पांडुरंग संस्थान

देऊळगाव माळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराचा लौकिक संपूर्ण परिसरात ‘प्रति पंढरपूर’ असा आहे. या प्राचीन मंदिरात तालुक्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आषाढ महिन्यात येथे होणाऱ्या उत्सवाला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. या उत्सवादरम्यान हजारो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या दहीहंडी सोहळ्याप्रसंगी साक्षात विठुराया या नगरीत वास्तव्यास असतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील दहीहंडी राज्यातील मंदिरांमध्ये होणारी सर्वात मोठी दहीहंडी असल्याचा दावाही करण्यात येतो. कार्तिक एकादशीनिमित्तही येथे मोठा उत्सव होतो. या दोन्ही उत्सवांदरम्यान परिसर विठुनामाने गजबजून जातो. कार्तिक महिन्यातील उत्सवादरम्यान येथे होणारे कुस्तीचे जंगी सामने हे मोठे आकर्षण असते.

विठ्ठल-रखुमाईचे हे मंदिर नेमके केव्हा बांधण्यात आले, याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र, हे मंदिर चारशे वर्षांहूनही प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. मूळ दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा कालौघात अनेकदा जीर्णोद्धार करण्यात आला. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारादरम्यान या मंदिराला सध्याचे दुमजली स्वरूप प्राप्त झाले. राज्य सरकारने या मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेहकरपासून देऊळगाव माळी हे गाव १० किमी अंतरावर आहे. येथील ग्रामस्थांची पांडुरंगावर गाढ श्रद्धा आहे. या मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळाला लागून असलेल्या प्रांगणातून चार पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कक्षासने व भिंतीत दीपकोष्ठके आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रवेशद्वाराजवळ गरुड व हनुमंताच्या देवळ्या आहेत. सभामंडपात मध्यभागी कासवमूर्ती आहे. सभामंडपातून तीन पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या भिंतींवर संतांची चित्रे रंगवण्यात आली आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर असलेल्या संगमरवरी मखरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. २०२३ मध्ये येथे नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मखरावर सुबक कलाकुसर आहे. दोन्ही मूर्तींवर चांदीचे मुकुट आहेत. मंदिर परिसरात भक्तनिवास व विश्वस्त मंडळाचे कार्यालय आहे.

साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाची गावावर कृपादृष्टी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अनेक ग्रामस्थ या मंदिरातील विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतरच दिनचर्येला सुरुवात करतात. कुटुंबातील शुभकार्यांचा प्रारंभही येथील विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनानंतरच केला जातो. दर महिन्यातील दोन्ही एकादशींच्या दिवशी येथे भाविकांची मांदियाळी असते. मंदिरासमोरील मंडपात वेळोवेळी कीर्तन, भजन आदी कार्यक्रम होतात.

आषाढी महोत्सव हा येथील मोठा उत्सव आहे. तीन दिवसांच्या या उत्सवाला आषाढ पौर्णिमेपासून सुरुवात होते. या दिवशी रात्री १२ वाजता गोपाळकाला होतो. दुसऱ्या दिवशी, आषाढ वद्य प्रतिपदेच्या दिवशी सायंकाळी दहीहंडीचा सोहळा होतो. हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानकऱ्यांच्या हस्ते हंडी फोडण्यात येते. आषाढ वद्य द्वितीयेच्या दिवशी पहाटे गावातून पालखी मिरवणूक निघते. विठ्ठल-रखुमाईच्या लाकडी मूर्ती फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवण्यात येतात. पंचक्रोशीतील हजारो भाविक हातात भगवी पताका घेऊन या दिंडीत सहभागी होतात. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या सुमारे ८० दिंड्यांचाही या पालखीत समावेश असतो. पालखी प्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्या काढण्यात येतात. वाटेत ठिकठिकाणी या पालखीचे पूजन केले जाते. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेली मंडळी या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात. माहेरवाशिणीही या उत्सवासाठी माहेरी येतात.

कार्तिक महिन्यातही येथे मोठा उत्सव होतो. या उत्सवानिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचेही आयोजन करण्यात येते. त्यादरम्यान श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन आदी कार्यक्रम होतात. या उत्सवादरम्यानही गावातून पालखी मिरवणूक काढण्यात येते. पातोड्याच्या भाजीच्या महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होते.

या उत्सवादरम्यान श्री पांडुरंग संस्थान व गावातील क्रांतिसूर्य तालीम संघातर्फे कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात येते. देऊळगाव माळी हे गाव येथील मातीशी घट्ट नाते सांगणाऱ्या ‘कुस्ती’ या खेळासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील कुस्तीची परंपरा अनेक दशकांपासून आहे. राज्याच्या विविध भागांतील नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेत महिला कुस्तीगीरांचेही सामने होतात. स्पर्धेच्या दिवशी हलगीचा कडकडाट, पिपाणीचा स्वर आणि ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. या स्पर्धांमध्ये मेहकर तालुक्यासोबतच विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत मल्ल आपले नशीब आजमावण्यासाठी येतात. ‘एकचाक’, ‘धोबीपछाड’, ‘घिस्सा’ आणि ‘हप्ते’ यांसारख्या अस्सल देशी डावपेचांचे दर्शन येथे घडते. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या मल्लांना ग्रामस्थांच्या वतीने मानाची चांदीची गदा, रोख रक्कम आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविले जाते.

उपयुक्त माहिती:

  • मेहकर येथून १२ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ६४ किमी अंतरावर
  • मेहकर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

पांडुरंग संस्थान

देउलगांव माली, ताल. मेहकर, जिला. बुलढाणा

Back To Home