देशभरातील ‘बंजारा समाजाची काशी’ ही पोहरा या क्षेत्राची ओळख आहे. येथे पोहरादेवी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माता जगदंबेच्या मंदिराबरोबरच गोर-बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी संत रामराव महाराज यांची समाधीस्थळे आहेत. त्यामुळे या क्षेत्रास बंजारा समुदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून अनेक भाविक या स्थळी दर्शनासाठी येतात. त्यांत अन्य जाती-धर्मांच्या भाविकांचाही समावेश असतो. येथे ‘भक्तिधाम’ आणि ‘नंगारा भवन’ ही महत्त्वपूर्ण स्थळेही आहेत.
‘पूजा पाठेम वेळ घाले पेक्षा करणी करेर शिको’ म्हणजे पूजापाठात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करा, असा उपदेश करून समाजास सन्मार्ग दाखवणारे संत सेवालाल हे बंजारा समाजाचे आध्यात्मिक गुरू होते. त्यांच्या इतिहासाबाबत सांगायचे तर, आंध्र प्रदेशातील सेवागड (गोलार दोडी तांडा, ता. गुंटी, जि. अनंतपूर) येथे १५ फेब्रुवारी १७३९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव भीमा नाईक व आईचे नाव धरमई होते. भीमा नाईक यांचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची पोती वाहून नेण्याचा होता. अनेक संस्थानिकांना त्यांच्याकडून ‘रसद’ पुरवठा होत असे. विवाहानंतर तब्बल १२ वर्षे त्यांना मूलबाळ नव्हते. एका आख्यायिकेनुसार, जगदंबा मातेच्या कृपेमुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि तेच सेवालाल महाराज होत. बालपणापासून ते विरक्त स्वभावाचे होते.
जगदंबा मातेचे परमभक्त असलेल्या सेवालाल यांनी आजन्म अविवाहित राहून समाजसेवा करण्याचे व्रत स्वीकारले होते. आंध्र प्रदेशातून जीवनाचा प्रारंभिक काळ व्यतीत केल्यानंतर ते महाराष्ट्रात आले. त्यांच्याविषयी आख्यायिका अशी की ते तरुण असताना पोहरादेवी गावानजीकच असणाऱ्या रूईगड या गावात त्यांना जगदंबा मातेचे साक्षात दर्शन झाले होते. बंजारा समाज, त्यांची भाषा आणि अस्मिता यासाठी सेवालाल महाराज यांनी तत्कालिक राज्यसत्तेशी, विशेषतः ब्रिटिश शासकांशी लढा दिला. बंजारा समाजास त्यांनी ‘शिकच शिकावच शिके राज घडावच’ (शिका, शिकवा. जो समाज शिक्षित असतो तोच राजवैभव प्राप्त करतो.) असा शिक्षणाचा महामंत्र दिला होता. महिलांचा सन्मान ठेवा, अनैतिक संबंध ठेवू नका, दारूचे सेवन करू नका, आत्मसन्मानाने जगा, पर्यावरणाचे रक्षण करा, कुणाशीही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका, अशी त्यांची शिकवण होती.
बंजारा बोलीभाषेतील (गोरमाटी) त्यांची अनेक उपदेशपर वचने आजही उद्धृत केली जातात. त्यातील काही पुढीलप्रमाणे : ‘जाणजो-छाणजो-पचच मांणजो’ (कोणत्याही गोष्टीचे प्रथम अध्ययन करा, परीक्षण करा आणि मगच ती मान्य करा). ‘कोई केती नानक्या छेई.
केनी भजो मत. केनी पूजो मत. धू जो मत.’ (लहान-मोठे कोणी नाही. सर्व समान आहेत. कोणाचेही नाव जपू नका. कोणाचीही पूजा करू नका. कोणालाही भिऊ नका). ‘कसाईन गावडी मत वेचो’ (खाटकाला गाय विकू नका). ‘गोर गरीबेन जो दांडन खायं, वोरी सात पिढी नरकेम जायं’ (गोरगरिबांना जो लुटून खाईल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील). ‘चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो’ (चोरी करून, खोटे बोलून पैसा कमावू नका, तसा पैसा घरात आणू नका). ‘जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो’ (जिचा पती जिवंत आहे, अशा स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका). ‘ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीव’ (या गोष्टींचा जो कोणी आदर करेल, मी त्याचे रक्षण करेन, क्षणोक्षणी मी त्याला तारेन).
