तिर्थक्षेत्र पानेट
काशीविश्वेश्वर मंदिर

पिलकवडी, ता. अकोला, जि. अकोला

श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र पानेट येथे काशीविश्वेश्वराचे प्राचीन स्वयंभू शिवलिंग आहे. पूर्णा नदीच्या काठावर वसलेले हे क्षेत्र पराशर ऋषींसह अनेक ऋषी-मुनींची तपोभूमी होते. या क्षेत्री शेगावचे गजानन महाराज तसेच अकोटचे नरसिंग महाराजही अनेकदा येत असत. त्यांचे समकालीन असलेले संत ब्रह्मचारी महाराज यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी दिलेल्या निर्देशानंतर भूगर्भात असलेले काशीविश्वेश्वराचे शिवलिंग शोधण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र, नदीच्या गाळामुळे पावसाळ्यात हे शिवलिंग जमिनीत गाडले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीच्या उत्सवाआधी येथे खोदकाम केल्यानंतर या पिंडीचे दर्शन होते. या उत्सवासासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून येणारे हजारो भाविक ‘हर हर महादेव’च्या जयघोषात या शिवलिंगावर अभिषेक करतात. ब्रह्मचारी महाराजांची समाधीही या परिसरात आहे.
अकोला-अकोट मार्गावर चोहोट्टा बाजारापासून जवळच पूर्णा नदीच्या काठावर पिलकवडी हे गाव आहे. निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेल्या या गावाच्या परिसराला पानेट क्षेत्र अशी ओळख आहे. येथून वाहणाऱ्या पूर्णा नदीचे प्राचीन नाव ‘पयोष्ठी’ असे आहे. ‘गरुडपुराणा’त या परिसराचे तसेच या नदीचे वर्णन आहे. लंकाविजयानंतर अयोध्येला जाताना श्रीरामांनी या नदीत स्नान करून काशीविश्वेश्वराची पूजा केली होती. येथून जवळच असलेल्या पळसूद येथे पराशर ऋषींचा आश्रम होता. ते पयोष्ठी नदीच्या पात्रात स्नान केल्यानंतर काशीविश्वेश्वर महादेवाचे दर्शन घेत असत.
दीडशे वर्षांपूर्वी भूगर्भातील काशीविश्वेश्वराच्या शिवलिंगाबाबत ग्रामस्थांना निर्दश देणाऱ्या ब्रह्मचारी महाराजांचे कूळ-मूळ याबाबत कोणालाही माहिती नाही. नैमिष्यारण्यात काही काळ व्यतित केल्यानंतर नेरपिंगळाई, माहूर, उमकदेव, किनखेड आदी विविध भागांतून भ्रमण करत ते पयोष्ठी नदीकाठावरील पिलकवडी परिसरात आले. तेव्हा त्यांचे वय सुमारे ६० वर्षे होते. उंच, गोरेपान असे व्यक्तिमत्त्व असलेल्या ब्रह्मचारी महाराजांच्या मुखावर प्रखर तेज होते. येथे त्यांचा सीताराम गंभीरजी पाटील नावाच्या व्यक्तीशी परिचय झाला. पाटील यांनी त्यांची अनेक वर्षे एकनिष्ठपणे सेवा केली. त्यांनी ब्रह्मचारी महाराजांना एक झोपडीही बांधून दिली. येथे ते साधना करत. कालांतराने पाटील यांचे बंधू नामदेव यांनी बांधून दिलेल्या मठात ते वास्तव्य करू लागले. या मठात त्यांनी हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. परतवाडा येथील योगानंद स्वामी यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध होते. पूर्वायुष्याबद्दल ते कोणालाही सांगत नसत. येथील वास्तव्यादरम्यान ब्रह्मचारी महाराजांनी अनेकांना मार्गदर्शन केले. अनेकांना योगशिक्षा तसेच अनुग्रहही दिला. येथील वास्तव्यादरम्यान पयोष्ठी नदीकाठी अनेकदा येणाऱ्या गजानन महाराजांशी तसेच अकोट येथील श्री नरसिंग महाराजांशी ते चर्चाही करत.
