पिनाकेश्वर मंदिर, जातेगाव,

ता. नांदगाव, जि. नाशिक

नाशिक, छत्रपती संभाजी नगर व जळगाव या जिल्ह्यांच्या सीमेवर, सातमाळा पर्वतरांगेतील जातेगाव डोंगरावर पिनाकेश्वर (मोठा) महादेवाचे प्राचीन स्थान आहे. असे सांगितले जाते की ‘पिनाक’ हे शंकरांनी श्रीरामांना दिलेले विशेष अस्त्र होते. विविध ग्रंथांमध्ये पिनाक या अस्त्राचा उल्लेख आढळतो. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पिनाकेश्वर नावाचे हे एकमेव जागृत स्थान आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की श्रीराम वनवास काळात या स्थानावर आले असता त्यांनी येथे शिवलिंग स्थापून पूजा केली होती. तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन श्रीरामांना पिनाक हे विशेष अस्त्र दिले होते. तेव्हापासून हे स्थान पिनाकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. काशीखंडात आलेल्या उल्लेखानुसार, एकदा शिवपार्वती सारीपाट खेळत असताना पार्वतीने डाव जिंकला म्हणून शंकर रागावले आणि या डोंगरावर येऊन ध्यानस्थ झाले. शिवविरहामुळे व्याकुळ झालेल्या पार्वतीने त्यांचा शोध घेण्यासाठी भिल्लीणीचा वेश धारण करून शंकरांस वश केले व या पवित्र स्थानी शिवशक्ती मिलन झाले. शिवशक्तीचे पुनर्मिलन झाले तो दिवस होता चैत्र कृष्ण नवमीचा. तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी शिवशक्ती विवाह सोहळा उत्साहात पार पाडला जातो. त्यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील लासूर येथील दाक्षायणी मातेस ‘मूळ’ म्हणून जातेगावात आणले जाते.

१९६१-६२ च्या सुमारास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) पिनाकेश्वर मंदिरात आले होते. तेव्हा हे मंदिर भग्नावस्थेत होते. १९६३ मध्ये जनार्दन स्वामींनी पुढाकार घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. स्वामींचे अनुयायी व गावकऱ्यांनी श्रमदानातून हे काम पूर्ण केले. १९६७ मध्ये जनार्दन स्वामींनी मंदिरात नवीन शिवपिंडीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून या देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्ण केला. १९६८ मध्ये ब्रह्मचारी गंगागिरी महाराजांनी येथील सभामंडपाचे काम पूर्ण केले.

पायथ्याशी असलेल्या जातेगावातून पिनाकेश्वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी जुना पायरी मार्ग आहे, याशिवाय थेट मंदिरापर्यंत रस्ताही तयार करण्यात आला आहे. हेमाडपंती शैलीतील या मंदिराच्या सभोवती तटबंदी आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराच्या प्रांगणात दीपमाळ आहे. चैत्र कृष्ण नवमीला त्यावरील दिवे प्रज्वलित केले जातात. याशिवाय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आणि ब्रह्मचारी गंगागिरी महाराज यांची मंदिरे येथे आहेत.

पिनाकेश्वर महादेव मंदिराची रचना ही नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी आहे. सभामंडपातील खांबांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ उजवीकडे हातात कमलपुष्प घेतलेली लक्ष्मीमातेची मूर्ती; तर डाव्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणातील शिवलिंग असून त्यासमोर पार्वतीची मूर्ती आहे. गर्भगृहातील विशेष बाब म्हणजे येथील मुख्य शिवपिंडीच्या खाली भुयार असून त्यामध्ये आणखी २ प्राचीन शिवपिंडी आहेत. या भुयारात जाण्यासाठी मार्ग नसला तरी गर्भगृहातील मुख्य शिवपिंडीच्या बाजूलाच साधारणतः १ फूट बाय १ फूट आकाराचा १ खड्डा दिसतो. त्यातून पाहिल्यास आतील शिवपिंडींचे दर्शन होते. काचेचे आवरण घालून हा भुयार बंद करण्यात आला आहे, पुजाऱ्यांकडे विनंती केल्यास खाली असलेल्या शिवपिंडींचे दर्शन घेता येते. मंदिराच्या शिखरावर पूर्वेकडे शिवपार्वती, पश्चिमेकडे श्रीदत्तात्रय, उत्तरेला गरूड आणि दक्षिणेकडे हनुमान अशा मूर्ती दिसतात. याशिवाय शिखरावर कीर्तिमुख, यक्ष, नाग व किन्नर यांचीही शिल्पे कोरलेली आहेत.

हे देवस्थान नाशिक सीमाभागासह खान्देश, मराठवाड्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. तिसऱ्या सोमवारी अनेक शिवभक्त विविध नद्या व जलाशयांतील पवित्र तीर्थ कावडीने घेऊन येतात व पिनाकेश्वराचा जलाभिषेक करतात. नवसपूर्तीसाठी येथे भाविकांकडून दाळ-बट्टी किंवा रोडग्याचा नैवेद्य अर्पण केला जातो.

चैत्र कृष्ण पंचमीपासून नवमीपर्यंत येथे यात्रा भरते. त्यावेळी मंदिरात आकर्षक सजावट करून शिवपिंडीवर मुखवटा बसविला जातो. विविध ठिकाणांहून भाविकांनी आणलेल्या उंच काठ्यांची व कावडींची वाजत-गाजत मंदिर परिसरात मिरवणूक काढली जाते. नवमीच्या दिवशी पिनाकेश्वरांचा सजविलेला मुखवटा पालखीत ठेऊन खाली गावात असलेल्या महादेवाच्या मंदिराकडे मिरवणुकीने नेला जातो. भाविकांकडून पालखीवर यावेळी रेवड्यांची (साखर, गूळ व तिळापासून बनलेल्या लहान गोळ्या) उधळण केली जाते. सूर्यास्तानंतर या मंदिरासमोर असलेल्या दीपमाळेवरील दिवे प्रज्वलित केले जातात. तो मान परंपरेप्रमाणे भिल्ल समाजातील शिवभक्तांना आहे. (कारण पार्वती भिल्लीणीचे रूप घेऊन येथे आली होती.) पालखीच्या दर्शनासाठी रात्रभर भाविकांची रीघ असते. सकाळी गावातील महादेव मंदिराजवळ पालखी पूजन करून या यात्रेची सांगता होते. सुमारे ३०० वर्षांपासून यात्रेची ही परंपरा आहे.

 

उपयुक्त माहिती:

  • नांदगावपासून ९० किमी, तर नाशिकपासून १०५ किमी अंतरावर
  • डोंगराच्या पायथ्यापर्यंत नांदगावपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट पिनाकेश्वर मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home