विदर्भात संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गजानन महाराज यांसारखे विविध पंथांचे अनेक संत होऊन गेले. संतांच्या या मांदियाळीतील एक नाव म्हणजे पुंडलिक महाराज. ‘पुंडलिक नगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिरसो गावी पुंडलिक महाराजांच्या समाधीचे तसेच प्रसन्न मूर्तीचे दर्शन घडते. पुंडलिक महाराजांच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच अकोल्यातील गोरेगाव येथे त्यांचा जन्मोत्सव साजरा होत असे. ही परंपरा येथेही सुरू आहे. महाराजांच्या जन्मोत्सवाच्या, तसेच पुण्यतिथी सोहळ्याच्या वेळी हा परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून जातो.
पुंडलिक महाराजांचा जन्म अकोल्यातील काटेपूर्णा नदीकाठाजवळील गोरेगाव येथे धनगर कुटुंबात १० एप्रिल १९३२ रोजी (चैत्र शुद्ध पंचमी, शके १८६४) रविवारी रात्री, प्रथम प्रहरी रोहिणी नक्षत्रावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडुजी, तर मातेचे नाव मंजुळाबाई असे होते. त्यांच्या जन्माच्या वेळी गावातील रंगमंचावर ‘पुंडलिक’ नावाच्या नाटकात खंडुजी काम करत होते. त्यामुळे बाळाचे नाव ‘पुंडलिक’ असे ठेवण्यात आले. वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत ते बोलत नव्हते. असे सांगण्यात येते की एकदा पिंपळोदचे परशुरामबाबा गोरेगाव येथे आले असता, त्यांनी पुंडलिक महाराजांशी मूक संवाद साधला. तेव्हापासून ते बोलू लागले. बालवयात त्यांनी कुरणखेड येथील एका माळ्याच्या मुलाला जिवंत केले, पाणी टाकून दिवा पेटवत ठेवला, अशा त्यांच्या चमत्कारकथा सांगण्यात येतात.
‘पंढरपूरचा विठोबा, तो मीच’ असे सांगणाऱ्या धामणगावच्या मुंगसाजी महाराजांची कीर्ती ऐकून, खंडुजी यांनी लहानग्या पुंडलिकाला तेथे नेले. महाराजांनी या बालकास आपल्याजवळ बसवून घेतले. त्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा ‘हा बालकच आपला वारसा चालवेल,’ असे सांगत महाराजांनी सर्वांना गप्प केले. त्यावेळी मुंगसाजी महाराजांनी आपले परमभक्त, बडोद्याचे जयवंतराव घाडगे यांच्याकरवी पुंडलिक महाराजांना अभिषेक घालून नवी कफनी परिधान करण्यास दिली. १९४७ मध्ये पौष पोर्णिमेच्या दिवशी त्यांचे गोरेगाव येथे पुनरागमन झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी मोठा आगमन सोहळा आयोजित केला होता.
दुसऱ्या वर्षीपासून (१९४८) चैत्र शुद्ध पंचमीला गोरेगाव येथे पुंडलिक महाराजांच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली. १९५६ मध्ये कमलाबाई चंदनकर नावाच्या कलावंतीण महिलेने त्यांचे मंदिर बांधण्यासाठी चार हजार रुपये दिले. या मंदिरात पुंडलिक महाराजांचे काही काळ वास्तव्य होते. आपल्या हयातील पुंडलिक महाराजांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भ्रमण केले. ते जेथे जात तेथे त्यांच्या यात्रा भरत. आजही विदर्भातील राजना, नेरपरसोपंत, नागपूर, बहिरम आदी ठिकाणी त्यांच्या यात्रा भरतात. १६ मार्च १९७२ रोजी त्यांचे मूर्तिजापूर येथे आगमन झाले. येथेही त्यांनी अनेक लीला केल्या. ९ ऑक्टोबर १९८५ रोजी नारायण दशमीच्या दिवशी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अनुयायांनी येथे त्यांच्या पादुका व गादीचे जतन केले. २ एप्रिल २००६ रोजी चैत्र शुद्ध पंचमीच्या मुहुर्तावर येथे पुंडलिक महाराजांच्या समाधीजवळ त्यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मूर्तिजापूर-दर्यापूर मार्गावर सिरसो गावाच्या वेशीवर पुंडलिक महाराजांचे समाधी मंदिर आहे. आजुबाजूला शेती व मध्यभागी असलेल्या या समाधी मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत येणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला शोभेची झाडे लावलेली असल्याने हा मार्ग व परिसर सुंदर भासतो.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून सुमारे १० पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. या मुखमंडपाच्या पायऱी मार्गावर दोन्हीकडे कठडे आहेत. मुखमंडपापासून सभामंडप व गर्भगृहापर्यंत भाविकांच्या सोयीसाठी दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथील बंदिस्त व प्रशस्त सभामंडपातील सर्व स्तंभ हे भिंतींत आहेत.
सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. या गर्भगृहात प्रवेशासाठी तीन दरवाजे आहेत. गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील लाकडी द्वारशाखांवर कोरीव नक्षीकाम व ललाटबिंबाच्या वरील बाजूस मुंगसाजी महाराजांची प्रतिमा आहे. गर्भगृहात मध्यभागी षटकोनी आकारात पुंडलिक महाराजांचे समाधी स्थान आणि त्यावर त्यांच्या पादुका आहेत. या संगमरवरी समाधीच्या मागील बाजूस असलेल्या वज्रपिठावर पुंडलिक महाराजांची मोठी संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला दोन लहान शिखरे व गर्भगृहावर उंच नक्षीदार शिखर आहे. या शिखराच्या शिरोभागी दोन आमलक व कळस आहेत.
समाधी मंदिरापासून काही अंतरावर पुंडलिक महाराजांची गादी म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर आहे. समाधी मंदिरापासून येथे येण्यासाठी पक्का रस्ता आहे. या मंदिरातील एका खोलीत महाराजांची गादी आहे. या गादीच्या खालील भागात चांदीच्या पत्र्यावर सुंदर कलाकुसर असून त्यावर ॐ व कलश आदी मंगलप्रतिके कोरलेली आहेत. गादीवर पुंडलिक महाराजांच्या पादुका आहेत. गादीच्या मागील बाजूस त्यांची प्रतिमा आहे. येथे मुंगसाजी महाराजांची प्रतिमाही आहे. उत्सवादरम्यान पुंडलिक महाराजांच्या या पादुका व प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात येते. खोलीबाहेरील मोठ्या मखरात गणेश, विठ्ठल-रखुमाई, राधा-कृष्ण तसेच हनुमान यांच्या मूर्ती आहेत.
चैत्र शुद्ध पंचमीला येथे पुंडलिक महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त रथातून त्यांच्या प्रतिमेची व पादुकांची मिरवणूक काढण्यात येते. रात्री जन्मोत्सव सोहळा पार पडतो. दुसऱ्या दिवशी दहीहंडी व काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. नारायण दशमीच्या दिवशी पुंडलिक महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात मूर्तीवर अभिषेक, पुंडलिक महाराज जीवनदर्शन पारायण, कीर्तन, महाप्रसाद आदींचा समावेश असतो. परिसरातील विविध भागांतील पालखी दिंड्याही त्यावेळी येथे येतात. येथे नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.