पद्मावती मंदिर

पद्मतीर्थ, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

वैकुंठाहून श्रेष्ठ अशा पंढरपुरात नऊ तीर्थे आहेत. चंद्रभागा नदीत पुंडलिक मंदिरासमोर लोहदंडतीर्थ, हरिदास वेशीजवळ कुंडलतीर्थ, गोपाळपुराजवळ संगमतीर्थ, वेणूतीर्थ आणि गुंजातीर्थ आहे. गोपाळपुरापासून एक किलोमीटर अंतरावर यमतीर्थ व विठ्ठल मंदिरापासून ८ किलोमीटर अंतरावर पंचगंगातीर्थ आहे. येथे तुंगा, सती, सुनी, कीर्ती व भृंगारी या पाच नद्यांचा संगम आहे. पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेला विष्णूपदतीर्थ आणि विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेस असलेल्या पद्मतीर्थात पद्मावती देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
पद्मावती देवीचे हे मंदिर तलावात आहे. या तलावाचे आणि मंदिराचे बांधकाम सरदार यशवंतराव पवार यांनी इ.स. १७७८ मध्ये केले असल्याचा शिलालेख मंदिराच्या सभामंडपातील फरशीवर आहे. मंदिराबाबत अख्यायिका अशी की महादेव व पार्वती नंदीवर बसून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असताना पार्वतीला तहान लागली. तेव्हा महादेवाचे आपल्या हातातील त्रिशुळाने जमिनीवर आघात केला. त्यामुळे तलावाची निर्मिती होऊन त्यातून गंगा प्रकट झाली. पार्वतीने या तीर्थातील पाणी पिऊन आपली तृष्णा भागवली व ती विसाव्यासाठी येथे बसली. तलावातील सुंदर पद्मफुलांमुळे पुढे या तीर्थास पद्मतीर्थ व देवीला पद्मावती नावाने संबोधले जाऊ लागले.
या तीर्थाबाबत आणखी एक अख्यायिका सांगितली जाते ती अशी की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई नामदेवांना ब्रह्मज्ञान व्हावे म्हणून देशाटनाला निघाले. तेव्हा पांडुरंग त्यांना सोडायला या तीर्थापर्यंत आले व येथेच त्यांनी नामदेवाचा हात ज्ञानेश्वरांच्या हातात दिला. संतकवी कान्हा हरिदासाच्या काकड आरतीत या तीर्थाचा उल्लेख आहे.
विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या या भागात पूर्वी टेकडी होती. परंतू आताअनेक बांधकामे झाली असल्याने त्या टेकडीचे अस्तित्व नाहीसे झालेले आहे. येथील विस्तीर्ण सपाट मैदानात पद्मावतीतीर्थ नावाचा तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी चारही दिशांना पायऱ्या आहेत. तलावात मध्यभागी उंच चौथऱ्यावर पद्मावती देवीचे मंदिर आहे. तलावाच्या काठापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी दगडी पूल आहे. पुलाच्या प्रारंभ बिंदूवर दोन्ही बाजूला दोन स्तंभ व त्यामध्ये जाळीदार झडपा आहेत. या स्तंभांच्या दोन्ही बाजूला दोन लहान मंदिरे आहेत. त्यापैकी डावीकडील मंदिरात शिवपिंडी व उजवीकडील मंदिरात गणपतीची मूर्ती आहे. तलावाच्या काठावर, पुलाच्या समोर डाव्या व उजव्या बाजूला असलेल्या दोन चौथऱ्यांवर अष्टकोनी दीपमाळा आहेत. तलावाचा काठ पुलापेक्षा उंच असल्यामुळे पुलावर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पूल व मंदिराच्या चौथऱ्यास चारही बाजूंनी सुरक्षा कठडा आहे. मंदिराभोवती असलेल्या सुरक्षा कठड्यात मोठे रांजण आहेत. असे सांगितले जाते की पुराच्या वेळी मंदिरात पाणी शिरू नये म्हणून ही रांजणांची रचना केलेली आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून तीन पायऱ्या चढून प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपती व मंडारकावर कीर्तीमुख आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. सभामंडपात फरसबंदी जमिनीवर मध्यभागी जमिनीपासून सुमारे चार इंच उंच वर्तुळाकार शिलालेख आहे. या शिलालेखानुसार सरदार यशवंतराव पवार यांनी १७७८ साली वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी तलावाचे व मंदिराचे बांधकाम करून पद्मावती देवीस अर्पण केले. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराची रचना सभामंडपाच्या प्रवेशद्वारासारखीच आहे. गर्भगृहात प्रकाश व हवा येण्यासाठी वातायने आहेत. गर्भगृहाचे छत भिंतींवर तोललेले आहे व त्यावर पितळी घंटा टांगलेल्या आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर चार नक्षीदार स्तंभ असलेल्या पाषाणी मखरात पद्मावती देवीची तांदळा स्वरूपातील शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीवर विविध वस्त्रे व अलंकार आहेत. देवीस दररोज फुलांनी सजविले जाते. मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. कठड्यात चारही कोनांवर एकावर एक आमलक आणि त्यांवर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे द्रविडी शैलीतील चौकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात सुमारे वीस देवकोष्टके आहेत व त्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. सर्व देवकोष्टकांवर घुमटाकार शिखर, त्यावर आमलक व कळस आहेत. मुख्यशिखराच्या घुमटाकार शीर्षभागी स्तुपिका व कळस आहे. मंदिराच्या मागे मंडोवरात असलेल्या देवकोष्टकात दोन विशाल नागशिळा आहेत. पद्मावती तलावाच्या काठावर उद्यान विकसित करण्यात आले आहे. या तलावात एक प्राचीन विहिरही आहे.
शारदीय नवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. या वेळी दहा दिवस देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. महाराष्ट्र व कर्नाटकसह देशातील विविध भागांतून हजारो भाविक यावेळी देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. भाविक यावेळी देवीची खणानारळाने ओटी भरून, देवीला साडीचोळी व सौभाग्य अलंकार अर्पण करतात. आषाढी व कार्तिकी वारीस पंढरपुरात येणारे भाविक या मंदिरास आवर्जून भेट देतात.

उपयुक्त माहिती

  • पंढरपूर बस स्थानकापासून १ किमी, तर रेल्वे स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पंढरपूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home