उजनी धरणाच्या पाण्यात ४० हून अधिक वर्षे राहूनही तुलनेने सुस्थितीत असलेले मंदिर म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील श्री पळसनाथाचे मंदिर. हेमाडपंती पद्धतीने उभारलेल्या या प्राचीन मंदिराचा उल्लेख ज्ञानेश्वरीतही आला आहे. पळसदेव हे गाव पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आणि भिगवण व इंदापूरपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचे पळसनाथ हे ग्रामदैवत.
हे मंदिर चालुक्यकालीन असल्याचा अंदाज आहे. साधारणतः अकराव्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली असावी. प्राचीन काळी पळसदेव हे गाव नवहंस राजाच्या राजधानीचे ठिकाण होते. या मंदिरातच राजाने ९९ यज्ञ केल्याचे उल्लेख आहेत. फलटणचे राजे निंबाळकर यांनी या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंदही आढळते.
मंदिराची ही पुरातन वास्तू उजनी धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयात बुडालेली असते; परंतु उन्हाळ्याच्या अखेरीस पाणी कमी झाल्यावर या देखण्या मंदिराचे दर्शन होते. वर्षातून केवळ चार महिनेच दिसणाऱ्या या मंदिरात दर्शनासाठी भाविक येतात; शिवाय पर्यटक, इतिहास संशोधक व जिज्ञासूंचीही संख्या मोठी असते. मंदिर पाहण्यासाठी नदीकिनाऱ्यापासून होडीने प्रवास करावा लागतो. नदीकाठी बांधण्यात आलेल्या या मंदिराचा परिसर विस्तृत असावा, तसेच देवळाभोवती कोट असावा. आतल्या भागात एका बाजूला १५ कमानी असलेली ओवरी दिसते. इतर बाजूंना मात्र ढासळलेल्या भिंती दिसतात. मंदिर परिसरात काही शिल्पे, काही खांब पडलेले दिसतात. दोन वीरगळ, सती शिळा व शिवपार्वतीच्या मूर्तीही तेथे दिसतात.
मंदिरात २७ दगडी नक्षीदार खांब आहेत. शिखर भागाकडे प्रवेश करण्यासाठी एक छोटेसे प्रवेशद्वार आहे. शिखर भागात सतत सूर्यप्रकाश खेळता राहावा यासाठी चारही बाजूंनी लहान खिडक्या आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना अप्रतिम कोरीव काम असलेली चौकट दिसते. त्यावर वाद्य वाजवणारे वादक, पशू-पक्षी कोरलेले आहेत. मंदिराचा कळस अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. मूळ मंदिराचे बांधकाम दगडी असले तरी काही बांधकाम भाजक्या विटा व चुना यांचा वापर करून केलेले दिसते. ते बहुधा जीर्णोद्धाराच्या वेळी करण्यात आले असावे. कळसाच्या बांधकामासाठी अशा विटा वापरण्यात आल्या आहेत. त्या कळसाच्या ठिकाणी जाण्यासाठी एक रस्ताही आहे. मंदिराच्या छतावर चढल्यावर दोन फूट बाय दीड फूट आकाराचा देवळीवजा दरवाजा आहे. कळसाच्या आत गेल्यावर विस्मयकारक शांततेचा अनुभव मिळतो. पुरातन मंदिरात ध्यानधारणेसाठी अशी जागा सोडण्याची पद्धत असल्याचे अभ्यासक सांगतात.
मंदिराजवळ असलेल्या बळीच्या मंदिरात देवनागरी लिपीतील एक शिलालेख आहे, ‘चंगदेव दंडनाके विष्णुगृह केले’ असे शब्द त्यामध्ये कोरलेले दिसतात. ११व्या-१२व्या शतकात हजार सुवर्णनाणी त्यासाठी देण्यात आल्याचा उल्लेखही त्यात असल्याचे अभ्यासक सांगतात. हनुमान आणि अन्य काही मूर्तीही परिसरात दिसतात. रामसेतू बांधण्याचे, तसेच पुराणातील अन्य काही प्रसंग येथे दगडांत कोरलेले दिसतात.
पळसदेवचे ग्रामदैवत असलेल्या या मंदिरावर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. धरणाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणचे शिवलिंग आणि नंदी यांची गावात नवीन मंदिर बांधून प्रतिष्ठापना केली. त्या ठिकाणीही भाविक दर्शनाला येतात. विशेषत: महाशिवरात्रीला होणाऱ्या उत्सवात तालुक्यातील अनेक भाविक सहभागी होतात.