हिंदू धर्मात ‘अतिथी देवो भव’ म्हणजेच अतिथीलाच देव मानण्याची पद्धत आहे, पण नवी मुंबईत दिवाळे हे असे एक गाव आहे की जेथे देवच अतिथी म्हणून येत असतो. हा देव आहे बहिरीदेव किंवा भैरीदेव. हा पाहुणा केवळ अडीच दिवसांसाठी गावात येतो. बाकी वर्षभर तो घारापुरी बेटाजवळील समुद्राच्या तळाशी असतो. दिवाळीत अश्विन शुद्ध अमावस्येपासून तीन दिवसांसाठी येथे बहिरीदेवाची मोठी यात्रा भरते. कोणतेही मंदिर नसताना काही तासांसाठी गावात आलेल्या या देवाच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी हजारो भाविकांची येथे रीघ लागते.
‘एकविसाव्या शतकातील शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या नियोजनबद्ध शहरात पूर्वी अनेक गावे आणि पाडे वसलेले होते. बेलापूर हे त्यातील एक महत्त्वाचे गाव. पनवेल खाडीच्या तोंडावर असलेल्या या गावास पूर्वी शाबाज किंवा शाहबाज असे म्हणत. येथील किल्ल्यावरून पनवेल व पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर नियंत्रण ठेवता येत असे. या गावाला लागूनच दिवाळे हे गाव वसलेले आहे. खाडीकिनारी वसलेले हे गाव आता बेलापूरचाच एक भाग झालेले आहे. बहिरीदेव हे येथील ग्रामदैवत आहे. या गावाचे वैशिष्ट्य असे की येथे बहिरीदेवाचे मंदिर नाही, तरीही शेकडो वर्षांपासून येथील प्रत्येक घरात बहिरीदेवाची नित्यनेमाने पूजा केली जाते.
बहिरोबा, भैरोबा या ग्रामदेवता आहेत. त्यांचे शिवाशी तादात्म्य मानले गेल्यानंतर त्यांच्या नावाचे भैरव असे संस्कृतीकरण झाल्याची शक्यता ‘मराठी विश्वकोश’कारांनी मांडली आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखाला भैरव असे म्हणतात. त्याच प्रमाणे भैरव हा शिवाचा प्रमुख गण असल्याचेही मानले जाते. आगरी आणि कोळी समाजातील अनेकांचे खंडोबा, बहिरोबा हे कुलदैवत आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांत बहिरोबाची मंदिरे आढळतात. दिवाळे या गावातील बहिरोबाचे वास्तव्य मात्र समुद्राच्या तळाशी असते.
दिवाळीच्या तोंडावर दिवाळेतील ग्रामस्थांचा उत्साह कित्येक पटींनी वाढू लागतो. कारण या काळात त्यांचा लाडका भैरीदेव समुद्राचा तळ सोडून गावकऱ्यांना दर्शन देण्यासाठी येणार असतो. त्यासाठी प्रत्येक घरात रंगरंगोटी सुरू होते. रोषणाई केली जाते. परिसर सजू लागतो. घरांसमोर रांगोळ्या दिसू लागतात. या सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. आजची पिढीही तेवढ्याच उत्साहाने तो उत्सव साजरा करते. दिवाळीत नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी हा देव समुद्रातून आणण्यासाठी कौल लावण्यात येतो. कौल मिळाला की दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीतील ३०० ते ४०० तरुण होड्या, बोटी घेऊन समुद्राच्या तळाशी वास्तव्यास असणाऱ्या आपल्या देवाला आणण्यासाठी निघतात. हा सोहळा पाहण्यासाठी उरण, घारापुरी, ट्रॉम्बे परिसरातील अनेक भाविक होड्या, बोटींतून या ठिकाणी येतात.
घारापुरी बेटाजवळील खोल समुद्रात हे तरुण बहिरीदेवाचा शोध घेण्यास प्रारंभ करतात. त्याआधी देवाचा मान म्हणून जिवंत पापलेट व शेवंडी तेथे सोडली जाते. वैशिष्ट्य असे की मागच्या वर्षी ज्या ठिकाणी हा देव सोडलेला असतो, ती जागा त्या अथांग समुद्रातही या तरुणांना अचूक सापडते. बुडी मारून मूर्ती शोधण्याचे काम गावातील तांडेल कुटुंबातील पुरुषांचे. त्यांनाच ही मूर्ती सापडते, असे म्हणतात. ही मूर्ती म्हणजे काळ्या पाषाणातील टाक आहे. मूर्तीवर मध्यभागी अश्वारूढ देवाची प्रतिमा आहे. सोबतीला माधो–ईर बंधू यांच्या प्रतिमा आहेत. अनेक वर्षे पाण्यात राहिल्यामुळे या पाषाण–टाकावरील शिल्प अस्पष्ट झालेले आहे.
मूर्ती सापडल्यानंतर देवाला स्नान घातले जाते, मग शेंदूरलेपन करून मानाच्या पालखीत बसवून, वाजत–गाजत, गुलालाची उधळण करत मिरवणुकीने आणले जाते. ही मिरवणूक गावातील तांडेल यांच्या घराजवळ येते. त्यांच्या देवघरात देवाची मनोभावे पूजा होते. खास बांधलेल्या ठिकाणी बहिरोबाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे बहिरीदेवाला अभिषेक करण्यात येतो. मस्तकावर चांदीचा मुकुट चढविला जातो. पानाफुलांची सजावट केली जाते. त्यानंतर तेथे दर्शनाकरीता व नवस फेडण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातून भक्तांची रीघ लागते.
यावेळी तीन दिवस गावाला जत्रेचे स्वरूप येते. त्या रात्री गावात देवाची पालखी फिरते. भाविकांकडून यावेळी दिवाळीचा फराळ, नारळ, हार व फुले अर्पण केले जातात. पारंपरिक कोळीगीते, गोंधळ, भजन–कीर्तनाने हा उत्सव साजरा होतो.
तिसऱ्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेला देव पुन्हा समुद्रातील आपल्या स्थानावर जाण्यासाठी पालखीत बसतो. देवाची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. यावेळी देवाला निरोप देण्यासाठी हजारो भाविक किनाऱ्यावर जमा होतात. जड अंत:करणाने व साश्रुनयनांनी तो सोहळा पार पडतो. मग पुन्हा होड्यांतून ३०० ते ४०० तरुण देवाला आपल्या जागेवर सोडण्यासाठी निघतात. देव समुद्राच्या तळाशी बसून बारा महिने तप करतो अशी लोकसमजूत आहे. येथील बहुसंख्य ग्रामस्थांचा व्यवसाय मासेमारीचा असल्याने समुद्रात जावेच लागते. तेथे बहिरीदेवच आपले रक्षण करतो, अशी त्यांची श्रद्धा आहे.