पवित्रेश्वर मंदिर

पोत्रा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली

महादेव हीच एकमेव उपास्य देवता असे मानणाऱ्या शैव संप्रदायाचे तत्त्वज्ञान दुसऱ्या शतकातील बादरायण यांच्या ‘ब्रह्मसूत्र’ ग्रंथात आढळते. गुप्तकाळ हा शैवपंथाचा सुवर्णकाळ मानला जातो. विजयनगर साम्राज्याचे माधवाचार्य यांनी त्यांच्या ‘सर्वदर्शन संग्रह’ या ग्रंथात नकुलीश पाशुपतदर्शन, शैवदर्शन, प्रत्यभिज्ञादर्शन, रसेश्वरदर्शन अशा चार शैव संप्रदायांचे विस्तृत वर्णन केले आहे. याशिवाय कापालिक, कालामुख, हरिहर, मार्तंड-भैरव, अर्धनारीश्वर आणि नाथ संप्रदाय, वीरशैव संप्रदाय असे अन्य काही शैव संप्रदायही आहेत. त्यामुळे भारतात महादेवाची अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकीच एक मंदिर कळमनुरी तालुक्यातील पोत्रा गावी आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असला, तरी हेमाडपंती शैलीतील मूळ बांधकाम असलेले गर्भगृह तीनशे ते चारशे वर्षे प्राचीन असावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. मात्र, येथील स्वयंभू शिवपिंडी हजारो वर्षे जुनी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिराबाबत आख्यायिका अशी की, प्रभू श्रीराम नित्य शिव उपासना करीत असत. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर श्रीराम सीतेच्या शोधात लंकेकडे चालले असताना, वाटेत या ठिकाणी मुक्कामी थांबले होते. त्याकाळी पूर्ण अरण्याचा भाग असलेल्या या परिसरात, आपल्या पूजेसाठी रामाने या शिवपिंडीची स्थापना केली. शिवपिंडीची पूजा करून आपल्या कार्यात यश मिळावे व यापुढे जे कोणी भाविक या शिवपिंडीची पूजा करतील, त्यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत, असा वर त्यांनी महादेवाकडे मागितला. गावापासून काही अंतरावर हे मंदिर वसलेले असून मंदिरापर्यंत पक्की सडक आहे. मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगण आहे व जिथे सुरुवातीलाच स्वागतकमान उभी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले दोन चौकोनी स्तंभ व स्तंभांवर सज्जा, असे या स्वागत कमानीचे स्वरूप आहे. सज्जावर मध्यभागी असलेल्या बाशिंगातील देवकोष्ठकात महादेव, पार्वती व गणपती यांची शिल्पे विराजमान आहेत. बाशिंगाच्या दोन्ही बाजूला नंदी शिल्पे आहेत, तर सज्जावर दोन्ही टोकाला आमलक आहेत. मंदिरासमोरील खुल्या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच सभोवती वृक्षवल्ली आहे. नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. नंदीमंडप व सभामंडप आधुनिक स्थापत्यशैलीत अलीकडील काळात बांधण्यात आले आहेत. मंदिरासमोर नंदीमंडपात वज्रपीठावर नंदीच्या काळ्या पाषाणातील तीन मूर्ती, काही शिवपिंडी व पद्मपादुका शिल्पे आहेत. या तिन्ही नंदी मूर्ती वेगवेगळ्या कालखंडातील असाव्यात, असे अभ्यासकांचे मत आहे.

नंदीमंडपाचे छत दोन स्तंभ व सभामंडपाच्या भिंतीवर तोलले आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार साधेसे आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी दोन थरात वातायने आहेत. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत आणि एका कोपऱ्यात देवस्थानचे कार्यालय आहे. सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी गर्भगृहाच्या उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी दोन दरवाजे आहेत. पुढे कोरीव पाषाणी बांधकाम असलेले गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर उजव्या बाजूला गणेशाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व वरील महिरप तोरणात गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत.

गर्भगृह सभामंडपापेक्षा काही इंच खोल आहे. तिथे मध्यभागी जमिनीवर स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील लिंगपाषाण विशिष्ट कोनात तिरपे आहे. शिवपिंडीच्या सभोवती कठडा आहे आणि त्यावर जलधारा धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहाच्या छतावर सुमारे वीस फूट उंच चौकोनी शिखर आहे. शिखरावर चारही दिशांना अंगशिखरे, देवकोष्ठके व कमळफुलांची नक्षी पाहायला मिळते. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.

मंदिराच्या बाजूला अहिल्यादेवी होळकर यांचे लहान मंदिर आहे. यात वज्रपीठावर अहिल्यादेवी यांची हाती शिवपिंडी धरलेली ध्यानस्थ मूर्ती आहे. गावाच्या परिसरात मारुती मंदिर, शनी मंदिर, विश्वकर्मा मंदिर इत्यादी मंदिरेही आहेत. फाल्गुन शुक्ल द्वादशी म्हणजेच आमली बारस या दिवशी पवित्रेश्वराची वार्षिक जत्रा असते. परिसरातील अनेक गावातून शेतकरी आपले बैल घेऊन देवाला प्रदक्षिणा घालण्यासाठी येतात. देवाला प्रदक्षिणा घातल्याने बैल वर्षभर रोगराईमुक्त व सुदृढ राहतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक कावड घेऊन मंदिरात अभिषेक करण्यासाठी येतात.

चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती हा येथील दुसरा मोठा उत्सव आहे. यावेळी गावात आलेल्या पाहुण्यांनी डोक्यावर पाण्याचा हांडा घेऊन मंदिरात अभिषेक घालावा, अशी येथील प्रथा आहे. यात्रेनिमित्त गावात गोडाचा प्रसाद केला जातो. महाशिवरात्री उत्सवाच्या रात्री महादेवाची पालखी मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. श्रावणासह इतर सर्व सोमवारी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते.

उपयुक्त माहिती:

  • कळमनुरी येथून २७ किमी अंतरावर
  • हिंगोली येथून ३५ किमी अंतरावर
  • कळमनुरी व हिंगोली येथून पोत्रा गावापर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : पुजारी, मो. ९२८४९१८५९८

पवित्रेश्वर मंदिर

पोत्रा, ताल. कलामनुरी, जिला. हिंगोली

Back To Home