
थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. उष्म्याने हैराण होणाऱ्या तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी माथेरान म्हणजे स्वर्गच होते. सन १८५० साली ठाण्याचे जिल्हाधिकारी ह्यू पॉइंट्झ मॅलेट यांना माथेरानचा सुगावा लागला. मुंबईचे तेव्हाचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी सन १८५५ ते १८५८ दरम्यान माथेरानचा विकास केला. नेरळ ते माथेरान रेल्वे मार्ग १९०७ साली निर्माण केला गेला. अर्थात ब्रिटिशांच्या आधी निसर्गाशी समरस होऊन राहिलेली लोकसंस्कृती येथे नांदत होती, हे येथे असलेल्या प्राचीन मंदिरांच्या अस्तित्वामुळे सिद्ध होते. यापैकीच एक महत्वाचे व माथेरानचे ग्रामदैवत पिसरनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. येथील स्वयंभू महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की येथून जवळच असलेल्या गवळी समाजाच्या वस्तीवरील एका गवळ्याची दुभती गाय दूध देत नसे. त्यामुळे त्याने कारणाचा शोध घेण्यासाठी गायीवर बारीक लक्ष ठेवले. तेव्हा ती गाय
आरोग्यदायी पिसाच्या झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्याने पाहिले. पिसा हे जांभळीसारखे झाड आहे व आयुर्वेदानुसार त्याची पाने वीर्यवर्धक असतात. या झाडाखालील पालापाचोळा साफ करून पाहिले असता त्या गवळ्यास येथे शिवपिंडी दिसली. गवळ्याने ही गोष्ट
गावकऱ्यांना सांगितली. पुढे काही काळाने सर्व गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी लहानसे मंदिर बांधले. पुढे या देवाची प्रचिती येऊ लागल्यानंतर अनेक भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले. पिसाच्या झाडाखाली प्रकट झाला म्हणून या देवास ‘पिसरनाथ’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
इ.स. १८८३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कुलाबा गॅझेटियरनुसार, पूर्वी येथे केवळ तीन हिंदू मंदिरे होती. त्यातील एक मारूतीचे होते. ते १८७४ मध्ये लोकवर्गणीतून बांधण्यात आले होते. दुसरे शिवमंदिर होते. ते १८७० मध्ये उभारण्यात आले होते व तिसरे मंदिर पिसारनाथाचे होते. ही मूळची धनगरांची देवता. त्यावरूनच माथेरानमधील जंगलास पिसारनाथाचे जंगल
असे नाव पडले आहे. हा देव नवसाला पावतो व नवस फेडण्यासाठी त्याला लोक घंटा अर्पण करतात. मंदिरात अशी एकही जागा राहिलेली नाही की जेथे घंटा बांधलेल्या नाहीत, असे या गॅझेटियरमध्ये म्हटलेले आहे. ‘हिल ऑफ ब्युटी, माथेरान सेंटेनरी : १८५०–१९५० : ए गाइड बुक अँड हिस्ट्री’ या दिनू एस. बस्तावाला यांच्या पुस्तकात मंदिराची अशी आख्यायिका नमूद केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सरदार नेताजी पालकर हे या मंदिरात दर्शनासाठी येत असत. शिवाजी महाराजांच्या काळात पशुनाथ किंवा पिशारनाथ वा पिसारनाथ नावाचा साधू येथे होऊन गेला. त्याच्यावरून या मंदिरास पिसरनाथ असे नाव पडले असावे, असे रायगड गॅझेटियरच्या मराठी आवृत्तीत म्हटले आहे. माथेरानच्या या ग्रामदैवतेवर मुंबईचे नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांची गाढ श्रद्धा होती.
माथेरान बाजाराकडून शॉरलेट तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. दोन्ही बाजूला चौकोनी स्तंभ व त्यावरील आडव्या तुळयांवर मध्यभागी मंदिर प्रतिकृती, असे स्वागत कमानीचे स्वरूप आहे. येथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. मंदिराच्या मार्गावर खाण्यापिण्याची अनेक दुकाने आहेत. हे स्थान उंचावर असल्याने काही पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. हे देवस्थान सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, इ.स. १९२९ पर्यंत पिसारनाथ मंदिराच्या ठिकाणी साधा चबुतरा होती. त्या वर्षी येथे भाविकांनी मंदिर बांधले. मागील काही वर्षांत झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
मंदिरास भक्कम आवारभिंत आहे व त्यात दुसरी स्वागतकमान आहे. ही स्वागतकमान १ नोव्हेंबर १९४३ साली बांधली असल्याचा संगमरवरी शिलालेख कमानीच्या स्तंभांवर आहे. मंदिरांच्या फरसबंदी केलेल्या प्रांगणात सभोवताली भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. प्रांगणात
जागोजागी मोठे वृक्ष असल्याने दिवसभर येथे सावली असते.
अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. उंच जगतीवर असलेल्या या मंदिरात येण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. चार गोलाकार स्तंभ व वर सपाट छत अशी येथील अर्धमंडपाची रचना आहे. छताला भलीमोठी पितळी घंटा टांगलेली आहे. ती वाजवली असता दूरवर तिचा आवाज जातोच, शिवाय बराच वेळ तिचा नाद मंदिरात जाणवतो. पुढे सभामंडपाचे प्रशस्त प्रवेशद्वार आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात अर्धभिंती व त्यावर पारदर्शक काचा असलेल्या लाकडी खिडक्या आहेत. सभामंडपात आठ चौकोनी स्तंभ आहेत. सभामंडप व अंतराळाचे छत वर व खाली असे दोन भागांत विभागलेले आहे. सभामंडपात जमिनीवर कूर्मशिल्प आहे व अंतराळासमोर चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. पुढे गर्भगृहाचे लाकडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या व खिडक्यांच्या झडपांना पारदर्शक काचा असल्याने बंद खिडक्या व दारातूनही गर्भगृहातील पिसरनाथ महादेवाचे दर्शन होते. गर्भगृहात जमिनीवर दोन स्वयंभू पाषाण व इंग्रजी ‘एल्’ आकाराची शिवपिंड आहे. शिवपिंडीभोवती वेढा घातलेला पितळी नाग आहे व त्याने पिंडीवर फण्याने छत्र धरले आहे.
गर्भगृहात येऊन दर्शन घेण्यासाठी येथे सोवळे नेसणे बंधनकारक आहे. गर्भगृहात जाण्याआधी भाविकांनी आपल्या जवळील चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवाव्या लागतात. गर्भगृहाच्या बाह्य बाजूस प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर चारपाखी उतरते छप्पर व त्यावर कळस आहे. मंदिरांच्या बांधणीवर ब्रिटिश स्थापत्यशैलीचा प्रभाव जाणवतो. मंदिरांच्या चारी बाजूंना असणारी घनदाट वृक्षराजी व शेजारी असलेल्या भल्यामोठ्या शॉर्लेट तलावामुळे अध्यात्मिक शांती व निसर्गसौंदर्य यांचा सुंदर मिलाफ येथे पाहावयास मिळतो.
महाशिवरात्र हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. महाशिवरात्र, श्रावण महिन्यात येथे लघुरुद्र, महाभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते. माथेरानमध्ये येणारे अनेक पर्यटक या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. दर सोमवारी तसेच पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष आदी दिवशी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.