ब्रह्मचारी महाराज वर्षातून एकदा काशीला जाऊन काशीविश्वेश्वराचे दर्शन घेत. एके दिवशी त्यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असलेल्या रामकृष्ण शास्त्रींना बोलावून घेतले. ‘मला काशीविश्वेश्वराच्या दर्शनासाठी काशीला जायचे आहे. मी तेथे आत्मरूपाने जाईन. माझे शरीर येथेच असेल. तुम्ही तीन दिवस या देहाची काळजी घ्या तसेच ‘ॐ नमो शिवाय’चा जप करत रहा,’ असे ते म्हणाले. त्यांच्या निर्देशानुसार रामकृष्ण शास्त्री व गावातील काही मंडळी ब्रह्मचारी महाराजांच्या शरीराजवळ बसून राहिले व शिवनामाचा अखंड जप केला. तीन दिवसांनी स्वप्नातून जागे झाल्यासारखे ते उठले आणि रामकृष्ण शास्त्रींना म्हणाले, ‘माझ्या उजव्या बाजूस पयोष्ठी नदीच्या तीराजवळ बोरीवृक्ष आहे. तेथे खोदकाम केल्यास काशीविश्वेश्वराचे शिवलिंग आढळेल.’ त्यानुसार ग्रामस्थांनी खोदकाम केले असता ४० फूटांवर पिंडीचे दर्शन झाले. तेव्हापासून येथे महाशिवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली.
ब्रह्मचारी महाराजांचे २५ फेब्रुवारी १९०५ (शके १८२६, माघ वद्य षष्ठी) या दिवशी निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी मठात विराजमान असलेल्या मारुतीकडे कौल मागितला. त्यावेळी हनुमानाच्या मूर्तीवरील हार खाली पडल्यानंतर ब्रह्मचारी महाराजांनी देह सोडल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या पार्थिवाला पयोष्ठी नदीपात्राजवळ समाधी देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ व शेकडो भाविकांनी समाधीवर सात दिवस रूद्राभिषेक केला. भागवत, हरिपाठ, कीर्तनही आयोजित करण्यात आले. महाशिवरात्रीच्या दिवशी या समाधी सोहळ्याची सांगता झाली.
येथील झऱ्यांमुळे तसेच नदीकाठावर बांधण्यात आलेल्या धरणामुळे पावसाळ्यात येथील स्वयंभू शिवलिंग पाण्याखाली जाते. पुरामुळे नदीत गाळ साचून ते भूगर्भात गाडले जाते. हे शिवलिंग तसेच ब्रह्मचारी महाराजांची समाधी वाचवण्याचे ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, ते व्यर्थ गेले. त्यामुळे नजीकच्या हनुमान मंदिरात आणखी एका शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीपासून ग्रामस्थ स्वयंभू शिवलिंगाच्या परिसरात खोदकामाला सुरुवात करतात. सुमारे २५ फूटांपर्यंत खोल खड्डा खोदल्यानंतर शिवलिंगाचे दर्शन होते. शिवलिंगापर्यंत येण्यासाठी मातीच्या पायऱ्या करण्यात येतात. ब्रह्मचारी महाराजांच्या समाधीच्या उजव्या बाजूस हे शिवलिंग आहे. हे लंबगोलाकार शिवलिंग दगडी आहे व त्याभोवती मोठी शाळुंका आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा असते. हजारो भाविक या शिवलिंगावर अभिषेक करून पूजा करतात. मंदिर संस्थानातर्फे ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथीनिमित्त शिवनाम सप्ताहही साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मंदिर संस्थानातर्फे प्रसाद म्हणून एक पोळी व वांग्याची भाजी देण्यात येते. या उत्सवाच्या सांगतादिनी पालखीतून नगरप्रदक्षिणा घालण्यात येते. काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होते.
मंदिर संस्थानाने ब्रह्मचारी महाराजांच्या झोपडीच्या जागी सिमेंटचे बांधकाम केले आहे. ३१ जुलै २०२५ रोजी येथे ब्रह्मचारी महाराजांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संस्थानातर्फे या परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. नेत्रशस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान-आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात येते. परिसरातील आदिवासी बांधवांना वेळोवेळी वस्त्र तसेच अन्नदानही करण्यात येते. येथील गोशाळेत सुमारे ८० गोमातांचे संगोपन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • अकोला येथून २७ किमी अंतरावर
  • अकोला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home