाढ्य किल्ला मानला जातो. हा किल्ला स्वराज्यात आणल्याच्या आनंदात छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना त्वरित सरनौबत केले होते. अशा या अद्वितीय किल्ल्यावर महादेव अर्थात पुरंदरेश्वराचे मंदिर आहे.
पुराणात या डोंगराचा उल्लेख ‘इंद्रनील पर्वत’ असा आढळतो. हनुमान जेव्हा लक्ष्मणाच्या उपचारासाठी औषधी वनस्पती असणारा द्रोणागिरी पर्वत वायुमार्गे उचलून नेत होता, तेव्हा त्याचा काही भाग खाली पडला, तोच हा ‘इंद्रनील पर्वत’ असे मानले जाते.
पुरंदर किल्ल्याला मोठा इतिहास आहे. हा यादवकालीन किल्ला तेराव्या शतकात उभारण्यात आला होता. त्यानंतर पर्शियन वंशाच्या राजघराण्याकडे या किल्ल्याचा ताबा होता. महाराजांना हा किल्ला प्रिय होता. त्यांनी मोठ्या हिमतीने हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला होता. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाने या किल्ल्यावर आक्रमण केले. किल्लेदार असलेल्या मुरारबाजींनी मोठ्या हिकमतीने हा किल्ला लढवला, पण अखेर त्यांना वीरमरण आले. त्यामुळे व्यथित झालेल्या शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या परिसरातच तहाची बोलणी केली. तो ऐतिहासिक तहही ‘पुरंदरचा तह’ म्हणूनच ओळखला जातो. ज्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले २३ किल्ले दिलेरखानाला द्यावे लागले होते.
पुरंदरेश्वर मंदिरासाठी जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. त्यापैकी हडपसर, सासवड हा सर्वात जवळचा मार्ग. नारायणपूर गावात पोहचल्यानंतर घाट रस्ता आहे. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला हा परिसर असल्याने प्रवासात निसर्गशोभा पहाता पहाता गड गाठता येतो. गडावर अनेक ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन होते व त्यापैकी एक पुरंदरेश्वर मंदिर आहे.
दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार थोरले बाजीराव यांनी केल्याचा उल्लेख आहे. मुरारबाजींच्या समाधीच्या पुढे उजवीकडे काही पायऱ्या चढून गेल्यानंतर हे मंदिर दिसते. मंदिरासमोर वृक्षराजी आणि पांढऱ्या रंगातील मध्यम आकारातील नंदी मंडप आहे. मंडपात सुरेख नंदी विराजमान आहे. पाषाणात केलेल्या बांधकामामुळे छत आणि मंदिराच्या अंतर्गत भागाची सुंदरता नजरेत भरते. सभागृह आणि गाभारा अशी मंदिराची पारंपरिक रचना आहे. गाभाऱ्यातील शिवपिंडी रेखीव आहे.
या मंदिराच्या बाजूलाच रामेश्वर मंदिर आहे. हे पेशवे घराण्याचे खासगी मंदिर होते. ही वास्तूही देखणी आहे. थोडे वर पेशव्यांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. हा वाडा पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. याच परिसरात आणखी एक पुरातन शिवमंदिर आहे.
मुरारबाजींची समाधी, पद्मावती आणि राजाळे तलाव, छोटे-मोठे आड, ब्रिटिशांनी बांधलेले बंगले, बराकी, चर्च अशा अन्य अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूही या ठिकाणी पाहता येतात. समुद्र सपाटीपासून हे ठिकाण चार हजार ४७२ फूट उंचीवर आहे. त्यामुळे या भागातील वातावरण खूपच प्रसन्न आहे.
दर सोमवारसह श्रावण महिन्यात शिवभक्तांची पुरंदरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी असते. महाशिवरात्रीलाही भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली असते. त्यामुळे या दिवशी येथे जत्रेचे स्वरूप येते. गडावर लष्कराचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे भाविक आणि शिवप्रेमींना काही नियमांचे पालन करावे लागते. लष्करी तपासणीनंतरच येथे प्रवेश मिळतो. त्यामुळे येथे येताना आधार कार्ड किंवा तत्सम ओळखपत्र आवर्जून सोबत ठेवावे. गड किंवा मंदिरात जाण्यासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत प्रवेश दिला जातो.