
जमिनीखाली काळ्या दगडात कोरलेले भव्य पाताळेश्वर मंदिर म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचा मानबिंदू आहे. एकाच विशाल पाषाणात कोरून तयार केलेले हे मंदिर आणि तेथील लेण्या १३०० वर्षांहून अधिक जुन्या असल्याचे सांगितले जाते.
या मंदिराला फार पूर्वी पांचाळेश्वर किंवा भांबुर्डे मंदिर असेही म्हटले जात असे. पूर्वीच्या काळात पुणे आणि भांबुर्डे गावांच्या मधून मुठा नदी वाहत असे. भांबुर्डे गावात ब्रिटिशांचे बंगले होते. येथून नदी ओलांडून पलीकडे पुण्याला जाण्यासाठी लाकडी पूल आणि दगडी पुलाचा वापर केला जात असे. नंतरच्या काळात या भागाचा पुणे शहरात समावेश झाला.
पाताळेश्वर मंदिर पांडवकालीन असून वनवासात असताना पांडवांनीच हे मंदिर बांधले असावे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र येथील राष्ट्रकुट वास्तुशैलीचा नमुना पाहता हे मंदिर राष्ट्रकुट राजवटीत बांधले असण्याच्या मताला बळ मिळते. सहाव्या शतकापासून दहाव्या शतकादरम्यान भारतात ही राजवट होती. हे राजे जैन धर्मीय असले तरी शैव, वैष्णव आणि शाक्त धर्माचाही ते आदर करत. त्यामुळे त्यांचे बहुतेक सर्व शिलालेख भगवान विष्णू किंवा भगवान शिव यांच्या आराधनेने सुरू झाल्याचे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील वेरूळ आणि एलिफंटा लेण्यांसह भारताच्या दक्षिणेकडील अनेक प्रसिद्ध वास्तूंच्या बांधकामांमध्ये राष्ट्रकुट राजांचा महत्त्वाचा वाटा आहे. राष्ट्रकुट राजा कृष्ण याच्या ताम्रपटात पुण्यविषय, पूनकविषय आणि तेथील पाताळेश्वर मंदिराचा उल्लेख आढळतो. पुण्यविषय, पूनकविषय हा पुण्याला उल्लेखून केलेला शब्दप्रयोग आहे, असे सांगितले जाते.
राष्ट्रकुटाशी एकनिष्ठ असलेला आणि आपल्या राज्याचा पुण्यापर्यंत विस्तार करणाऱ्या उत्तर कोकणच्या शिलाहार राजानेही हे मंदिर बांधले असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. मात्र अजूनही ही वास्तू नेमकी कधी उभी राहिली, याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. आधुनिक पुण्याच्या शिवाजीनगर येथील जंगली महाराज रोडवरील हे मंदिर आजही आपले निर्माण रहस्य कायम ठेवून उभे आहे.
या लेणीसमोर पाषाणात कोरलेला नंदीमंडप आहे. गोलाकार नंदीमंडपाला बारा खांबांनी बाहेरच्या बाजूने तोलून धरला आहे. मध्यभागी आणखी चार खांब असून त्यामध्ये एका चौथऱ्यावर नंदी विराजमान आहे. नंदीमंडपापासून काहीसे पुढे डाव्या बाजूच्या कातळात एक ओसरी कोरलेली दिसते. तेथेच लेण्यांचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराजवळ देवनागरी लिपितील शिलालेख पाहायला मिळतो. अखंड पाषाणातून कोरलेल्या प्रशस्त सभामंडपात ३० खांब आहेत. या मोठ्या चौकोनी दगडी खांबांवर नक्षीकाम केलेले आढळत नाही. सभामंडपाची रचना ही वेरूळ येथील लेण्यांशी साम्य दर्शविणारी आहे. सभामंडपाच्या भिंतींवर काही पुसटशी शिल्पे दिसतात.
गाभाऱ्यासमोर एक नंदी आहे. गाभाऱ्याचेही येथे तीन भाग दिसतात. त्यातील नंदीसमोर असलेल्या गाभाऱ्यात पाताळेश्वराची मूर्ती आहे. पाताळेश्वराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम आहे. आतमध्ये पितळी पत्र्याने मढविलेली सुंदर शिवपिंडी आहे. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला गणपती मंदिर, तर उजव्या बाजूला पार्वती मातेचे मंदिर आहे. येथील मंदिरांना प्रदक्षिणा घालता यावी, यासाठी मार्ग खोदलेला आहे. या लेण्यांमध्ये खाली उतरून जावे लागत असल्यामुळे त्यांना पाताळेश्वर नाव पडले असावे.