पेडकाई माता मंदिर

साळवे, ता. शिंदखेडा, जि. धुळे

पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे पूजन म्हणजेच निसर्ग पूजनाची प्राचीन परंपरा आर्यपूर्व काळापासून भारतात सुरू आहे. त्यामुळेच नदीला माता आणि डोंगराला बा संबोधण्याची परंपरा आजही कायम आहे. यातूनच पुढे वनदेवतेच्या पूजनाची परंपरा निर्माण झाली. असेच एक पेडकाई देवीचे मंदिर हे साळवे गावाजवळील डोंगरात आहे. ही जागृत देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामूळेच देवीच्या वार्षिक उत्सवात लाखो भाविक सहभागी होतात.

हे देवस्थान एक हजार वर्षांहून प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराची अख्यायिका अशी की श्रीराम वनवासात असताना सातपुडा पर्वताच्या सानिध्यात आले तेव्हा वनात प्रवेश करण्याआधी श्रीराम, लक्ष्मण सीता मातेने येथील पेडकाई माता पेडकोबा देवाचे पूजन केले होते. त्यामूळेच या मंदिराचा इतिहास अगदी रामायण काळाशी जोडला गेला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारांतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलले आहे

माथ्यावर मंदिर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी प्रशस्त वाहनतळ आहे. या मंदिराकडे येण्यासाठी प्रथम डोंगरपायथ्याशी असलेले प्रवेशद्वार ओलांडून काही अंतर चढणीच्या वाटेवरून पायी यावे लागते. त्यानंतर मंदिराच्या चार मजली रांगमंडपात प्रवेश होतो. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की चार मजली बांधकाम असूनही या मंदिराला कुठेही पायरी नाही. पायऱ्यांऐवजी सौम्य चढावाच्या पायी मार्गाची व्यवस्था यात केलेली आहे. त्यामुळे अबालवृद्ध या मार्गाने अगदी सहजतेने देवीच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या गर्भगृहापर्यंत पोहचू शकतात. रांगमार्गाला बाह्य बाजूस सुरक्षा कठडे स्तंभ आहेत. सुरक्षा कठड्याजवळून बाहेर पाहिले असता परिसरातील अनेक गावांचे विहंगम दृश्य दिसते

रांगमंडपातून काही अंतर पुढे आल्यावर गणेशाचे लहान मंदिर दिसते. या मंदिरात वज्रपिठावर सिंहासनारूढ गणेशाची चतुर्भुज संगमरवरी मूर्ती आहे. गणेशाच्या वरील दोन्ही हातात पाश आहेत. खालील एका हातात मोदक दुसरा हात अभय मुद्रेत आहे. मूर्तीच्या मागे संगमरवरी मयुरपंख प्रभावळ आहे. येथून पुढे मंदिराच्या चौथ्या मजल्यावरील प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात बाह्य बाजूस चौकोनी मध्यभागी गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपातही स्टेनलेस स्टीलच्या जाळ्या लावून दर्शनरांगेची व्यवस्था केलेली आहे. सभामंडपात गर्भगृहासमोर बंदिस्त चौथऱ्यावर सिंहाची पितळी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर नक्षीदार गोलाकार स्तंभ पानाफुलांच्या नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती ललाटपट्टीवर पर्णलता आणि पुष्पलता नक्षी आहेत.

गर्भगृहातील वज्रपिठावर चार स्तंभ घुमटाकार छत असलेल्या मखरात सिंहासनारूढ देवीची स्वयंभू मूर्ती आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट वर छत्र आहे. बाजूला मोरपिसांचा गुच्छ आहे. वज्रपिठासमोर दोन चंद्रशिला त्यावर दोन त्रिशूल आहेत. मखराच्या मागील बाजूस डोंगराचा ताशीव कडा दिसत आहे. छतावर नक्षीदार चौकोनी घुमट आहे

गर्भगृहातून बाहेर आल्यावर खाली जाण्यासाठी वेगळा उतार मार्ग आहे. येथून दोन मजले खाली उतरल्यावर पेडोबा मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात वज्रपिठावरील देवकोष्टकात पेडोबा देवाची शेंदूरचर्चित द्विभुज मूर्ती आहे. देवाच्या दोन्ही हातात शस्त्र डोक्यावर मुकुट आहे. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी डाव्या बाजूला भिंतीत असलेल्या देवकोष्टकात भवानी देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाजूला डोंगर कड्यात स्थानिक देवतांचे निशाण त्रिशूल आहेत. भाविक उत्सव काळात कुळाचार प्रसंगी येथे पोळी भाजीचा नैवद्य अर्पण करतात

मंदिराच्या सभामंडपाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. पहिल्या थरात द्वादशकोनी घुमट त्यावरील घंटेच्या आकाराच्या दुसऱ्या थरावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चहूबाजूंनी असलेल्या कठड्यावर सोळा लघू शिखरे कळस आहेत. मध्यभागी असलेले मुख्य शिखर चौकोनी आहे त्यात खालील बाजूस कमळदल रिंगण आहे. शिखराच्या चारही बाजूंनी नक्षी, त्यावर आमलक त्यावरील भागात पंचकुंभी कळस आहे.

चैत्र शुद्ध नवमी या दिवशी देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश गुजरात राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास भव्य बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात दहा दिवसांचा शारदीय नवरात्रौत्सव तसेच दसरा दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. कुळाचार जावळ काढण्यासाठी येणाऱ्या भाविकांची येथे कायम वर्दळ असते

 

उपयुक्त माहिती

  • शिंदखेडा येथून १७ किमी, तर धुळेपासून ४२ किमी अंतरावर
  • शिंदखेडा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : आशाबाई गिरासे, अध्यक्ष, मो. ७०८३२६४३०४
  • भरत काळे, सचिव, मो. ९४२२२४९९५
Back To Home