पासोड्या विठ्ठल

बुधवार पेठ, पुणे


पुण्याच्या मध्यवर्ती भागात बुधवार पेठेतील एका रस्त्याच्या मधोमध पासोड्या विठ्ठल मंदिर आहे. ‘पासोड्या विठोबा’ या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की, चौदाव्या शतकातील या मंदिरात संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज येत असत.

‘पासोड्या’ या नावाबाबतची आख्यायिका अशी की पासोडी म्हणजे गोधडीप्रमाणे अनेक कपडे एकत्र करून बनविलेले जाडसर वस्त्र. पूर्वीच्या काळी बौद्ध भिक्षुक थंडीपासून बचावासाठी याचा वापर करत. हा मूळ शब्द ‘पासुंड’ असा होता. त्याचा अपभ्रंश होऊन ‘पासोड्या’ हा झाला. मंदिर परिसरात पूर्वी नारायणगावच्या पासोड्यांचा बाजार भरत असे, म्हणून येथील मारुती मंदिराला ‘पासोड्या मारुती’, तर विठ्ठल मंदिराला ‘पासोड्या विठोबा’ हे नाव पडले. पुण्यातील कापड बाजार म्हणून हा भाग ओळखला जायचा. औरंगजेबाने पुण्यात मृत्यू पावलेला त्याचा नातू महिकुल मिलन याच्या नावाने इसवी सन १७०३ मध्ये येथे पेठ वसवली. त्यावेळी हा भाग ‘मुहियाबाद’ म्हणून ओळखला जात असे. औरंगजेबाने पुण्याचेही नाव ‘मुहियाबाद’ असे ठेवले. मात्र, हे नाव फार काळ टिकले नाही. पुढे थोरले बाजीराव पेशवे यांनी १७४० मध्ये या भागाचे नाव ‘बुधवार पेठ’ असे ठेवले. आज या भागात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने आहेत. हा बुधवार पेठेतील वर्दळीचा भाग आहे.

मंदिराविषयी आख्यायिका अशी की सोळाव्या शतकात या मंदिरात संत तुकाराम महाराजांची कीर्तने होत असत. कीर्तन ऐकण्यासाठी अनेकदा छत्रपती श्री शिवाजी महाराज येथे उपस्थित असत. एकदा संत तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू असताना एका मुघल सरदाराने तेथे उपस्थित असलेल्या शिवाजी महाराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुघल सैनिकांना तेथील प्रत्येक व्यक्ती ही शिवाजी महाराजांसारखी दिसू लागली. त्यामुळे नेमका शिवाजी कोण, असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांना शिवाजी महाराजांना अटक करणे शक्य झाले नाही.

पेशव्यांच्या काळात पुण्यात अनेक लहान-मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराचा जीर्णोद्धारही पेशवेकाळात केल्याचे सांगितले जाते, परंतु त्याची निश्चित नोंद आढळत नाही. या ठिकाणी पूर्वी एक प्राचीन शिवलिंग असलेली घुमटी व त्यासमोर पाण्याचा सार्वजनिक हौद होता, अशी नोंद इतिहासात आहे. त्यावरून हे आधी शिवमंदिर असावे, अशी शक्यता वर्तविली जाते. १९२८ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.

मंदिराच्या बाहेरील भिंतीवर तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उठावचित्रे (म्युरल्स) आहेत. यात संत तुकाराम महाराज कीर्तनात दंग असल्याचे दाखविण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज व अन्य भाविक त्यांच्या कीर्तनाचा आनंद घेताना दिसत आहेत.

मंदिराचा कळस पेशवेकालीन वास्तूशैलीचे दर्शन घडवितो. मंदिर छोटेखानी असून ते दुमजली आहे. मंदिराच्या वरच्या मजल्यावर महिलांना भजन ऐकण्यासाठी स्वतंत्र बैठक आहे. मंदिराचे बांधकाम बाहेरून दगडी, तर आतून लाकडी आहे. गाभाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती असून त्यासमोर स्वयंभू शिवलिंग आहे. या शिवलिंगासमोर नंदी आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचा हौद आहे. तसेच येथे गरूड खांबदेखील आहे. या मंदिरात गणपती, हनुमान, पार्वती, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्याही मूर्ती आहेत.

आठशे वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर पालखी सोहळ्यात या मंदिराला मानाचे स्थान आहे. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या आळंदी व देहूवरून आलेल्या पालख्या पुण्यात दाखल होतात, त्यावेळी या पालख्यांची या मंदिरात आरती होते आणि मग त्या पुढे नाना पेठ व भवानी पेठेकडे मुक्कामासाठी जातात.

तुकाराम महाराजांपासून या मंदिरात सुरू असलेली भजन-कीर्तनाची परंपरा आजही कायम आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी येथे भजन व कीर्तन होते. तुकाराम बीजेच्या निमित्ताने १० दिवस गाथा पारायण होते. महाशिवरात्र व दसरा या दिवशी येथे उत्सव साजरे केले जातात. पालखी काळात या मंदिरात हजारो वारकरी दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  •  पुणे रेल्वे स्थानकापासून ४ किमी, तर
  •  स्वारगेट बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • पीएमपीएमएल बसची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home