नाशिक जिल्ह्यातील अनेक प्राचीन मंदिरे ही अनोख्या शिल्प लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या यादीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे देवळी कराड गावातील पंचरथी महादेव मंदिर. शिल्पसौंदर्याने नटलेल्या या मंदिराकडे पाहिल्यावर देव रथावर स्वार झाल्याचा भास होतो, त्यामुळेच या मंदिराला ‘पंचरथ’ वा ‘पंचरथी मंदिर’ असे म्हटले जाते. पंचरथी मंदिर नागर शैलीतील दुर्मिळ वास्तू मानली जाते. भारतीय शिल्परचनेवर सखोल विवेचन करण्यात आलेल्या ‘प्रासाद मंडन’ या ग्रंथातही या मंदिराबद्दलचे वर्णन आहे.
नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले कळवण तालुक्यातील देवळी कराड हे गाव गिरणा नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. गावाच्या पश्चिमेकडे असलेली अजिंठा-सातमाळा डोंगररांग व गिरणा नदीमुळे हा परिसर निसर्गसमृद्ध बनला आहे. गावात प्रवेश करताना एका टेकडीच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर दुरूनच नजरेस पडते. रथाप्रमाणे आकार असलेले हे मंदिर सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिराशी काही प्रमाणात साम्य दाखवते. पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर उंच जोत्यावर उभारण्यात आले आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
चार-पाच पायऱ्या चढून गेल्यानंतर मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. येथे दोन्ही बाजूला दगडी कठडे आहेत. तेथून पुढे सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर डावी-उजवीकडे शैवद्वारपाल कोरलेले दिसतात. सभामंडपात अखंड दगडातील कोरीव नंदी विराजमान आहे. या मंदिरात तीन द्वारशाखा आहेत. त्यापैकी एक स्तंभनक्षी आहे. तिच्या माथ्यावर गणेशपट्टी असून, गणेश प्रतिमा आहे. सभामंडप बंदिस्त आहे. सभामंडपातील शिल्पांनी नटलेल्या खांबावर कीर्तिमुख, घटपल्लव कोरलेले आहेत. सभामंडपाच्या डावीकडील देवकोष्टकात गणेशाची आकर्षक मूर्ती आहे. गर्भगृहातील प्राचीन शिवलिंगासमोर वैशिष्ट्यपूर्ण अशी उमामहेश्वराची मूर्ती पाहायला मिळते.
मंदिराच्या बाह्य अंगावर कीर्तिमुख, भौमितिक नक्षी, वेलबुट्टी आदी शिल्पे आहेत. मुखमंडपाच्या बाह्य भागावर युगुलशिल्पे कोरलेली आहेत. गाभाऱ्यातील अभिषेकाचे पाणी ज्या मार्गाने बाहेर पडते तेथे मकरमुख आहे. हे मंदिर राज्य पुरातत्त्व विभागाकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराचे शिखर पंचरथी शैलीचे असून त्यामध्ये शिखरांवर अनेक लहान-लहान शिखरांच्या प्रतिकृती कोरलेल्या असतात.
मंदिराच्या प्रांगणात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली काही विरगळ आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवपिंडीसमोर हात जोडून एक गुडघा जमिनीवर टेकवून बसल्याचे पाहायला मिळते. शिवपिंडीवर चंद्र व सूर्य कोरण्यात आले आहेत. विरगळीच्या दुसऱ्या बाजूला शिवधनुष्य पेललेला सैनिक व समोर शत्रू असे दृष्य कोरलेले आहे. तिसऱ्या बाजूला आडवा पडलेला सैनिक दाखविण्यात आला आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटीदरम्यान या मार्गाने ये-जा केल्याने त्यांच्या सैनिकाची ही विरगळ असावी, असे त्यातील कोरीवकामांतून जाणवते. या पिंपळाची मुळे संपूर्ण गावभर पसरली असून महादेव गावाचे रक्षण करतोय, अशी श्रद्धा येथील ग्रामस्थांची आहे.
देवळी कराड गावातील सर्व धार्मिक, सांस्कृतिक सोहळे या मंदिराच्या साक्षीने होतात. महाशिवरात्री हा येथील मुख्य उत्सव. यावेळी गावात मोठी यात्रा भरते. यात्रेत बोहाडा साजरा केला जातो. (आदिवासी भागात ‘बोहाडा’ नावाने मुखवट्यांचा किंवा स्वांगांचा (सोंगाचा) उत्सव साजरा केला जातो.) यासाठी येथून जवळ असलेल्या अस्तमाळ गावातून सोंगे आणली जातात. ही परंपरा वर्षानुवर्षे या गावकऱ्यांनी जपली आहे. ‘आगारीचा पाडवा’ म्हणजेच अक्षय्य तृतीयेला आदिवासी बांधव पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पूजापाठ करतात. यावेळी शिजविलेल्या भाताची शिंते घरावर व चुलीत टाकण्याची परंपरा आहे.