संत सेवालाल हे द्रष्टे संत होते. त्यांनी, ‘एक रुपयाला एक वाटी पाणी विकले जाईल’ (रपीया कटोरो पाणी वक जाय), ‘एक दिवस बैलांशिवाय गाडी धावेल’ (बना बळदेर गाडी धासीय), ‘जग एवढे जवळ येईल की एका राज्यातील वार्ता दुसऱ्या राज्याला लगेच कळेल’ (मलकेर खबर पलकेम कळीय), अशी काही भाकिते केली होती.
‘योग्य रस्त्यावरून चालणाऱ्या सोबत तीन माणसे असतील, पण खोटे बोलणाऱ्या लबाडांच्या सोबत लोकांची गर्दी असेल’ (खरेर सोबत तीन मनक्या रिये, लबाडरे साथ खंडीभर), अशी त्यांची विधाने कालातीत ठरली आहेत. सेवालाल महाराज यांचे निधन रुईगड (जि. यवतमाळ) येथे झाले आणि पोहरागड येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांची समाधी जगदंबा मंदिरानजीक आहे. संत रामराव महाराज हे सेवालाल महाराजांचे उत्तराधिकारी होते. ७ मार्च १९३५ रोजी पोहरादेवी येथे जन्मलेले रामराव महाराज हे बालब्रह्मचारी होते. ते केवळ फलाहार आणि दूध प्राशन करत. २५ जून १९४८ रोजी त्यांनी महंतपद प्राप्त केले. यानंतर पोहरादेवीचे मठाधिपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी.लिट.) या पदवीने गौरविले होते. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी, वयाच्या ८९ व्या वर्षी प्रदीर्घ आजारपणानंतर त्यांचे मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांची समाधीही येथेच आहे.
पोहरादेवी येथील दाक्षिणात्य गोपुर पद्धतीच्या महाद्वारातून जगदंबा मातेच्या मंदिर परिसरात प्रवेश होतो. सभामंडप, छोटेसे अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.
सभामंडपावरील छतास बाशिंगी कठडा असून त्याच्या चारही कोपऱ्यांत जगदंबा मातेचे वाहन असलेल्या सिंहाच्या मूर्ती आहेत. सभामंडप समोरून खुल्या स्वरूपाचा आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारास सुवर्णरंगी महिरपी कमान आहे. समोरच गर्भगृह आहे. आत संगमरवरी वज्रपीठावर अष्टभुजा व्याघ्रारूढ जगदंबेची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. वस्त्रालंकारांनी, कवड्यांच्या आणि फुलांच्या माळांनी शृंगारलेल्या या देवीच्या मस्तकी मुकूट आहे. देवीने हातात शंख, चक्र, खड्ग आदी आयुधे धारण केलेली आहेत. गर्भगृहावर उंचच उंच शिखर आहे. हे शिखर नागर शैलीतील उरुशृंग पद्धतीचे आहे. त्यावर चक्राकार आमलक आणि कळस आहे. या शिखराच्या चारही बाजूंना छोट्या मेघडंबऱ्यांसारखी रचना आहे.
जगदंबा मंदिरापासून संत सेवालाल समाधीस्थळाकडे जाण्यासाठी मार्गिका तयार करण्यात आली आहे. या मार्गिकेत मध्यभागी एक जुनी विहीर आहे. येथे संत सेवालाल महाराजांच्या समाधीमंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. याला लागूनच दगडी तटबंदीच्या भिंती बाहेरून दिसतात.
प्रवेशद्वार दगडांत बांधलेले आहे. दोन्ही बाजूला देवळ्यांमध्ये जय-विजय या द्वारपालांच्या सुबक मूर्ती आहेत. त्यावर कमानाकृती कोरीव काम आहे. वरच्या बाजूला तीन कमानी असलेले उंच मनोरे आहेत. येथून आत जाताना लागणाऱ्या प्रवेशद्वाराच्या चौकटीला सोनेरी पट्ट्या आहेत. त्यावरही सोनेरी नक्षीकाम आहे. वर गणेशाची सुबक प्रतिमा आहे. या प्रवेशद्वाराला ‘लाखिया दरवाजा’ असे म्हणतात. असे सांगण्यात येते की हे प्रवेशद्वार २५० वर्षे जुने आहे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर अर्धवर्तुळाकार कमानी असलेला काहीसा छोट्या खोलीसारखा भाग दिसतो. येथे बसण्याची सोय आहे. पुढे गेल्यावर बंदिस्त स्वरूपाचा मोठा सभामंडप आहे. या सभामंडपात एका चौथऱ्यावर संत सेवालाल महाराजांच्या तोळाराम नामक अश्वाची आणि गराशी बैलाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. समाधीस्थळाच्या गाभाऱ्यात मध्यभागी संगमरवरी देव्हाऱ्यासारखे दिसणारे अधिष्ठान आहे. त्यावर संत सेवालाल महाराजांची पगडी ठेवण्यात आली आहे. येथे पादुकांऐवजी पगडीची पूजा केली जाते. पांढऱ्या शुभ्र अशा या फेट्यास मोत्याची कंठी घालण्यात आली आहे. येथेच उजवीकडे संत सेवालाल यांची अश्वारूढ तसबीर आहे. खाली त्यांनी वापरलेली गादी आहे. या मंदिराच्या शिखरावर विविध देव-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या शिखरावरील कळस सोन्याचा आहे.
संत सेवालाल यांच्या समाधी मंदिराजवळ जगदंबा देवीचे मूळ स्थान असल्याचे सांगण्यात येते. येथे जगदंबेचे दगडांत बांधलेले छोटेसे मंदिर आहे. सेवालाल समाधीस्थळाच्या नजीक त्यांचे पुतणे संत सुकालाल यांची दगडांत बांधलेली समाधी आहे. ही समाधी आत असल्याने काहीशी अंधारी आहे. काही अंतरावर एके ठिकाणी धुनी आहे. त्याच्याजवळच ‘लघी’ आहे. लघी म्हणजे ध्वजस्थान. तेथे काही झेंडे एकत्र ठेवले आहेत. या मंदिराच्या आवारात काही इतर समाधीस्थळेही आहेत. येथे पांढऱ्या रंगाचा उंच झेंडा उभारलेला आहे. पांढरा ध्वज हा संत सेवालाल यांचा ध्वज मानला जातो. येथील संत रामराव यांचे समाधीस्थळ आकर्षक आहे. समाधीस्थळास चांदीचे कोरीवकाम केलेले द्वार आहे. त्यात त्यांच्या घरातील देव्हाऱ्यातील सर्व देवदेवता ठेवण्यात आल्या आहेत. त्यात ५१ किलो चांदीची देवीची सुबक मूर्ती आहे. तसेच चांदीची गदा, देवीचा एक मुखवटा आणि अनेक मुकूटही आहेत.
पोहरादेवी येथील या मंदिरांजवळ नुकतीच ‘नंगारा संग्रहालयाची’ भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. बंजारा समाजाचे वाद्य असलेल्या नगाऱ्यासारखी या इमारतीची रचना आहे. त्यात बंजारा समाजाचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक इतिहास; विविध शिल्पे आणि वस्तूंच्या माध्यमातून जतन करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी जगदंबा देवी आणि सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असल्याने, अलीकडच्या काळात त्यास राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ११ ऑक्टोबर २०१९ रोजी निवडणुकीच्या धामधुमीत पोहरादेवीचे दर्शन घेतले होते. राज्यातील अनेक बडे नेतेही येथे वेळोवेळी दर्शनासाठी येत असतात.
या मंदिरात दसरा, दिवाळी आदी विविध धार्मिक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. रामनवमीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेस महाराष्ट्रासह, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक येतात.